तूरेन, आंरी : (११ सप्टेंबर १६११‒२७ जुलै १६७५). प्रसिद्ध फ्रेंच युद्धनीतिज्ञ व सेनापती. बूयाँच्या जहागिरदार घराण्यात सडॅन येथे जन्म.

वयाच्या चौदाव्या वर्षी तो आपल्या चुलत्याकडे लष्करी शिक्षणासाठी गेला. १६३१ मध्ये तो फ्रेंच लष्करात कर्नल झाला. यूरोपातील तीस वर्षांच्या धर्मयुद्धात त्याने फ्रेंच सैन्याचे आधिपत्य केले. १६५३‒५८ सालातील यादवी युद्धात फ्रान्सचा राजा चौदावा लुई याचा सेनापती म्हणून त्याने फ्रेंच उमरावांविरुद्ध यशस्वी कामगिरी केली. १६७४-७५च्या ऐन हिवाळ्यात त्याने जर्मनीत युद्ध करून त्यूर्केम लढाई जिंकली. तूरेनने आधुनिक रणतंत्राचा व बंदुका-तोफांचा यशस्वी रीत्या वापर केला. शत्रूला गैरसोयीच्या ठिकाणी व प्रतिकूल हवामानात खेचून आणून लढाई करण्यास भाग पाडणे, वेळेचा व प्रदेशाचा लष्करी हालचालीसाठी योग्य उपयोग करणे, युद्धाची काळजीपूर्वक आखणी करणे व हालचाली ठरविणे, स्वतः कमीत कमी हानी सोसून शत्रूची जास्तीत जास्त हानी करणे इत्यादींकरिता तो प्रसिद्ध आहे. त्याची थोडीबहुत छाप नेपोलियनवर पडल्याचे दिसते. जर्मनीमधील झास्‌बाख येथील लढाईत तो ठार झाला.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा