प्रस्तावना : भारत सरकारतर्फे १९७२ मध्ये श्री. कर्तारसिंग यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार काही मूलभूत आरोग्य कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. ज्यांचा ग्रामीण आरोग्य सेवा संरचना (Organization) म्हणून खालील प्रमाणे समावेश केला जातो.

  • बहूद्देशीय आरोग्य कार्यकर्ती : ज्या अगोदरच सहायक परिचारिका प्रसाविका (Auxiliary nurse midwife; ANM) म्हणून ग्रामीण आरोग्य सेवा देण्याचे काम करीत होत्या त्यांनाच बहूद्देशीय आरोग्य कार्यकर्ती म्हणून नेमण्यात आले. त्यांनी दीड वर्षाचे ए.एन.एम ह्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असते.
  • बहूद्देशीय आरोग्य कार्यकर्ता : ग्रामीण आरोग्य सेवा देणारे इतर तंत्रज्ञ (मलेरिया, स्मॉलपॉक्स इ.) यांना ६ महिन्याचे प्रशिक्षण देऊन वरील आरोग्य कार्यकर्ता म्हणून नेमण्यात आले.
  • आरोग्य सहायक पर्यवेक्षक स्त्री : ह्या पदासाठी पदवी (B.Sc. Nursing) किंवा पदविकाधारक (General Nursing and Midwifery) परिचारिका अथवा महिला अरोग्य अभ्यागत (Lady Health Visitor) यांची नेमणूक केली जाते. त्यांना ४ ते ५ स्त्री बहूद्देशीय आरोग्य कार्यकर्ती यांनी पुरविलेल्या आरोग्य सेवेचे पर्यवेक्षण करावयाचे असते.
  • आरोग्य सहायक पर्यवेक्षक पुरुष : ह्या पदासाठी ग्रामीण आरोग्य सेवा देणारे मलेरिया किंवा इतर तांत्रिक पर्यवेक्षक यांना अभिमुखता (Orientation) प्रशिक्षण देऊन नेमणूक केली जाते. त्यांना ४ते५ बहूद्देशीय पुरुष आरोग्य कार्यकर्ता यांनी पुरविलेल्या आरोग्य सेवेचे पर्यवेक्षण करावयाचे असते.

एका परिचारिकेला त्यांना नेमून दिलेल्या लोकसंख्येनुसार ग्रामीण आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी पूर्ण करावी लागते. उदा., आदिवासी भाग ( Tribal area ) : ३००० लोकसंख्या; बिगर आदिवासी भाग (Non Tribal area) : ५०००लोकसंख्या.

हूद्देषीय आरोग्य परिचारिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा :

अ) नेमलेल्या विभागातील असुरक्षित (Vulnerable) सदस्याची नाव नोंदणी करणे :

  • तीन महिने झालेल्या गरोदर मातांची घरोघरी जाऊन नाव नोंदणी करणे.
  • लग्न झालेल्या व प्रजोत्पादन वयोगटातील स्त्रिया व पुरुषांची नाव नोंदणी करणे.
  • पाच वर्षे वयोगटातील मुलांची नाव नोंदणी करणे.
  • प्रजोत्पादन वयोगटातील जोडप्यांची विभागणी करून नोंद ठेवणे. उदा., एकूण जिवंत मुले असणारी विविध जोडपी, कुटुंबनियोजनाच्या विविध पद्धती वापरणारी एकूण जोडपी, कुटुंबनियोजनाच्या तात्पुरत्या विविध पद्धती वापरणारी एकूण जोडपी, कुटुंबनियोजनाच्या कायमस्वरूपी (शस्त्रक्रिया) केलेली एकूण जोडपी, कुटुंबनियोजनाच्या तात्पुरत्या/कायम स्वरूपी पद्धतीसाठी पात्र असणारी जोडपी इ.
  • वरील सर्व प्रकारच्या नोंदीसाठी विविध नोंद वह्या/पुस्तके तयार करणे आणि तसा अहवाल तयार करून प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहायक पर्यवेक्षक (Supervisor) यांना सुपूर्त करणे.

