प्रस्तावना : सार्वजनिक आरोग्य परिचर्येमध्ये सार्वजनिक आरोग्याची तत्त्वे‍ आणि आरोग्याची संरक्षणात्म सेवा पद्धतीचा उपयोग करताना परिचारिका आपल्या व्यावसायिक ज्ञान व कौशल्याचा वापर करते. सार्वजनिक आरोग्य परिचारिका ही आरोग्य सेवा संघातील (health team ) एक महत्त्वाचा घटक आहे. ह्या परिचारिका ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा स्तरीय व्यवस्थापन (District Public Health Nurse ) म्हणून कार्यरत असतात.

व्याख्या : “सार्वजनिक आरोग्य परिचर्या ही एक विशिष्ट आरोग्य सेवा/शुश्रूषा देणारी व्यवस्था असून ज्यामध्ये परिचारिका या व्यावसायिक परिचर्या (Professional Nursing) आणि लोकांच्या सर्वसाधारण आरोग्याची काळजीपूर्वक सेवा देणारी संरचना यांचा समावेश करून लोकांना आरोग्य सेवा पुरवितात.” (नॅशनल लीग फॉर नर्सिंग, १९५९)

संकल्पना : सार्वजनिक आरोग्य परिचारिका व्यक्ती व कुटुंब निहाय आरोग्य सेवा पुरविते. या आरोग्य सेवा व्यक्ती व समूह यांना देण्यात येतात.

स्वरूप आणि व्याप्ती : सार्वजनिक आरोग्य परिचारिकेमार्फत आरोग्य श्रेणीतील वृद्धी सेवा, आरोग्य संवर्धन सेवा, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, उपचारात्मक आरोग्य सेवा, पुनर्वसनात्मक आरोग्य सेवा, आपत्कालीन आरोग्य सेवा, इतर सामाजिक व सामूहिक कार्यक्रम इ. सेवा  देण्यात येतात. या सेवा कुटुंबातील सर्व व्यक्ती, विविध कार्यालयीन कर्मचारी वर्ग, शाळा किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग, कारखान्यामधील कामगार आणि समाजातील सर्व घटक तसेच आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण इत्यादींना दिल्या जातात.

सार्वजनिक आरोग्य परिचर्येची प्रमुख तत्त्वे (Principles of Public health Nursing) :

  • सार्वजनिक आरोग्य परिचर्या ही वैशिष्टपूर्ण परिचर्या असून त्यासाठी एक वर्षाचे विशिष्ट प्रशिक्षण देण्यात येते.
  • परिचर्येचे नियोजन हे लोकांच्या सर्वसाधारण आरोग्याच्या गरजांवर अवलंबून असते.
  • या आरोग्य सेवेत लोकांचा सहभाग व आरोग्याविषयी जागरूकता महत्त्वाची असते.
  • सार्वजनिक आरोग्य परिचर्या देताना एक व्यक्ती किंवा कुटुंबातील एक सदस्य हा केंद्र बिंदू न मानता संपूर्ण कुटुंब हे आरोग्य सेवेसाठी केंद्रीभूत समजले जाते.
  • आरोग्य समस्या निवारण्यासाठी समुपदेशन व आरोग्यशिक्षण हे महत्त्वाचे असते.
  • सार्वजनिक आरोग्य परिचर्या देताना कुटुंब व कुटुंबातील सदस्यांचे आरोग्याचे मूल्यमापन करणे हा आरोग्य सेवेचा मूळ हेतू असतो.
  • सार्वजनिक आरोग्य परिचारिका ही व्यावसायिक परिचारिका म्हणून प्रशिक्षित असून ती आरोग्य सेवा देणाऱ्या चमूचा एक सभासद असते.
  • सार्वजनिक आरोग्य परिचारिका रुग्णास अथवा प्रत्येक व्यक्तीस सेवा देतांना सार्वजनिक वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचानांप्रमाणे सेवा देतात.
  • सार्वजनिक आरोग्य परिचारिका रुग्णास वस्तू किंवा पैशांच्या स्वरुपात मदत करीत नाही. परंतु सामाजिक व कल्याणकारी संस्थाविषयी माहिती देऊन मदत करतात.
  • सार्वजनिक आरोग्य परिचारिकेच्या कामाचे पर्यवेक्षण/मूल्यमापन हे सार्वजनिक वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फतच केले जाते.
  • सार्वजनिक आरोग्य परिचारिकांना अद्ययावत ज्ञान व कौशल्ये याविषयी प्रशिक्षण निरंतर व सातत्यपूर्ण शिक्षणाद्वारे दिले जाते.
  • सार्वजनिक आरोग्य परिचारिका स्वतःचा व व्यावसायिक विकास होण्यासाठी जबाबदार असतात.

सार्वजनिक आरोग्य परिचारिकेची कार्ये :

  • आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थेचे सभासद असणे.
  • कुटुंब आरोग्य सर्वेक्षण करणे. गरजू कुटुंबांचा शोध घेणे.
  • शालेय आरोग्य तपासणी आणि आरोग्य सेवेचे नियोजन करणे.
  • कुटुंबातील आजारी अथवा जखमी आणि क्लिष्ट आजारी व्यक्तींना शुश्रूषा पुरविणे.
  • आरोग्य शिक्षण व समुपदेशन करणे.
  • शारीरिक, मानसिक व सामाजिक स्तरावरील आरोग्याच्या कल्याणकारी सेवांसाठी संदर्भ पुरविणे आणि त्याविषयी फेर आढावा घेणे.
  • संवर्धनात्मक, प्रतिबंधात्मक आणि पुनर्वसनात्मक सेवा पुरविणे.

सारांश : सार्वजनिक आरोग्य परिचारिका जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवांचे नियोजन करतात व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय यांच्याशी समन्वय साधून दिलेल्या आरोग्य सेवांचे मूल्यमापन करण्याची व फेर नियोजन करण्याची जबाबदारी पार पडतात.

संदर्भ :

  • Ruth B. Freeman, Public Health Nursing Practice, 3rd edition, Philadelphia and London, 1963.