प्रस्तावना : परिचर्येचा उगम आरोग्याच्या मूलभूत आणि सार्वत्रिक गरजांमधून होतो. आरोग्याबाबतची सर्वांत महत्त्वाची आणि अत्यावशक गरज म्हणजे “सेवा शुश्रूषा” होय. योग्य शुश्रूषेमुळेच आजारपणात व्यक्तीस आराम आणि आधार मिळतो .

वैद्यक शास्त्राप्रमाणेच परिचर्या हेदेखील शास्त्र आहे तसेच ती एक कला देखील आहे. परिचर्या शास्त्राची उभारणी जीवशास्त्र आणि नैसर्गिक शास्त्राच्या भक्कम पायावर झालेली आहे. याव्यतिरिक्त परिचर्या शास्त्र सामाजिक, वर्तनविषयक आणि व्यवस्थापकीय शास्त्रातील ज्ञानाचाही लाभ उठवीत आहे.

सामाजिक आरोग्य परिचर्या आणि परिचारण प्रक्रियेची तत्त्वे सारखीच असली तरी सामाजिक आरोग्य परिचरिर्येत परिचारिकेला व्यापक संदर्भात म्हणजे समाजाच्या संदर्भात या तत्त्वांची अंमलबजावणी  करावी लागते.

व्याख्या : १. सामाजिक आरोग्य : सामाजिक आरोग्य म्हणजे समाजातील घटकांचा आरोग्याचा दर्जा व त्यांचे आजारासंबंधित प्रश्न हाेय. (जागतिक आरोग्य संघटना, १९७४)

२. सामाजिक आरोग्य परिचर्या : समाजाच्या गरजा व सामाजिक आरोग्य कार्यक्रमाशी सुसंगतपणे व्यक्तीला प्रत्यक्ष त्याच्या घरात, शाळेत, कारखान्यात किंवा विविध सामाजिक आरोग्य केंद्रांत परिचर्या सेवा पुरविणे म्हणजेच सामाजिक आरोग्य परिचर्या होय.

३. सामाजिक आरोग्य परिचर्या म्हणजेच रुग्णालयासह समाजाशी प्रत्यक्ष संपर्क करत रुग्ण तसेच निरोगी व्यक्तीला आरोग्य सेवा पुरविणे.

सामाजिक आरोग्य परिचर्येची उद्दिष्टे :

 • समाजाचा आरोग्य दर्जा उंचाविणे.
 • आरोग्याचे संवर्धन करणे.
 • व्यक्तीच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास सहाय्य करणे.
 • आजार व अपंत्वावर नियंत्रण व प्रतिबंध करणे.
 • गरजू व्यक्तीस सर्वांगीण आरोग्य सेवा प्रदान करून आयुर्मान वाढविणे.
 • आरोग्य सेवेमध्ये प्रत्यक्ष समाजाचा सहभाग वाढविणे व सहकार्यातून आरोग्य भावना प्रस्थापित करणे.

सामाजिक आरोग्य परिचर्येकरिता व्यावसायिक संधी : सामजिक सामाजिक आरोग्य परिचर्येस खालील आरोग्य क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत.

 • गृहभेटी (Home Visit)
 • शुश्रूषालय (Nursing Home)
 • माता आणि बाल आरोग्य व कुटुंब नियोजन (MCH)
 • शालेय आरोग्य परिचर्या ( School Health Nursing)
 • सामजिक आरोग्य परिचर्या (Public Health Nursing)
 • औद्योगिक परिचर्या (Industrial Nursing)
 • निवासी परिचर्या (Hospice Care)
 • मानसिक आरोग्य परिचर्या (Mental Health Nursing)
 • पुनर्वसन केंद्र ( Rehabilitation Centre)
 • वृद्धोपचार विषयक परिचर्या सेवा ( Geriatric Nursing)

संदर्भ :

 • देवकते, बिरुदेव, इझी जी. एन.एम.- I, प्रथम आवृत्ती, जानेवारी २०१४.
 • राहणे, संजय, सामाजिक आरोग्य परिचर्या,  प्रथम आवृत्ती, २०१४.

समीक्षक : सरोज उपासनी