मोगलांची बाल्ख मोहीम : (१६४६-४७). मोगलांनी उझबेकी आक्रमण थोपविण्यासाठी अफगाणिस्तानातील बाल्ख येथे काढलेली एक महत्त्वाची पण अल्पकालीन मोहीम.

मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा मूळचा उझबेकिस्तानमधील फरगाना प्रांतातील होता. त्या पुढील मोगल सम्राट भारतातच स्थायिक झाले असले, तरी घराण्याचे मूळ स्थान म्हणून आणि सतत आक्रमण करणाऱ्या उझबेकांना प्रतिबंध म्हणून मध्य आशिया व भारताच्या सीमेवरील काही मोक्याच्या भागावर कब्जा असावा, अशी धारणा असल्याने त्या कामी अनेकांनी प्रयत्न केले; परंतु हुमायून (१५४९) व शाहजहान (१६४६-४७) या दोघांनीच तेथे प्रत्यक्ष स्वाऱ्या केल्या. हुमायूनने उझबेकांवर विजय मिळवूनही भारतातील घडामोडींमुळे त्याला भारतात परत फिरावे लागले. शाहजहान राज्यारूढ झाल्यावर त्याने उझबेकांना पैसे पाठवूनही त्यांनी काबूलवर स्वारी केली (१६२९). याखेरीज १६४० साली अफगाणिस्तानातील हेरात येथे इराणमधील सफावी राजघराण्याने नेमलेला सुभेदार हसन खान शामलू याला पाठवलेल्या पत्रात शाहजहानने पैतृक मुलूख आणि तैमूरलंगाच्या कबरीवर कब्जा मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली होती. यावर उत्तर पाठवताना हसन खानने स्वारीची निश्चित वेळ कळवण्याची विनंती केली होती. मोगल आणि सफावी फौजांनी मिळून उझबेकांवर हल्ला करावा, अशी त्याची योजना होती. परंतु प्रत्यक्ष स्वारी सुरू होण्यास यानंतर सहा वर्षे लोटली आणि ती अखेरीस सफावी साहाय्याविनाच झाली.

सन १६३९ पासूनच काही प्रमाणात याची सुरुवात झाली होती. शाहजहानने शिकारीसाठी काबूलला आल्याची बतावणी करून उझबेकांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला. नझ्र मुहम्मद आणि इमाम कुली या उझबेक भावांनी संभाव्य मोगल आक्रमण पाहता आपसांतील वैर थांबवून एकजुटीने मोर्चेबांधणी केली. त्यामुळे शाहजहानचा बेत फसला. पुढे वृद्धापकाळामुळे इमाम कुलीने आपला धाकटा भाऊ नझ्र मुहम्मदच्या हाती सत्ता सोपवल; परंतु हे न आवडल्याने तेथे पुन्हा बंडाळी सुरू झाली. त्याचा फायदा घेऊन १६४५ साली खलील बे नामक सरदाराच्या आधिपत्याखालील मोगल फौजेने कहमर्दचा मोक्याचा किल्ला कोणत्याही प्रतिकाराविना बळकावला; परंतु तेथे अपुरे सैन्य ठेवल्याने उझबेकांनी तो पुन्हा हस्तगत केला. इकडे नझ्र मुहम्मदने आपल्याविरुद्धची बंडाळी मोडून काढण्यासाठी मोगलांशी संपर्क साधला. याखेरीज तेथील मुसलमानांचे मुसलमानेतर टोळीवाल्यांच्या हल्ल्यांपासून रक्षण करण्याच्या बहाण्याखालीही शाहजहानने राजपुत्र मुरादबख्शला ६०,००० फौजेनिशी काबूलच्या वायव्येकडील बाल्खला पाठविले. मोगलांची तयारी पाहून नझ्र मुहम्मदला संशय वाटू लागला. स्वत:ची शाश्वती वाटत नसल्याने त्याने इराणमधील शाह अब्बासकडे आश्रय घेतला. इकडे शाहजहान व नझ्र मुहम्मदमधील पत्रव्यवहारांत मात्र शाहजहानने परोपकाराची भाषा कायम ठेवली.

मुरादबख्शने बाल्खचा लीलया ताबा घेतला. शाहजहान काबूलहून लाहोरला परतला आणि मुरादबख्शला मदत करण्यासाठी त्याने औरंगजेबाला पाठवले. नझ्र मुहम्मदाचा मुलगा अब्दुल अझीझ हा बुखाऱ्याहून बाल्खवर आक्रमणाची तयारी करत असल्याचे समजताच शाहजहान पुन्हा काबूलला गेला. त्या दरम्यान बाल्खमध्ये अब्दुल अझीझचा भाऊ सुभान कुलीखानच्या प्रतिनिधीने औरंगजेबाला सांगितले, की मोगलांनी बाल्खचा ताबा नझ्र मुहम्मदाला देण्याऐवजी सुभान कुलीखानास द्यावा. त्यातच अब्दुल अझीझ आणि सुभान कुलीखान यांच्या एकत्र सैन्याने मोगल सैन्यावर हल्ला केला; परंतु औरंगजेबाने आठवडाभर झालेल्या लढाईनंतर त्यांचा पराभव केला.

