भारताच्या गुजरात राज्यातील पंचमहाल जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख व्यापारी शहर. लोकसंख्या १,४३,६४४ (२०११). हे गांधीनगरच्या पश्चिमेस १२५ किमी. वर असून मुंबई-नवी दिल्ली या पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रस्थानक आहे. येथून लोहमार्गाची एक शाखा आणंद येथे जाते.

काही आख्यायिकांनुसार चांपानेर-पावागड येथील गायी या भागात चरण्यासाठी येत असत. त्यामुळे यास ‘गायींची जमीन’ या अर्थाचे गोधरा (गो-गाय, धरा-जमीन) हे नाव पडले असावे. जैन साहित्यामध्ये याचा उल्लेख गोधपूर असा आढळतो. इ. स. पाचव्या शतकापासूनचे याचे काही उल्लेख आढळतात. याचे ऐतिहासिक नाव गोध्रहक असल्याचा उल्लेख असून त्याची स्थापना धुधुल मंडलिक नावाच्या परमार राजाने केल्याचे मानतात. इ. स. आठवे व तेरावे शतक यांदरम्यानच्या काळात चांपानेर हे महत्त्वाचे व्यापारकेंद्र होते. त्यामुळे गोध्राला फारसे महत्त्व नव्हते. महमुद बेगडा याच्या कारकीर्दीत (इ. स. १४८०) त्याच्या एका प्रांताचे प्रशासकीय केंद्र म्हणून गोध्राला महत्त्व प्राप्त झाले व तेव्हापासून मुगल व ब्रिटिश सत्ताकाळात, तसेच भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हे एक महत्त्वाचे व्यापारी व प्रशासकीय केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले. इ. स. १८३७, १८५७, १८७३, १९४८ या वर्षी येथे लागलेल्या आगींमुळे व झालेल्या जातीय दंगलीतील जाळपोळीमुळे शहराचे खूपच नुकसान झाले.

गोध्रा हे शहर पूर्वीपासूनच जळाऊ व इमारती लाकडांचा व्यापार, चर्मोद्योग, कापडनिर्मिती इत्यादी व्यवसायांसाठी ख्यातनाम आहे. शहरात नगरपालिका (स्था. १८७६) असून माध्यमिक, उच्च माध्यमिक, तांत्रिक शिक्षण तसेच आरोग्यविषयक सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. येथे श्री गोविंद गुरु विद्यापीठ आहे. वैष्णव संप्रदायाच्या प्रमुख बैठकांपैकी (वल्लभाचार्यांच्या भागवत सप्ताहाने पुनित झालेले स्थान) एक बैठक येथे असून नरेश्वर येथील संत रंग अवधूत यांचे हे जन्मस्थळ आहे. त्यामुळे वैष्णव व दत्त सांप्रदायिकांचे पवित्र धार्मिक स्थळ म्हणूनही गोध्राला महत्त्व आहे आणि दत्त सांप्रदायिकांचे पवित्र धार्मिक स्थळ म्हणूनही गोध्राला महत्त्व आहे.

शहरात स्वामी नारायण, अंकलेश्वर महादेव, गोकुळनाथजी, रामजी, सात कैवल इत्यादी मंदिरे, तसेच झहुरखान मशीद, बोहोरा मशीद, जुने मेथडिस्ट चर्च ही धार्मिक ठिकाणे आहेत. नेहरू उद्यान, गोधरक (गोध्रा-हक) हा प्राचीन तलाव, बसस्थानकाजवळील रामसागर तलाव व त्याच्या ईशान्येकडील किल्ला इत्यादी स्थळे पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

गोध्रा येथे वल्लभभाई पटेल व महात्मा गांधी यांची भेट झाल्यानंतर वल्लभभाई पटेलांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याचे मानतात. गोध्रा रेल्वे स्थानकानजीक २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्सप्रेसला आग लागून तीमध्ये सुमारे ५९ लोक मृत्यूमुखी पडले व ४८ जण जखमी झाले होते. या घटनेमुळे हे शहर विशेष चर्चेत आले होते. येथे भारतीय कृषिविज्ञान संस्थेची एक प्रयोगशाळा असून शहराजवळच डाकोर मार्गावर गरम पाण्याचे झरे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी