कवी प्रदीप : (६ फेब्रुवारी १९१५ – ११ डिसेंबर १९९८). हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी. त्यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यामधील बडनगर (जि. उज्जैन) या छोट्या शहरामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण राय भट्ट (दवे). पुढे दवेचे द्विवेदी झाले. कवी प्रदीप यांनी त्यांचे नाव रामचंद्र नारायण द्विवेदी असे लावायला सुरुवात केली. कवी प्रदीप यांचे मोठे भाऊ कृष्णवल्लभ द्विवेदी हे प्रसिद्ध लेखक होते. लहानपणापासून सतत दोघेही सोबत राहिल्याने कवी प्रदीप यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या साहित्यिक रुचीचा खोल प्रभाव पडला.
कवी प्रदीप यांचे शालेय शिक्षण इंदूरच्या महाराजा शिवाजीराव हायस्कूलमध्ये सातवीपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी अलाहाबादच्या (आता प्रयागराज) क्रिश्चियन कॉलेजमधून इंटरइमीजिएटची परीक्षा उत्तीर्ण केली (१९३५). त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली होती. त्याबरोबरच त्यांची काव्यलेखनाची आणि काव्यवाचनाची आवड दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होती. ते त्यांच्या कवितांचे गायन करून त्या ऐकवत असत. याच काळात त्यांनी आपले उपनाव ‘प्रदीप’ असे घेऊन रामचंद्र नारायण द्विवेदी ‘प्रदीप’ या नावाने कवितालेखन करायला सुरुवात केली. अलाहाबादमधील साहित्यिक वातावरणात त्यांच्या या आवडीला पोषक वातावरण मिळाले. तसेच तेथे हिंदी साहित्य जगतातील महादेवी वर्मा, भगवतीचरण वर्मा, प्रफुल्लचंद्र ओझा ‘मुक्त’, रमाशंकर शुक्ल ‘रसाल’ इत्यादी थोर साहित्यिकांशी त्यांचा परिचय झाला.
कवी प्रदीप त्यांच्या भावाबरोबर लखनौला आले. लखनौ विश्वविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी घेतली (१९३९). या दरम्यान ते कवितालेखन करत होते आणि कविसंमेलनात भागही घेत होते. यावेळी त्यांनी एका कविसंमेलनात सादर केलेली ‘पानीपत’ या कवितेला श्रोत्यांचा खूप प्रतिसाद मिळाला. त्यांनी ऋषि गाथा या नावाने दयानंद सरस्वती यांच्या जीवनावर ३०० ओळींची कविता लिहिली होती.
मुंबईमधील एका कविसंमेलनामध्ये कवी प्रदीप यांच्या कविता बाँबे टॉकीजचे सहदिग्दर्शक एन. आर. आचार्य यांनी ऐकल्या आणि त्यांची ओळख बाँबे टॉकीजचे मालक, दिग्दर्शक हिमांशू राय यांच्याशी करून दिली. त्यांनी अशोककुमार व देविका रानी अभिनित कंगन (१९३९) या चित्रपटासाठी गीतलेखन करण्याचा प्रस्ताव कवी प्रदीप यांना दिला. या चित्रपटासाठी त्यांनी चार गीते लिहिली. त्यांपैकी तीन गीते त्यांनी स्वत:च गायली होती. हिमांशू राय यांनी त्यांना गीतलेखनाकरिता त्यांचे मोठे नाव बदलून त्याऐवजी सर्वांना लक्षात राहील असे नाव घेण्याविषयी सुचवले. तेव्हापासून त्यांनी ‘कवी प्रदीप’ या नावाने लेखन करायला सुरुवात केली. अशाप्रकारे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या गीतलेखनाची सुरुवात झाली. शशधर मुखर्जी दिग्दर्शित बंधन या चित्रपटासाठी त्यांनी १२ गीते लिहिली (१९४०). ‘चल चल रे नौजवान’ हे त्यातले गीत विशेष गाजले. हे गीत तरुण युवकांना स्वातंंत्र्य चळवळीशी जोडण्यासाठी लिहिले होते. स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनांत, प्रभातफेरीत हे गीत नेहमी असे. सिंध आणि पंजाबच्या विधानसभेने या गीताला राष्ट्रगानाचा मान दिला. विधानसभेतही हे गीत गायले जाई. त्यातले दुसरे ‘चने जोर गरम, मैं लाया मजेदार’ हे ही गीत खूप गाजले. बाँबे टॉकीजच्या पुनर्मिलन अंजान, झूला आणि नया संसार या चित्रपटांची गीतेही त्यांनी लिहिली.
