झूकॉव्ह, ग्यिऑर्गी कन्स्टंट्यीनव्ह्यिच : (२ डिसेंबर १८९६‒१८ जून १९७४). रशियन मार्शल. कलूग प्रांतात जन्म. १९१५‒१७ या काळात रशियाच्या सेनेत शिपाई.
१९१८ च्या क्रांतियुद्धात घोडदळाचा अधिकारी. १९२८ ते १९३१ या काळात फ्रुंत्स सैनिकी प्रबोधिनीत उच्च शिक्षण. १९३६ मध्ये एका कोअरचा सेनापती. रशियाच्या चिलखती सैन्याच्या विकासात त्याने लक्षणीय कार्य केले. दुसऱ्या महायुद्धात जानेवारी १९४१ मध्ये तो रशियन सेनेचा प्रमुख झाल्यावर त्याने सेनेची आमूलाग्र पुनर्रचना केली. डिसेंबर १९४१ मध्ये मॉस्कोवर जर्मनांची आलेली धाड, राखीव सैन्याचा कौशल्याने उपयोग करून त्याने परतविली. १९४२ मध्ये स्टालिनचा दुय्यम म्हणून त्याची ‘स्टाव्हका’ या रशियाच्या अत्युच्च संरक्षण नियंत्रण संस्थेत नियुक्ती झाली. त्यामुळे रशियाच्या सर्व युद्धकार्याची आखणी करून युद्धात यश मिळविण्याची जबाबदारी त्याच्यावर पडली. १९४२ च्या शेवटी स्टालिनग्राडचा वेढा उठविण्याची कामगिरी त्याने यशस्वी केली, म्हणून त्यास मार्शल हा किताब देण्यात आला. १९४४-४५ मध्ये त्याने दूरगामी पिछाडी हल्ले करून बर्लिन जिंकले आणि ८ मे १९४५ रोजी त्यास जर्मन सेना शरण आली; परंतु पूर्व जर्मनीचा प्रमुख लष्करी प्रशासक असताना मात्र ओडेसा येथे एका किरकोळ जागेवर त्याची नियुक्ती करण्यात आली. तथापि १९५२ मध्ये त्यास त्याचा पूर्वाधिकार परत मिळाला. १९५५ मध्ये स्टालिनच्या मृत्यूनंतर, रशियाचे नेतेपद मिळविण्यात खुश्चॉव्हला त्याने पुष्कळ साहाय्य केले. ख्रुश्चॉव्हच्या कारकिर्दीत तो युद्धमंत्री बनला. जून १९५७ मध्ये माल्युटॉव्ह, माल्येनकॉव्ह वगैरेंनी केलेला ख्रुश्चॉव्हविरोधी उठाव त्याने दडपून टाकला. त्याच वेळी त्याला कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व मिळाले. सुप्रीम सोव्हिएट प्रिसिडियमचे सदस्यत्व मिळविणारी झूकॉव्ह ही पहिलीच लष्करी व्यक्ती होय. ऑक्टोबर १९५७ मध्ये मात्र फेरवादी व कम्युनिस्ट पक्षाच्या लष्करावरील राजकीय नियंत्रणात अडथळे आणणारा म्हणून त्याची कम्युनिस्ट पक्षातून व सार्वजनिक आयुष्यातून हकालपट्टी झाली; पण ख्रुश्चॉव्हच्या उच्चाटनानंतर (१९६४) त्याचे पुन्हा सार्वजनिक आयुष्यात आगमन झाले. त्याच्या बहुमोल लष्करी कार्याबद्दल त्यास सहा वेळा लेनिन पारितोषिक देण्यात आले. टोअर्ड बर्लिन हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मॉस्को येथे तो निधन पावला.