ब्रूस ली : ( २७ नोव्हेंबर १९४० – २० जुलै १९७३). प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, जीत कून दो या युद्धकला (मार्शल आर्ट) प्रकाराचे जन्मदाते आणि विसाव्या शतकातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व. पॉप संस्कृतीतील ठळक व्यक्तिमत्त्व, पूर्व आणि पश्चिम संस्कृतीतील अंतर मिटवणारा पूल अशीही ब्रूस ली यांची बहुआयामी ओळख आहे. त्यांचा जन्म अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरातील चायना टाऊन भागातील एका संपन्न परिवारात झाला. त्यांचे चिनी नाव ली जुन फेन हे आहे. ब्रूसच्या वडिलांचे नाव ली होई-चुएन तर आईचे नाव ग्रेस हो असे होते. या दांपत्याच्या पाच मुलांपैकी एक ब्रूस ली. ब्रूसच्या जन्मावेळी त्यांचे आईवडील अमेरिकेत राहत होते; मात्र त्यानंतर ते हाँगकाँगला परतले आणि कौलून भागात स्थायिक झाले.

ब्रूसचे वडील कँटनीज ऑपेरामधील सुप्रसिद्ध कलाकार होते. त्यामुळे ब्रूसची चित्रपटातील कारकीर्द अगदी लहानपणीच सुरू झाली. गोल्डन गेट गर्ल (१९४१) या चित्रपटात ब्रूसची एक वर्षांचाच असताना वर्णी लागली. द किड (१९५०) या चित्रपटामध्ये वडिलांसोबत मुख्य भूमिकेत झळकायची संधी त्यांना मिळाली. वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत त्यांनी एकूण वीस चित्रपटांत कामे केली. त्याचदरम्यान ब्रूसच्या रस्त्यावरील मारामाऱ्यांना कंटाळून त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच मार्शल आर्ट्सचे शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. १६ व्या वर्षी त्यांनी विंग चून (कुंग फू) या मार्शल आर्ट्स प्रकाराचे प्रशिक्षण यीप मॅन यांच्या हाताखाली सुरू केले. ब्रूसनी त्यानंतर वाँग शून ल्यून्गकडे पुढील शिक्षण घेतले. ब्रूस लींचे शालेय-महाविद्यालयीन शिक्षण हाँगकाँगमध्येच तक सन स्कूल, ला सले कॉलेज व सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स कॉलेजमध्ये झाले.

१९५९ मध्ये ब्रूस ली यांच्या रस्त्यावरील मारामाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. एका मारामारीत त्यांनी एका गुन्हेगार कुटुंबातील मुलाला मारहाण केली होती. तसेच पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना ब्रूस लीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे, नाही तर त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात येईल असा इशारा दिला होता. ब्रूसच्या वडिलांनी त्यांना ब्रूसची मोठी बहीण ॲग्नेस लीकडे सॅन फ्रान्सिस्कोला पाठविले. त्याच वर्षी ब्रूस लींनी तिथे युद्धकला शिकवायला सुरुवात केली. त्यांनी त्या प्रकाराला ‘जून फॅन गंग फू’ (म्हणजे ब्रूस ली कुंग फू) असे नाव दिले होते. सिॲटलमध्ये त्यांनी ‘ली जून फॅन गंग फू इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. १९६० साली एडिसन टेक्निकल स्कूलमधून लींनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. तर मार्च १९६१ मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्यांनी नाट्यकला, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व इतर विषयांचा अभ्यास केला; पण पुढील शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी १९६४ मध्ये ते अर्धवट सोडून ऑकलंडमध्ये चिनी मार्शल आर्ट्सचे कलाकार जेम्स ली यांच्यासोबत जून फॅन गंग फू इन्स्टिट्यूटची सुरुवात केली. तिथेच त्यांची ओळख एड पार्करसोबत झाली. एड पार्कर लाँग बीच इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशीप्स आयोजित करायचे. तेथे त्यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध वन इंच पंचचे प्रात्यक्षिक दाखवले. इथेच हॉलीवूडने त्यांच्यातील कलाकार हेरला. या स्पर्धेदरम्यान लीची ओळख तायक्वांदो ग्रँडमास्टर झ्यून ऱ्ही यांच्याशी झाली. लीनी त्याचवेळी जे मूळचे चिनी वंशाचे नाहीत. अशा विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट्स शिकवायला सुरुवात केली होती. त्यांच्या या कामास चिनी मार्शल आर्ट्स कलाकारांनी विरोधही केला होता. ली यांना हॉलीवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा नव्हती. पण दूरदर्शन मालिका निर्माते विलियम डोझिअर यांच्यासोबत त्यांची भेट झाली आणि त्यांनी ब्रूस लींना मालिकेमध्ये काम करण्यासाठी राजी केले.