कवी प्रदीप गांधीवादी विचारसरणीचे समर्थक होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. थोर भारतीय क्रांतिकारक चंद्रशेखर आझादांना दिलेल्या शिक्षेने ते व्यथित झाले. त्यांच्या हौतात्म्यावर त्यांनी ज्वलंत काव्यरचना केली. त्यांची बहुतांश काव्यरचना ही देशप्रेम, सामाजिक असंतोष यांवर भाष्य करणारी आहे. १९४३ साली आलेल्या किस्मत या सामाजिक चित्रपटातील ‘हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो ए दुनियावालों हिंदुस्तान हमारा है’ या त्यांच्या गीताने स्वातंत्र्यसेनानींच्या देशप्रेमाच्या स्फुल्लिंगाला चेतना दिली. चित्रपटगृहात हे गीत लोकाग्रहास्तव वारंवार ऐकवले जाई. देशभक्तिपर या गीतामुळे इंग्रजांची वक्रदृष्टी कवी प्रदीप यांच्यावर पडली आणि त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाले. त्यामुळे ते काही दिवस भूमिगत राहिले. या चित्रपटाला आणि त्यातील ‘धीरे धीरे आ रे बादल’, ‘अब तेरे बिना कौन मेरा कृष्ण कन्हैया हो’, ‘दुनिया बता हमने बिगाडा है क्या तेरा’ इत्यादी गीतांना भरपूर प्रसिद्धी लाभली. कोलकात्याच्या रॉक्सी चित्रपटगृहात हा चित्रपट तीन वर्षे चालला.
कवी प्रदीप यांनी शशधर मुखर्जी, ज्ञान मुखर्जी, अशोक कुमार इत्यादींसोबत बाँबे टॉकीज सोडले आणि त्यांनी फिल्मिस्तान ही चित्रपटनिर्मितीसंस्था काढली. फिल्मिस्तानसोबत केलेल्या करारानुसार संस्थेचा पहिला चित्रपटचल चल रे नौजवान (१९४४) यासाठी त्यांनी बारा गाणी लिहिली. हा चित्रपट यशस्वी झाला नाही आणि संस्थेत राजकारण सुरू झाले. ते त्यांच्या भावनाशील मनाला त्रासदायक ठरले. करारात अडकल्यामुळे त्यांना इतर ठिकाणीही गाणी लिहिता येईनात. मग त्यांनी ‘मिस कमल बी. ए.’ या टोपणनावाने इतर चित्रपटसंस्थांच्या कादंबरी (१९४४), सती तोरल (१९४७), वीरांगना (१९४७), आम्रपाली (१९४५) या चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांनी लोकमान्य प्रोडक्शन्स (१९४९) या चित्रपटनिर्मिती संस्थेत भागीदार म्हणून गर्ल्स स्कूल या चित्रपटांसाठी नऊ गाणी लिहिली; पण हाही चित्रपट फारसा चालला नाही. त्यामुळे त्यांनी यानंतर स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली. १९५० मध्ये आलेल्या बाँबे टॉकीजच्या मशाल या चित्रपटासाठी त्यांनी सात गाणी लिहिली. त्यांनी लिहिलेले ‘ऊपर गगन विशाल नीचे गहरा पाताल, बीच में है धरती वाह मेरे मालिक तूने किया कमाल’ हे गीत खूप लोकप्रिय झाले. १९५४ मध्ये त्यांनी गीते लिहिलेल्या नास्तिक व जागृती या दोन चित्रपटांतील गाणी खूपच प्रसिद्ध झाली. नास्तिक चित्रपटातील त्यांचे ‘देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इन्सान’ हे गीत समाजात वाढत असलेल्या कुप्रथांवर थेट भाष्य करणारे होते. यात ‘कैसे आए हैं दिन हाय अंधेर के, बैठै बलमा हमारे नजर फेर के’ हे सौम्य आणि शांत मुजरा गीतही त्यांनी लिहिले. जागृती या चित्रपटातील ‘हम लाए हैं तूफ़ान से कश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के’, ‘आओ बच्चों तुम्हें दिखायें झाँकी हिंदुस्तान की’ यांसारखी त्यांची गीते आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटातील ‘दे दी हमें आज़ादी बिना खङग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल’ या प्रसिद्ध गीतातून त्यांनी महात्मा गांधींना मानवंदना दिली आहे. यानंतरच्या तीन-चार वर्षांत त्यांचे फारसे चित्रपट आले नाहीत. १९५९ मध्ये आलेल्या पैगाम या चित्रपटातील ‘इंसान का इंसान से हो भाईचारा’ हे त्यांचे माणुसकीचा संदेश देणारे गाणे लोकप्रिय झाले.
