चित्रपटमहर्षी व्ही. शांताराम दिग्दर्शित व निर्मित हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिजात कलाकृती. राजकमल कलामंदिर निर्मित हा चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला.

दो आँखे बारह हाथ या चित्रपटाचे एक प्रसिद्धीपत्रक

दो आँखे बारह हाथ या चित्रपटातल्या कथेचा कालखंड त्याच्या प्रदर्शनाच्या जवळपास वीस वर्षे मागील आहे. ब्रिटिश आधिपत्याखाली दडपलेल्या भारतातील एका तुरुंगातले कैदी व अधिकारी यांच्यातले संघर्षनाट्य रंगवणारा आणि भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०२ खाली शिक्षा फर्मावण्यात आलेल्या खुनी-दरोडेखोरांच्या हृदयपरिवर्तनाचा मानवतावादी विचार या चित्रपट पटकथेच्या केंद्रस्थानी आहे.

या चित्रपटाची कथा वास्तवातील आहे. औंधचे संस्थानिक ‘श्रीमंत भवानराव पंडित पंतप्रतिनिधी’ यांनी कैद्यांना खुल्या वसाहतीत राहू देत, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी देण्याचा अभिनव प्रयोग केला होता. राजेसाहेबांचे गांधीवादी पोलिश मित्र मॉरिस फ्रीडमन (भारतानंद) यांच्या विचाराने प्रेरित होऊन आटपाडी या गावानजीक त्यांनी या प्रयोगाला सुरुवात केली. तुरुंगाऐवजी तेथे कैद्यांची त्यांच्या कुटुंबासह वसाहत होती. तेथील तुरुंगाधिकारी अब्दुल जलील अब्दुल खलील काझी (मास्तर) यांच्या देखरेखीखाली कैदी सामान्य आणि मुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करीत होते. मास्तरांबद्दलच्या प्रेम, श्रद्धा आणि आदरयुक्त दराऱ्यामुळे ते कैदी शेतीत राबून स्वकमाईवर जगू लागले. एकदा यातले काही कैदी पळूनही गेले; पण मास्तरांच्या शिकवणीमुळे पश्चाताप होऊन परतले. हेच कथासूत्र घेऊन हा चित्रपट बनविण्यात आला.

गुन्ह्याचा शिक्का बसलेला माणूस हा कायमचा गुन्हेगार नसतो, त्याला संधी दिली तर त्याचे हृदयपरिवर्तन होऊन तो पुन्हा उत्तम नागरिक बनू शकतो, असे मानणाऱ्या तुरुंगाधिकारी आदिनाथची भूमिका या चित्रपटात व्ही. शांताराम यांनी केली. तुरुंगात असलेल्या कैद्यांना शिस्तीच्या दंडुक्याखाली ठेवणाऱ्या तुरुंग मुख्याधिकाऱ्याची (जेल सुपरिंटेंडेंट) भूमिका बाबूराव पेंढारकरांनी, तर खेळणी विकणाऱ्या चंपा नावाच्या स्त्रीची भूमिका अभिनेत्री संध्या यांनी वठवली. खुनशी वाटणाऱ्या सहा कैद्यांची भूमिका उल्हास, ब्रिजमोहन व्यास, गणपतराव इंगवले, गजेंद्र, एस. के. सिंग, पॉल शर्मा यांनी केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन ग. दि. माडगूळकर यांनी केले असून चित्रपट साहाय्यक दिग्दर्शक केशवराव दाते आणि व्ही. रवींद्र, गीतकार भरत व्यास, संगीतकार वसंत देसाई, संकलक चिंतामणी बोरकर, छायाचित्रणकार जी. बाळकृष्ण, ध्वनिमुद्रणकार मंगेश देसाई आणि रघुवीर दाते, रंगभूषाकार बाबा वर्दम तर गायक मन्ना डे तसेच लता मंगेशकर अशी गुणीजन मंडळी या कलाकृतीसाठी एकत्र आली होती.

चित्रपटातील तुरुंगाधिकारी आणि तुरुंग मुख्याधिकारी (जेल सुपरिंटेंडेंट) हे दोघेही ब्रिटिश राजसत्तेचे प्रतिनिधी; पण यातल्या तुरुंगाधिकारी आदिनाथची भूमिका चुकलेल्याला माफ करून परिमार्जन करण्याची संधी देत बंधुभाव जपणाऱ्या गांधीजींच्या मानवतावादाशी, अहिंसेच्या तत्त्वविचाराशी आणि विनोबाजींच्या सत्य, संयम, सेवा आणि श्रमाचे महत्त्व मानणाऱ्या तत्वप्रणालीशी नाते जोडणारी आहे. या विचारातून मिळालेल्या आंतरिक सामर्थ्याच्या बळावर आदिनाथ केवळ डोळ्यांच्या जरबेने कैद्यांना सत्प्रवृतीच्या मार्गाशी बांधून ठेवतो. संध्या यांनी यात रंगवलेली व्यक्तिरेखा बहुरंगी आहे. आदिनाथ आणि या कैद्यांच्या माळरानातील घरावरून कोका वाजवत गाणे गाणारी, खेळणी विकणारी ही स्वतंत्र आणि निर्भय ग्रामीण स्त्री त्यांच्या वैराण जगात काही गंमतीदार क्षण निर्माण करते. स्वतःचे स्त्रीसुलभ मार्दव आणि सहजता कुठेही हरवू न देणारी, आईवेगळ्या गोविंद आणि गोपाळ या लहान मुलांना जपणारी मातृहृदयी चंपा ही त्यांनी केलेली भूमिका या चित्रपटातल्या व्यक्तिरेखांचा तोल सांभाळणारा घटक आहे. आदिनाथवर मनातून प्रेम करणारी पण प्रसंगी चार शब्द ऐकवून वास्तवाची जाण करून देणारी, गुंडांनी कैद्यांवर हल्ला केल्यावर प्रतिकार करण्यासाठी पुढे सरसावणारी, दलालाला चपलेने ठोक देणारी, रात्रीबेरात्री पोलिस ठाण्यावर तक्रार करायला धाव घेणारी अशी तिची अनेक धैर्यशाली रूपे या भूमिकेतून दिसतात. चित्रपटातील कैदी हे सगळे अशिक्षित, खेडवळ पण समाजाने केलेल्या पिळवणुकीमुळे हाती शस्त्र घेतल्यामुळे गुन्हेगारीचा शिक्का बसून तुरुंगात डांबण्यात आलेले आहेत. आदिनाथ त्यांनी रक्तपात करण्यासाठी शस्त्रे म्हणून वापरलेली – पहार, कुदळ, कोयता, कुऱ्हाड – अशी अवजारे पुन्हा त्यांच्या हाती सोपवत त्यांना शेतीतल्या सर्जनशील कामाकडे वळवून, त्यांच्या जीवनप्रवाहाला सकारात्मक दिशा देतो.