निर्माते विलियम डोझिअरनिर्मित दूरदर्शन मालिका द ग्रीन हॉर्नेट (१९६६-१९६७) मध्ये ब्रूसनी केटो हे पात्र केले. ही मालिका फक्त सव्वीस भागांची होती. या मालिकेमुळे अमेरिकन प्रेक्षकांना पहिल्यांदाच आशियाई युद्धकला बघायला मिळाली. ब्रूस लींना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले. चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शकांना ब्रूस लींचा वेग कमी करावा लागला, कारण त्यांच्या वेगवान हालचाली चित्रित होत नव्हत्या. १९६७ मध्ये ही मालिका संपली. याशिवाय इतरही तीन मालिकांमध्ये त्यांनी लहानमोठ्या भूमिका १९६९ पर्यंत केल्या.

१९६७ मध्ये लीने विचारपूर्वक जीत कून दो या युद्धकला प्रकाराला निश्चित आकार द्यायला सुरुवात केली होती. युद्धकलेचे हे ज्ञान पारंपरिक आहे. न बदलणारे आहे. तसेच प्रत्यक्ष व्यवहारात त्याला मर्यादा पडतात. त्यामुळे ज्यात व्यावहारिकता, लवचिकता, गतिमानता आणि कार्यक्षमता यांचे मिश्रण आहे, अशी एक प्रणाली विकसित करावी असे त्यांनी ठरवले. यासाठी त्यांनी शारीरिक प्रशिक्षण प्रकारांमधून वजन वाढवणे, धावणे, स्ट्रेचिंग, मुष्टियुद्ध (Boxing) आणि दांडपट्टा (Fencing) हे कलाप्रकार यांचाही अंतर्भाव त्यात केला. यालाच त्यांनी ‘जीत कून दो’ असे नाव दिले. आजच्या मिश्र युद्धकला प्रकाराचे मूळ जीत कून दोमध्ये आहे.

१९६९ मध्ये ब्रूस ली, हॉलीवूड पटकथाकार स्टर्लिंग सिलिफन्ट व अभिनेता जेम्स कोबर्न यांनी मिळून द सायलेंट फ्ल्यूट हा चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला. पण हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. या दरम्यान त्यांनी मॉर्लो या चित्रपटातही छोटीशी भूमिका केली. द रेकींग क्रू (१९६९) यामध्ये त्यांनी कराटे सल्लागार म्हणून काम केले. अ वॉक इन द स्पिंग रेन (१९७०) या चित्रपटामध्ये मारामारीच्या दृश्यांचे संयोजक म्हणून त्यांनी काम केले.

हॉलीवूडमध्ये कामे करत असतानाही निर्माता फ्रेड वाईनट्रॉबने ब्रूस ली यांना सल्ला दिला की, हाँगकाँगला जाऊन एक चित्रपट बनवून तो हॉलीवूडमधील चित्रपट अधिकाऱ्यांना दाखवावा, जेणेकरून त्यांना त्याची दखल घेता येईल. तोपर्यंत हॉलीवूडमधील मर्यादित संधीला कंटाळलेल्या ली यांनी हाँगकाँगला जाण्याचा निर्णय घेतला होता; मात्र हाँगकाँगमध्ये परिस्थिती वेगळीच होती. तेथे द ग्रीन हॉर्नेट या मालिकेमधील भूमिकेमुळे ली प्रसिद्ध झाले होते. लगोलग त्यांनी तेथील शॉ ब्रदर्स स्टुडिओ व गोल्डन हार्वेस्ट या दोन निर्मितीसंस्थांशी चित्रपटांवर बोलणी सुरू केली. यातून गोल्डन हार्वेस्टबरोबर दोन चित्रपटांचा करार करण्यात आला. त्यातील पहिला चित्रपट द बिग बॉस (१९७१)याने हाँगकाँगमधील तिकीटविक्रीचे तोपर्यंतचे सर्व विक्रम मोडले. तर एक वर्षानंतर प्रदर्शित झालेल्या फिस्ट ऑफ फ्युरी  (१९७२) या चित्रपटाने द बिग बॉसचे विक्रम मोडले. या चित्रपटांनी ली यांना चित्रपटताऱ्याचे वलय मिळवून दिले. तिसऱ्या चित्रपटावेळी ली यांनी त्यांची स्वतःची ‘काँकॉर्ड प्रोडक्शन कॉर्पोरेशन’ ही निर्मितीसंस्था सुरू केली. यात गोल्डन हार्वेस्टच्या रेमंड चाऊचेदेखील अधिकार होते. याअंतर्गत त्यांनी वे ऑफ द ड्रॅगन (१९७२) या चित्रपटाची निर्मिती केली. यात चक नोरीस या लोकप्रिय अमेरिकन अभिनेत्याने खलनायकाची भूमिका केली होती. या चित्रपटातील चक नोरीस व ली यांच्यादरम्यान रोमन कलोसियममध्ये चित्रित झालेली मार्शल आर्ट्सची दृश्ये ही चित्रपटांच्या इतिहासात अजरामर ठरली.