भारत-चीन युद्धानंतर भारतीय सैनिकांच्या मनाला पुन्हा उभारी देण्याकरिता निर्माते-दिग्दर्शक मेहबूब यांनी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून दिल्लीच्या नॅशनल स्टेडियममध्ये चित्रपट उद्योगातर्फे सैनिकांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी मेहबूब यांनी कवी प्रदीप यांना गीत लिहिण्यास सांगितले होते. त्यांनी युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे अतिशय भावनिक गीत लिहिले व २६ जानेवारी १९६३ मध्ये राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर लता मंगेशकर यांनी हे गीत सादर केले. या गीताच्या सादरीकरणावेळी उपस्थित सर्व श्रोतृसमुदायासोबतच पंतप्रधानही भावनिक झाले होते. या गाण्याच्या हक्काद्वारे मिळणारे मानधन युद्धामध्ये वीरमरण आलेले सैनिक यांच्या विधवा पत्नींकरिता असणाऱ्या मदत निधीमध्ये जमा करण्याबाबतचा करार त्यांनी ध्वनीमुद्रण कंपनीसोबत केला.
कवी प्रदीप यांनी अनेक प्रकारची गाणी लिहिली. पण प्रामुख्याने ते त्यांनी लिहिलेल्या देशभक्तीपर गीतांमुळे जास्त प्रसिद्ध झाले. १९६० नंतरही त्यांनी अनेक ऐतिहासिक, देशभक्तीपर, सामाजिक आणि धार्मिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले; पण चित्रपटाची अभिरुची तोपर्यंत बदलली होती. तयार चालींवर गीते लिहिली जाऊ लागली होती. १९७५ मध्ये देशभरात आणीबाणीचा काळ होता. या काळात आलेल्या जय संतोषी माँ हा धार्मिक चित्रपट तिकिटबारीवर खूप यशस्वी झाला. यातील कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या ‘यहाँ वहाँ जहाँ तहाँ मत पूछो कहाँ कहाँ’, ‘मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की’, ‘मदद करो संतोषी माता’, ‘करती हूँ तुम्हारा व्रत मैं’ इत्यादी गाण्यांना खूप प्रसिद्ध मिळाली.
कवी प्रदीप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९६१ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. कवी प्रदीप यांना ‘राष्ट्रीय कवी’ म्हणून सन्मानित करण्यात आले (१९९५). भारत सरकारने त्यांना चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाकरिता दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविले (१९९८). हिंदी चित्रपटसृष्टीतील पाच दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी सुमारे ५४० गीते लिहिली आणि काही चित्रपटांत गाणी गायली. त्यांचे चित्रपटीय गीत असो अथवा इतर गीत असो, त्यांचे प्रत्येक गीत हे अर्थपूर्ण असे आणि मानवी जीवनातील सुखदु:ख व माणुसकीचे दर्शन त्यातून घडत असे.
कवी प्रदीप यांचा विवाह पूर्वाश्रमीच्या सुभद्रा चुन्नीलाल भट्ट यांच्याशी झाला (१९४२). त्यांना मितुल आणि सरगम या दोन मुली.
चित्रपटासारख्या संवेदनशील माध्यमातून आपल्या गीतांद्वारे समाजमनात देशभक्ती आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे आणि समाजाला प्रेरणा देणारे गीतकार, कवी प्रदीप यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी मुंबईमध्ये राहत्या घरी कर्करोगामुळे निधन झाले. ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गीताच्या ओळी असलेले त्यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट त्यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने प्रसारित केले (२०११).
समीक्षक : अरुण पुराणिक