ओमानचे अरब राजे आणि छ. शिवाजी महाराज यांच्यातील संबंध. व्यापार आणि पोर्तुगीजांसारखा समान शत्रू या दोन कारणांमुळे हे संबंध निर्माण झाले. छ. शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणावर स्वारी केल्यापासून त्यांचा पोर्तुगीजांशी संबंध आला (१६५७). सुरुवातीला मराठा आरमारातही कैक पोर्तुगीज लोक कामावर होते. परंतु पोर्तुगीजांना मराठ्यांचे सागरी सामर्थ्य खुपल्यामुळे वसईच्या पोर्तुगीजांनी त्या कामगारांना फितवून काम सोडायला लावले. यानंतर पोर्तुगीजांनी महाराजांशी संपर्क साधून मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्याची विनंती केली. पुढे महाराजांनी गोव्याजवळील फोंडा किल्ल्यावर स्वारी केली (१६६६), तेव्हा पोर्तुगीजांनी त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी बंडखोर देसायांना मदत पुरवली. याखेरीज पोर्तुगीज प्रदेशात जबरदस्तीने धर्मांतरेही होत असत. या सर्वांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी शिवछत्रपतींनी अखेर गोव्यातील बारदेश प्रांतावर जोराची स्वारी केली (१६६७). यानंतर पोर्तुगीजांनी महाराजांशी मैत्रीचा तह केला. यानंतरही पोर्तुगीजांच्या मदतीमुळे जंजिऱ्याचा सिद्दी बळजोर असल्याचे समजताच महाराजांनी आपला वकील गोव्याला पाठवला. त्याच्यासोबत वाटाघाटींनंतर आणखी एक तह करूनही विशेष उपयोग झाला नाही. बहुतांशी उघड युद्ध नसले, तरी छोट्या कुरबुरी चालू होत्या.
मराठ्यांप्रमाणेच ओमानमधील अरबांशीही पोर्तुगीजांचे शत्रुत्व होतेच. १५५२ साली पोर्तुगीजांनी मस्कतचा ताबा घेतला. ओमानच्या किनारपट्टीवरील त्यांचे वर्चस्व जवळपास शंभर वर्षे टिकले. मात्र १६४८ सालापासून ओमानच्या सत्ताधीश इमामाने मस्कतवर हल्ले सुरू केले आणि १६५० साली शहराचा ताबा घेतला. यानंतर ओमानच्या किनारपट्टीवर इमामाचे वर्चस्व प्रस्थापित झाले. १६२४ पासून ओमानमध्ये यारुबी वंशाचे सामर्थ्य वाढतच होते. या वंशातील सुलतान बिन सैफ याच्या नेतृत्वाखाली ओमानमधून पोर्तुगीजांची हकालपट्टी झाल्यावर १६७० पासून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांच्या ठाण्यांवर त्यांचे हल्ले सुरू झाले.
अशा परिस्थितीत अरब आणि मराठे या दोघांनाही पोर्तुगीजांविरुद्ध काही निर्णायक मदत मिळाली तर हवीच होती. एकमेकांच्या रूपाने ती मदत त्यांच्यापुढे चालूनही आली. अरबांशी शिवछत्रपतींचा संपर्क असल्याचे काही कागदोपत्री दाखले १६६४ पासून मिळतात. छ. शिवाजी महाराज ओमानच्या राजाशी मैत्रीचा करार करत असल्याची हूलही उठली होती (१६७०). परंतु दोघांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध प्रथम दिसला तो १६७९ सालच्या एका चकमकीत. त्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात काही पोर्तुगीज व्यापारी जहाजे माल लादून गोव्याहून गुजरातमधील खंबायत येथे चालली होती. संरक्षणासाठी म्हणून सोबत दोन फ्रिगेट प्रकारातील जहाजे बरोबर होती. गोव्यातून निघाल्यावर वाटेत वेंगुर्ला बंदर लागले. ते बंदर व त्याच्या आसपासचा प्रदेश तेव्हा शिवछत्रपतींच्या ताब्यात होता. हा व्यापारी ताफा वेंगुर्ल्याजवळ येताच सात अरबी लढाऊ जहाजांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामुळे जवळच्या तेरेखोल नदीत पोर्तुगीजांनी आश्रय घेतला. पोर्तुगीज फ्रिगेटवरील कमांडर जोसेफ डि मेलो डि काश्त्रु याने व्यापारी जहाजे वेंगुर्ला बंदरात ठेवून फ्रिगेटसह अरबांचा समाचार घ्यायला निघून गेला.
हातघाईच्या पोर्तुगीज-अरब लढाईत सातपैकी तीन अरब जहाजे निकामी झाली, तर उरलेली चार जहाजे तेथून निसटली. लढाईनंतर डि मेलो डि काश्त्रु आपली व्यापारी जहाजे परत घेण्याकरिता आला असता वेंगुर्ल्याचा मराठा सुभेदार तानाजी राम याने त्याला अडवले. तानाजी रामचे म्हणणे होते की, पोर्तुगीजांनी वेंगुर्ल्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केला असून छ. शिवाजी महाराजांनी स्वत: परवानगी दिली तर आणि तरच पोर्तुगीज जहाजे सोडता येतील. हे ऐकून डि मेलो डि काश्त्रु आपल्या वरिष्ठांशी वाटाघाटी करण्यासाठी तडक गोव्याला निघून गेला.