अशाप्रकारे मोगलांनी उझबेकांपासून यशस्वी रीत्या बाल्खचे रक्षण केले, तरी हा विजय अल्पजीवी ठरला. हिवाळ्यात मोगलांची स्थिती अधिकाधिक वाईट होऊ लागली. याचे मुख्य कारण म्हणजे आल्मानी टोळीवाले. बाल्खजवळची जवळपास पूर्ण शेतजमीन त्यांच्यामुळे उजाड झाली होती. मोगलांनी शेतकऱ्यांना बियाणे देऊन व नांगरटीसाठी मदत करूनही बहुतांश धान्य आल्मानी हल्ल्यांमुळे नष्ट झाले. मोगल सैन्यातील औरंगजेबासह बहुसंख्य अधिकाऱ्यांना या परिस्थितीचा कंटाळा येऊन भारतात परतायची ओढ लागली होती. त्यामुळे शाहजहानलाही मागे हटून बाल्ख हे नझ्र मुहम्मदच्या हवाली करावे, असे वाटू लागले होते. इतक्यातच नझ मुहम्मद इराणहून उझबेक मुलुखात आला. औरंगजेबाने त्याच्या दोन्ही मुलांचा पराभव केल्याची बातमी कळल्यावर त्याने औरंगजेबाला शरणागतीचे पत्र लिहून दिले. ते पत्र औरंगजेबाने शाहजहानला दिल्यावर शाहजहानने सांगितले की, नझ्र मुहम्मद जातीने औरंगजेबासमोर आल्यास त्याला बाल्ख व आसपासचा प्रदेश बहाल केला जाईल आणि मोगल सैन्यही भारतात परतेल.

औरंगजेबाने नझ्र मुहम्मदचा नातू कासिम सुलतान याच्याकडे बाल्खचा ताबा देऊन १६४७ च्या उत्तरार्धात मोगल सैन्याने परतीचा रस्ता धरला. वाटेतही मोगलांना अडचणीचे रस्ते, खडतर हवामान आणि टोळीवाल्यांचे हल्ले यांचा सामना करावा लागला. या एकूण मोहिमेत मोगलांना तब्बल चार कोटी रुपये खर्च आला. मोहिमेतील अपयशाचे खापर औरंगजेबाने मुरादबख्शच्या उतावळेपणावर फोडले. यानंतरही शाहजहानने नझ्र मुहम्मदाला लाखो रुपये व भेटवस्तू पाठवल्या, कारण मोगल स्वाऱ्यांमुळे त्या प्रांताची प्रचंड वाताहत झाली होती. या मोहिमेत अनेक मोठमोठ्या सरदारांनी भाग घेतला होता उदा., मिर्झाराजे जयसिंग. या स्वारीबरोबर आपली पितृभूमी असलेला मध्य आशियाचा भाग जिंकून घेण्याचे मोगलांचे स्वप्न अखेरीस खऱ्या अर्थाने भंगले. यानंतर कोणतीही मोगल मोहीम त्या दिशेने झाली नाही.

मोगल सैन्याने बाल्खवर ताबा मिळवल्यानंतर तेथे पाडलेली काही नाणी ज्ञात आहेत. टांकसाळीचे नाव बाल्ख असे नमूद असणाऱ्या साधारण १०-११ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मोहरा, टांकसाळीचे नाव नमूद नसलेली ४-५ ग्रॅम वजनाची चांदीची शाहरुखी आणि एकचतुर्थांश रुपयाच्या वजनाचे चांदीचे “निसार” प्रकारातील नाणे हे त्याचे मुख्य प्रकार होत. सोन्याच्या मोहरा दुर्मीळ असून चांदीची नाणी तुलनेने जास्त उपलब्ध आहेत. बाल्ख हा प्रदेश मुळात मोगली आधिपत्याखाली नसल्याने तेथील चलनव्यवस्था मोगली चलनव्यवस्थेपेक्षा वेगळी होती. सुरुवातीला मोगली नाणी स्थानिक जनतेकडून स्वीकारली गेली नाहीत. त्यामुळे स्थानिक चलनपद्धतीशी साधर्म्य असलेली नाणी पाडावी लागली. मुरादबख्श बाल्खहून परतल्यानंतर सादुल्ला खान नामक मोगल वजीराने तेथे या चलनव्यवस्थेत लक्ष घालून ती सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्याची नोंद तत्कालीन साधनांत सापडते.

संदर्भ :

  • Foltz, Richard, ‘The Mughal occupation of Balkh 1646-1647ʼ, Journal of Islamic Studies, Vol. 7, Issue 1, Oxford University Press, UK, 1996.
  • Bhandare, Shailendra, ‘Numismatic Reflections of Shahjahan’s Balkh Campaign, 1646-47ʼ, Numismatic Digest, Vol. 39, IIRNS Publications, Mumbai, India, 2015.

                                                                                                                                                                              समीक्षक : सचिन जोशी