ऑक्टोबर १९७२ मध्ये ली यांनी गेम ऑफ डेथ या चित्रपटाची निर्मिती गोल्डन हार्वेस्टसाठी सुरू केली होती. काही प्रसंगांचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये थांबवण्यात आले, कारण वॉर्नर ब्रदर्स या कंपनीने एन्टर द ड्रॅगन या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी ब्रूस लींकडे विचारणा केली होती. हा चित्रपट काँकॉर्ड प्रोडक्शन कॉर्पोरेशन, गोल्डन हार्वेस्ट व वॉर्नर ब्रदर्स यांनी मिळून निर्माण केला. या चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारी ते एप्रिल १९७३ या कालावधीत पूर्ण झाले. तो २६ जुलै १९७३ रोजी प्रदर्शित झाला. ८,५०,००० डॉलर्समध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जगभरात ९० कोटी डॉलर्सची कमाई केली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या सहा दिवस आधीच ब्रूस ली यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यावेळी ब्रूस ली यांचे वय फक्त ३२ वर्ष होते. मृत्यू मेंदूला सूज आल्यामुळे झाला, असे वैद्यकीय तपासणीत आढळून आले.

गेम ऑफ डेथ या चित्रपटाचा चित्रित झालेला भाग आणि ली यांच्या इतर चित्रपटांतील चित्रित सामग्री वापरून हा चित्रपट १९७८ साली प्रदर्शित करण्यात आला. ब्रूस ली यांच्या जीवनावर आधारित ब्रूस ली : अ वॉरिअर्स जर्नी (२०००) हा माहितीपटही बनवण्यात आला आहे.

ब्रूस ली यांनी १९६४ मध्ये लिंडा एमरी यांच्यासोबत लग्न केले. त्यांना ब्रँडन आणि शॅनन ली ही दोन मुले झाली. ब्रँडन ली पुढे अभिनेते झाले. द क्रो या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका विचित्र अपघातात त्यांचा वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मृत्यू झाला. शॅनन ली यांनी देखील चित्रपटांत कामे केली, मात्र नंतर त्यांनी कामे करणे बंद केले. लिंडा एमरी यांनी ब्रूस ली : द मॅन ओन्ली आय नो (१९७५) हे पुस्तक लिहिले. यावर आधारित ड्रॅगन : द ब्रूस ली स्टोरी (१९९३) हा चित्रपट बनवण्यात आला.

ब्रूस ली यांना हॉलीवूड वॉक ऑफ फेमने सन्मानित करण्यात आले आहे. २७ नोव्हेंबर २००५ रोजी ब्रूस ली यांच्या पासष्टाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून हाँगकाँगच्या ‘अव्हेन्यू ऑफ स्टार्स’ येथे त्यांचा ब्राँझचा पुतळा उभा करण्यात आला. ८ जून हा दिवस ब्रूस ली दिवस म्हणून घोषित करण्यात आला. टाईम नियतकालिकाने शतकातल्या शंभर महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांअंतर्गत ‘विसाव्या शतकातील सर्वांत प्रभावी युद्धकलापटू’ अशी ब्रूस ली यांची नोंद केली आहे.

समीक्षक : निखिलेश चित्रे