निराकार जगन्नियंत्याला आवाहन करणारे ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ हे भरत व्यास या सिद्धहस्त कवीच्या लेखणीतून उतरलेले, वसंत देसाई यांनी संगीत दिलेले हे या चित्रपटातील प्रार्थनाकाव्य जातिधर्मांच्या भिंती पार करून संवेदनशील भारतीयांच्या हृदयातून उमटणारे प्रार्थनागीत बनले. या चित्रपटातील नेपथ्य, प्रकाशयोजना, छायाचित्रण, ध्वनी, संकलन या सगळ्याच घटकांवर व्ही. शांताराम यांच्या शैलीचा एक स्पष्ट ठसा उमटलेला दिसतो. या चित्रपटातल्या प्रकाशयोजना आणि छायाचित्रणाच्या किमयेने वातावरणनिर्मिती होऊन भावभावनांचा परिणामकारक पट उभा राहिला आहे.

रोजच्या राबण्याला कंटाळलेल्या कैद्यांचे पळून जाणे आणि पश्चात्ताप होऊन परत येणे अशा अनेक लहानमोठ्या नाट्यमय प्रसंगातून आणि ‘सैया झूठोका बडा सरताज निकला’, ‘तकतक धुम धुम’, ‘मैं गाऊं तू चूप हो जा’, ‘उमड घुमडकर आयी रे घटा’ अशा प्रसंगानुरूप पेरलेल्या गीतांमधून चित्रपटाचे कथानक पुढे सरकत जाते. आदिनाथने या ओबडधोबड माणसांच्या अंतरंगात पेरलेले संस्कार रुजू लागतात, गुन्हेगारामधला माणूस जागा होतो; पण शेतकऱ्यांची भाजी मातीमोलाने खरेदी करणाऱ्या दलालाला हे बघवत नाही. तो या कैद्यांना दारू पाजून भुलवतो, गुंडांकरवी मारहाणही करवतो. तेव्हा हे सगळे गांधीजींच्या मार्गाचे पाईक शांततेने विरोध करतात; पण शस्त्र हाती घेत नाहीत. आदिनाथचा प्रयोग यशस्वी होतो. शेवटी दलाल शेतात बैलांची टोळी घुसवून सगळे उध्वस्त करू पाहतो, तेव्हा त्या झुंडीला थोपवण्यासाठी आदिनाथ आपल्या प्राणांची आहुती देतो. त्याचे बलिदान व्यर्थ जात नाही; कैदी तिथेच राहून त्याचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार करतात. उघड्या आकाशाखाली आलेले ते सहा जण हात उंचावून त्या जगन्नियंत्याला आपला निर्धार सांगतात,  इथे चित्रपट संपतो.

बैलांच्या झुंडींशी लढण्याच्या प्रसंगात व्ही. शांताराम जबर जखमी झाले होते. त्यांच्या डोळ्यांना झालेल्या इजेमुळे दृष्टी जाण्याचा धोका निर्माण झाला होता; पण यातून ते सावरले.

त्या काळात रंगीत चित्रपटांचे युग सुरू होऊनही कृष्णधवल माध्यमात चित्रित केलेला, नायक – नायिकेच्या प्रचलित व्यक्तिरेखांपेक्षा वेगळ्या भूमिका मांडणाऱ्या या चित्रपटाने अनेक शहरात रौप्य आणि मुंबईत सुवर्णमहोत्सव साजरा केला आणि अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार जिंकले. या चित्रपटास भारत सरकारकडून ‘उत्कृष्ट हिंदी चित्रपट’ आणि ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’साठी राष्ट्रपतींचे सुवर्णपदक (१९५७) देऊन गौरवण्यात आले. त्याशिवाय चार ‘फिल्म क्रिटिक्स अवॉर्ड्स’; आठव्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘एक्स्ट्राऑर्डिनरी प्राईझ ऑफ द ज्यूरी’ आणि ‘गोल्डन बेयर’ ही दोन पारितोषिके (१९५८); इंटरनॅशनल कॅथलिक सिनेमॅटोग्राफिक ब्यूरो या चित्रकर्मींच्या संघटनेचा सर्वश्रेष्ठ ‘सिल्व्हर  प्लॅक’ हा पुरस्कार (१९५८) आणि हॉलिवूड फॉरेन प्रेसतर्फे ‘सॅम्युएल गोल्डविन इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड – गोल्डन ग्लोब’ (१९५९) इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

तत्कालीन देशीपरदेशी व्यासपीठावर, यूरोप, अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी आणि जागतिक कीर्तीच्या चित्रकर्मींनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.

संदर्भ :

समीक्षक : अरुण पुराणिक