राणी दुर्गावती : (५ ऑक्टोबर १५२४ – २४ जून १५६४). सोळाव्या शतकातील गोंडवाना (गडामंडला) साम्राज्याची कर्तृत्ववान व पराक्रमी राणी. त्यांचा जन्म चंदेलवंशीय महोबा येथील राजपूत घराण्यात झाला. किरातराय (कीर्तिसिंह) व राणी कमलावती यांच्या त्या एकुलत्या राजकन्या. दुर्गावतींना तीरकमठा, तलवारबाजी, घोडेस्वारी, नेमबाजी, गोळाफेक, भालाफेक इत्यादी शस्त्रविद्येचे शिक्षण मिळाले. त्याचबरोबर त्यांनी संस्कृतशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला होता.
दुर्गावती महोबाच्या राजदरबारात राजकुमाराच्या वेषात सहभागी होत. शिकार करणे हा त्यांचा आवडता छंद होता. अशाच एका शिकारीच्या प्रसंगी त्यांची गोंडवाना साम्राज्यातील जंगलात गोंडवानाचे राजकुमार वीर दलपतशाह मडावी यांच्याशी भेट झाली. पुढे त्यांनी त्यांच्याशी आंतर्विवाह केला (१५४२); परंतु दुर्गावतींनी राजपूताशी विवाह न केल्यामुळे महोबाचे जमीनदार व राजपूत सरदार बदनसिंह आणि गिरिधारीसिंह हे त्यांच्या विरोधात गेले. दलपतशाह व दुर्गावतींना वीरनारायण हा मुलगा झाला (१५४५). पुढे दलपतशाहाचे अल्पकाळातच निधन झाले (१५४८). त्यामुळे वीर नारायण यास गादीवर बसवून दुर्गावतींनी अधेर कायस्थ आणि मान ब्राह्मण या दोन प्रमुख दिवाणांच्या मदतीने राज्यकारभार केला.
दुर्गावतींनी सु. पंधरा वर्षे गडामंडलाचा कारभार चालविला. त्यांच्या काळात गडामंडला हे गोंड राज्यातील एक संपन्न व समृद्ध राज्य म्हणून उदयास आले. गडामंडलातील सु. १२,००० गावे थेट दुर्गावतींच्या ताब्यात असल्याचे उल्लेख सापडतात. त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी दुर्ग, महाल, तलाव, मंदिर इत्यादींचे बांधकाम केल्याचे अवशेष पाहायला मिळतात. उदा., जबलपूर जवळील राणीतल अथवा राणी तलाव. तसेच त्यांनी इतर राज्यांसोबत व्यापारी संबंध जोपासले होते. गोंडवाना साम्राज्याचा हा सुवर्णकाळ होता. राज्यात सुवर्णचलनाद्वारे वस्तुविनिमय होत. दुर्गावतींच्या ताब्यात ५२ गड आणि ५७ परगणे मिळून राज्याचा विस्तार हा सु. ७७,७०० चौ. किमी. पर्यंत होता. तसेच २०,००० घोडेस्वार, १००० हत्ती आणि मोठ्या प्रमाणात पायदळ असे विशाल सैन्य बळ त्यांच्याकडे होते. त्यांनी माळवा प्रदेशातील बहादुरशहा व मिआणा अफगाण यांचा लढाईत पराभव केल्याचे उल्लेख सापडतात (१५५५; १५६०).
दुर्गावतींच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे महोबा राज्याची प्रजा विखुरली गेली. याचा मोगलांनी फायदा घेतला. मोगलांच्या आक्रमणानंतर बदनसिंह आणि गिरिधारीसिंह यांनी कपटनीतीने गोंडवाना राजदरबारात आश्रय घेतला. दुर्गावातींनी तत्कालीन मोगल राजवटीला लागून असलेल्या इतर भागांतही आपली सत्ता वाढविली होती. त्यामुळे मोगल सम्राट अकबराने गडामंडला काबीज करण्याचे प्रयत्न सुरू केले. अकबराने माळव्यातील करा माणिकपूरचा सुभेदार असफखान (ख्वाजा अब्दुल मजीद) याच्यावर गोंडवाना ताब्यात घेण्याची जबाबदारी सोपविली. असफखानाने गोंडवानाच्या विरोधकांना एकत्र आणले आणि बिहडच्या जंगलात दुर्गावतींविरुद्ध युद्ध पुकारले. दुर्गावती आपल्या सैन्यांसह असफखानवर तुटून पडल्या. यात मोगल सैन्याची धूळदान झाली. या वेळी असफखानाने पळ काढला. त्यानंतर त्याने रणनीती बदलून मोगल सैन्यांची एक तुकडी आणि बदनसिंह व गिरधारीसिंहासह रजपूत सैन्यांची दुसरी तुकडी घेऊन पहाटे दोनच्या सुमारास दुर्गावतींवर नरई नाल्याच्या परिसरात पुन्हा नव्याने हल्ला केला. या युद्धात राजकुमार वीरनारायण मोठ्या हिमतीने लढला; परंतु जखमी झाल्याने त्याला चौरागड येथे पाठविण्यात आले.
गोंडवाना सैन्य पहाडी युद्धात तरबेज असल्याचे बदनसिंह याला कल्पना होती. त्यामुळे त्याने गोंड सैन्याला नरई नाल्याच्या पलीकडे जाऊ देऊ नये, असे असफखानाला सांगितले. त्यानुसार नरई नाल्याचा बांध फोडण्यात आला, त्यामुळे नाल्याला पूर येऊन गोंड सैन्य अडकून पडले. त्यातच असफखानाकडील तोफा आणि बंदुकांच्या अचानक माऱ्यामुळे गोंड सैन्यांत गोंधळ माजला. यात अनेक गोंड सैन्य मारले गेले आणि दुर्गावतीही जखमी झाल्या. दुर्गावतींनी शत्रूच्या हातून मृत्यू न पतकरता पोटात खंजीर खुपसून वीरांगनेचे मरण पतकरले.
कार्यक्षम शासनकर्त्री म्हणून त्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. जबलपूरजवळ त्यांची समाधी आहे.
संदर्भ :
- Beveridge, H., Trans., Akbarnama of Abul Fazl, Vol. 2, The Asiatic Society, Calcutta, 1907.
- Eyer Chatterton, D. D., The story of Gondwana, Sir Isaac Pitman & Sons Ltd., London, 1916.
- काळे, या. मा., गोंड लोकांचा इतिहास, नागपूर, २००३.
- शेळमाके, वामन, द ग्रेट वुमन ऑफ द वर्ल्ड – वीरांगना महाराणी दुर्गावती, भंडारा, २०१९.
समीक्षक : सचिन जोशी