(यंत्र भाषा). संख्यात्मक कोड किंवा संकेतलिपी, ज्यावर प्रक्रिया करून संगणक थेट परिणाम दर्शवितो. ही संकेतलिपी 0 आणि 1 या दोन चिन्हांचा वापर करून तयार करण्यात येते. त्यामुळे याला द्विमान अंक (Binary digit) किंवा बिट्स (Bits) असे सुद्धा म्हणतात. हा संख्यात्मक कोड वारंवार संगणकावरील पडद्यावर ‍दिसणाऱ्या माहितीला बदलविण्याकरिता अथवा सुधारण्याकरिता हेक्झाडेसिमल (पाया 16) मध्ये रूपांतरित करण्यात येतो.

मशीन भाषा सूचना प्रक्रिया (उदा., बेरीज), ज्यावर प्रक्रिया करावयाची आहे अशी संख्या किंवा पुढील सूचनांचे स्थान दर्शविण्याकरिता प्रामख्याने काही बिट्सचा वापर करते. मशीन भाषा लिहिणे आणि वाचणे अवघड आहे, कारण ती पारंपरिक गणिती संकेत किंवा मानवी भाषेसारखी नसते आणि तिचे कोड प्रत्येक संगणकावर वेगवेगळे राहू शकतात.

असेंब्ली भाषा (Assembly language) ही मशीन भाषेपेक्षा एक स्तर वर आहे. ही भाषा स्मृतिसहायक कोडचा (mnemonic code) वापर सूचनांकरिता करते आणि डाटा संचयित करण्याकरिता स्मृतीतीत ब्लॉक तयार करून त्यांना नावे ओळखण्यास परवानगी देते. त्यामुळे 010100111010 या संख्यात्मक भाषेऐवजी “वेतन, एकूण” असे लिहू शकतो. [असेंब्ली भाषा].

असेंब्ली भाषा मशीन भाषेत सहज भाषांतरित होण्याकरिता तयार केली गेली आहे. मशीन भाषेच्या तुलनेत एखादा पत्ता दर्शविण्याकरिता जरी असेंब्ली भाषेत माहितीचे ब्लॉक नावाने दर्शविण्यात येत असले, तरी असेंब्ली भाषा अवघड अशा माहितीचे आयोजन करण्याकरिता अत्याधुनिक माध्यम प्रदान करीत नाही. मशीन भाषेप्रमाणेच असेंब्ली भाषेला विशिष्ट अंतर्गत संगणक आराखड्याची तपशीलवार माहिती असणे आवश्यक असते. आदान-प्रदान उपकरणांशी संगणकाला जोडण्याकरिता अशी माहिती असणे आवश्यक असते.

मशीन भाषेत लिहिलेल्या आज्ञावलीचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • संगणकात मशीन भाषेत लिहिलेली आज्ञावली समजण्यासाठी आज्ञावली अनुवाद करण्याची आवश्यकता नाही.
  • मशीन भाषेत लिहिलेली आज्ञावली फार जलद कार्यान्वित केली जाते.
  • संगणकाची हार्डवेअरद्वारे (Hardware) मशीन भाषा परिभाषित केली जाते. हे संगणकाच्या प्रोसेसरवर (Processor) अवलंबून आहे.
  • एका संगणकावर लिहिलेली मशीन भाषा आज्ञावली दुसऱ्या संगणकावर वेगळ्या प्रोसेसरवर सहकार्य करीत नाही.
  • मशीन भाषेमध्ये आज्ञावली लिहणे अवघड आहे कारण ती द्विमान पद्धतीत लिहिणे आवश्यक आहे. उदा. 00010001 11001001. असे कार्यक्रम सुधारणे देखील अवघड आहेत, त्यामुळे मशीन भाषेत फार आज्ञावली लिहिलेली नाहीत.

कळीचे शब्द : #संगणकीयभाषा #असेंब्लीभाषा #आज्ञावली

संदर्भ :

  • ओ’लियरी, जे. टिमोथी, ओ’लियरी, लिंडा आय., ओळख माहिती तंत्रझानाची – एमएस-सीआयटी, मॅक-ग्रॉ हिल एज्युकेशन, प्रा.लि. इंडिया, चेन्नई. 2016-17.
  • गोयल, अनिता, कॅाम्प्युटर फंडामेंटल्स,  पिअरसन, दोर्लिंग किंडरस्ले, इंडिया, प्रा.लि., 2010.

समीक्षक : विजयकुमार नायक