आ) गृहभेटीद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा :

  • गरोदर मातांची तपासणी व संपूर्ण ९ महिने आरोग्य सेवा देणे.
  • जोखमीच्या गरोदर मातांची विशेष काळजी घेऊन संदर्भसेवा पुरविणे.
  • गरोदर व स्तनदा मातांना आहाराविषयी व कुटुंबनियोजनाचा सल्ला देणे.
  • गरोदर व स्तनदा माता, पोगांडावस्थेतील मुली व कुपोषित मुले यांना लोहाच्या गोळ्या (Iron) वाटप करणे. त्यांच्या मधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे.
  • गरोदर मातांना धनुर्वात रोधक (Inj. tetanus toxoid ) लसीकरण करणे.
  • पाच वर्षे वयाखालील मुलांना जीवनसत्त्व ‘अ’चा खुराक देणे आणि लसीकरण करणे.
  • गुंतागुंतीच्या गरोदरपणातील, बाळंतपणातील व स्त्रियांचे आजार यातील समस्यासाठी संदर्भ सेवा पुरविणे.
  • साधारणपणे ५० टक्के बाळंतपण हे आरोग्य केंद्रात करण्यासाठी गरोदर स्त्रियांना प्रेरित करणे. त्याप्रमाणे त्यांना ‘मातृ-जननी योजने’ची माहिती देणे.
  • प्रशिक्षित दाईला स्वाभाविक व सुरक्षित प्रसूतीसाठी साहाय्य करणे.
  • गुंतागुंतीची प्रसूती व अस्वाभाविक (Abnormal) जन्मलेली नवजात बालके यांना संदर्भसेवा पुरविणे.
  • प्रसूती नंतर स्तनदा मातांना कमीत कमी ३ गृहभेटी देऊन स्तनपान व नवजात शिशुची काळजी याविषयी मार्गदर्शन करणे. फेर भेटीचे नियोजन करणे.
  • प्रजोत्पादन वयोगटातील जोडपी शोधून कुटुंबनियोजनसाठी प्रेरित करावे व तात्पुरती कुटुंबनियोजन साधनांचे वाटप करणे. गरज असल्यास जोडप्यांसमवेत कुटुंब कल्याण केंदात जाणे.
  • कायदेशीर गर्भपातासाठी (Medical termination of pregnancy; MTP) संदर्भ सेवा देणे.
  • शून्य ते १ तसेच १ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांचे वाढ आणि विकास यांचे निरीक्षण करून तक्त्यावर नोंद करून ठेवणे. (Growth & Development chart).
  • एक वर्ष वयातील मुलांना प्राथमिक लसीकरण दिलेल्या वयोमानाच्या तक्त्याप्रमाणे करणे. (BCG, o-Polio, Hepatitis-B, dpt vaccine, Measles ) इ.
  • तात्काळ/आपत्कालीन रुग्ण सेवा देऊन रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील उपचारांसाठी रवाना करणे.
  • संसर्गजन्य/अधिसुचनात्मक आजारांविषयी प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती देणे.
  • नेमलेल्या विभागातील जन्म मृत्यूंची नोंद ठेवणे.
  • क्लिष्ट आजार ( Chronic Health problem) उदा., मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा संधिवात इ.साठी गृह परिचर्या पुरविणे (रक्त दाब, लघवीतील साखर तपासणे) आणि आरोग्य शिक्षण देणे.

इ) रुग्णास आरोग्य केंद्रात व्यक्तिगत सेवा देणे :

  • वैद्यकीय अधिकारी व आरोग्य साहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली माता-बाल संगोपन, लसीकरण, आरोग्याच्या इतर समस्या व कुटुंबनियोजन इ. सेवा देणे.
  • आरोग्य शिक्षण आणि कुटुंबनियोजन शिबीर आयोजित करणे.
  • शालेय आरोग्य तपासणी शिबिरातील मुलांना संदर्भ सेवा देणे.

ई) सामाजिक आरोग्य सेवा (community care) :

  • ग्रामीण भागातील महिला गट नेते शोधणे (महिला मंडळ अध्यक्ष इ.).
  • आरोग्य शिबीर भरवून आरोग्य शिक्षण देणे.
  • प्रशिक्षित दायी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांच्याशी समन्वय ठेऊन आरोग्यसेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणे.

उ) इतर कामे व जबाबदाऱ्या :

  • आरोग्य केंद्राची देखभाल आणि स्वच्छता ठेवणे.
  • बहूद्देशीय आरोग्य कार्यकर्ता पुरुष यांना सहकार्य करणे.
  • वरिष्ठ अधिकारी, गट अधिकारी व कर्मचारी यांचे बरोबर बैठकीत सहभागी होणे.
  • सर्व प्रकारच्या नोंदी ठेवून मासिक आरोग्यसेवा अहवाल बनविणे.

सारांश : बहूद्देशीय आरोग्य परिचारिका ही एक ग्रामीण आरोग्य सेवा पुरविणारी मूलभूत कार्यकर्ती असून आरोग्य सेवा आणि जनता यामधील महत्त्वाचा दुवा आहे.

संदर्भ :

  • K. Park, Preventive and Social Medicine.