गोव्याला झालेल्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला की, १६६७ च्या तहान्वये मराठ्यांच्या हद्दीतील बंदरांमध्ये प्रवेशाचा पोर्तुगीजांना पूर्ण हक्क आहे, हे तानाजी रामला दाखवून जहाजांची सुटका करून घ्यावी. हे न झाल्यास अखेरचा उपाय म्हणून पोर्तुगीज फ्रिगेटजवळ दबा धरून बसलेल्या उर्वरित अरब जहाजांवर हल्ला करून बुडवून टाकावे. तत्कालीन पोर्तुगीज व्हाईसरॉय आन्तोनियो पैस द सान्दी याने छ. शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिले. त्यात तानाजी रामने केलेल्या १६६७ च्या तहाच्या उल्लंघनाबद्दल तक्रार केली होती. त्याला लगेच उत्तर मिळाले, ते असे की जहाजे पकडली ती अरबांनी, मराठ्यांचा त्यात काही संबंध नाही. यावर व्हाईसरॉयने पुन्हा एकदा तक्रार केली की, हे उत्तर सत्याला धरून नाही. लवकरात लवकर पोर्तुगीज जहाजे सोडून द्यावीत, अशी विनंतीही त्याने केली. यात अंदाजे दीड महिना उलटूनही छ. शिवाजी महाराज किंवा तानाजी राम या दोघांपैकी कुणाकडूनही उत्तर न आले नाही. तेव्हा पोर्तुगीजांनी ठरवले की, तानाजी रामशी वाटाघाटी पुन्हा एकदा केल्या जाव्यात. अरब हे पोर्तुगीजांचे शत्रू असून, पोर्तुगीज व छ. शिवाजी महाराज यांचा मैत्रीचा करार असल्याने महाराजांनी अरबांना झुकते माप देऊ नये, असे त्यांना सांगावे असेही ठरले.
यानंतर महिनाभर मराठ्यांकडून कसलीच हालचाल झाली नाही. तेव्हा तानाजी रामसोबत वाटाघाटी करण्यासाठी मानुएल येरिंकिझ नामक पोर्तुगीज प्रतिनिधी पुन्हा वेंगुर्ल्याला गेला. त्याला सूचना होत्या की, वाटाघाटी फिसकटल्यास अरब जहाजे मागचा पुढचा विचार न करता हल्ला करून बुडवून टाकावीत. तरीही त्याने तानाजी रामसोबत चर्चा करण्यात जवळपास महिना घालवला. दरम्यानच्या काळात अरबांनी तेरेखोल नदीत आश्रय घेऊन आपली जागा बळकट केली होती. त्यांनी नदीच्या दोन्ही बाजूंना चर खणून तोफाही बसवल्या होत्या. यात त्यांची मदत करण्यासाठी मराठ्यांच्याच आज्ञेने जवळपास चारशे स्थानिक मुसलमानही सहभागी होते. खुद्द महाराजांनीही अरबांवरचा हल्ला टळावा म्हणून स्वत:ची दोन जहाजेही पाठवली होती. पोर्तुगीजांनी जेव्हा ही जय्यत तयारी पाहिली, तेव्हा त्यांना कळून चुकले की या परिस्थितीत जर अरबांवर हल्ला केला तर खूपच महागात पडेल. ८ मार्च १६७९ रोजी गोव्यात यासंबंधी पुन्हा एकदा चर्चा झाली, तेव्हा अरबांवर प्रत्यक्ष हल्ला करण्याऐवजी त्यांची नाकेबंदी करावी असा निर्णय घेतला गेला.
कोकणपट्टीवरच्या तत्कालीन अन्य सत्ता उदा., जंजिऱ्याचा सिद्दी, इंग्रज, डच व फ्रेंच यांचा मराठ्यांना पोर्तुगीजांविरुद्ध फार काही उपयोग होण्यासारखा नव्हता. यांपैकी फ्रेंचांचे विशेष सामर्थ्य भारतात तेव्हा नव्हते. डचांची मदत मराठ्यांना मिळण्याचा संभव असला, तरी त्यांनी प्रत्यक्ष मदत न करणेच पसंत केले. सिद्दीशी मराठ्यांचे शत्रुत्व होतेच. त्याखेरीज इंग्रजांचेही मराठ्यांच्या नाविक सामर्थ्याबद्दल विशेष अनुकूल मत नसल्यामुळे ओमानच्या अरबांची मदत घेणे साहजिकच होते. ही युती उपभयपक्षी फायदेशीर होती. लष्करी सहकाऱ्याखेरीज व्यापारालाही या युतीमुळे चालना मिळाली. कोकणात राजापूर येथे अरबांची एक वखार होती. तेथे ते मराठ्यांना आवश्यक दारूगोळा, अरबी घोडे इत्यादी वस्तू विकत. दोघांमधील व्यापार मोठा व उभय बाजूंना पोषक होता.
संदर्भ :
- Ibrahim Yahya Zahran, Oman e Portugal (1650-1730), Politica e Economia, Al-Busaidi, PhD Thesis, Universidade De Lisboa, Pp.146-171, Portugal, 2010.
- Kantak, M. R. ‘Shivaji-Arab relations vis-à-vis the Portuguese’, Bulletin of the Deccan College Research Institute, Vol. 50, GOLDEN JUBILEE, pp. 245-252, Pune, India, 1990.
समीक्षक : सचिन जोशी