प्राचीन ग्रीक कला-संस्कृती भूमध्य सागरातील ग्रीसची मुख्य भूमी आणि इजीअन समुद्रातील बेटांवर व आजूबाजूच्या भू बेटांवर उदयास आली. ही संस्कृती अलेक्झांडर द ग्रेट याच्या अस्तापर्यंत म्हणजे इ.स.पू. ३२३ पर्यंत टिकली. इ.स.पू. ११०० च्या आधीच्या कालावधीस ‘इजीअन संस्कृती’ असे संबोधिले जाते. इजीअन कला-संस्कृती साधारण इ.स.पू. ३००० पर्यंत सिक्लाडीझ बेटांवरील सिक्लाडिक, सुमेरियन आणि मेसोपोटेमियन कलेचा प्रभाव असलेल्या क्रीट येथील मिनोअन संस्कृतीपर्यंत मागे जाते. इ.स.पू. सुमारे १५५०च्या काळात प्रलयंकारी भूकंपामुळे मिनोअन लोकजीवन उद्ध्वस्त झाले. नंतरच्या काळात इ.स.पू. सोळाव्या शतकापासूनच क्रीटच्या प्रभावाखाली आलेल्या तसेच ग्रीसच्या मुख्य भूमीवरील हेलेडिक (Helladic – हेलास जातीच्या लोकांवरून पडलेले नाव) संस्कृतीचे प्रमुख केंद्र असलेल्या मायसीनी येथील लोकांनी क्रीटवर वर्चस्व प्रस्थापित केले. यावरूनच हा भूप्रदेश मायसीनीअन संस्कृतीच्या नावानेही ओळखला जातो. या मायसीनीअन संस्कृतीमध्ये प्राचीन ग्रीक संस्कृतीचा उगम असल्याचे संशोधक सांगतात. इ.स.पू. ११००च्या काळात डोरियन संस्कृतीच्या टोळ्यांनी ग्रीसमध्ये शिरकाव केला आणि ते येथील मूळ संस्कृतीत मिसळले. पुढे याच डोरिक टोळ्यांमुळे मायसीनीअन संस्कृतीचा अस्त झाल्याचे सांगितले जाते. इजीअन कला-संस्कृतीच्या नंतर ग्रीक कला-संस्कृतीचे खालीलप्रमाणे चार भागांत विभाजन केले जाते :

  • भौमितिक काळ (Geometric Period) –  इ.स.पू. ११०० ते इ.स.पू. ७००.
  • आर्ष / प्राचीन काळ (Archaic Period) – इ.स.पू. ७०० ते इ.स.पू. ४८०.
  • अभिजात काळ (Classical Period) – इ.स.पू. ४८० ते इ.स.पू. ३२३.
  • ग्रीकांश / हेलेनिस्टिक काळ (Hellenistic Period) – इ.स.पू. ३२३ ते इ.स.पू. ३०.

ग्रीक चित्रकला : प्राचीन ग्रीसमध्ये तेथील भौगोलिक व राजकीय परिस्थितीमुळे चित्रकलेच्या अनेक आंतरसंबंधित परंपरा निर्माण झाल्या होत्या. मिनोअन आणि मायसीनीअन कला-संस्कृतींचा प्रभाव ग्रीक मुख्य भूमीवर कायमच होता. ग्रीकांची सुरुवातीच्या काळातील चित्रकला मृत्पात्र-चित्रणाबरोबरच विकसित होत गेल्याचे आढळते. प्राचीन ग्रीक संस्कृतीत अंधःकार / भौमितिक काळापासून प्रामुख्याने मृत्पात्रांवर चित्रण केल्याचे पुरावे सापडतात. आर्ष काळापासून मृत्पात्री आणि शिल्पांवर चित्रणाचे प्रमाण वाढत गेल्याने आपोआपच तत्कालीन चित्रकारांना अधिक वाव मिळत गेला. ग्रीक मृत्पात्री – चित्रशैली ही इतर चित्रण पद्धतीपेक्षा तंत्र, प्रमाण आणि उद्दिष्ट यामध्ये वेगळी असल्याचे आढळते. उदा., भौमितिक रूपचिन्हांची चित्रण कला – भौमितिक कला, ओरिएंटल काळ्या आकृत्यांची शैली (Oriental Black Figure Style/ Orientalizing style), ‘ऍटीक मृत्पात्रांची शैली’ (Attic Vase Painting), ‘काळ्या-आकृत्यांची मृत्पात्रे’ (Black-Figure pottery), ‘लाल आकृत्यांची मृत्पात्रे’ (Red-Figure pottery) आणि ‘पांढऱ्या-पृष्ठावरील तंत्र’ (White-Ground technique), ‘द्विभाषिक कलश चित्रण’ (Bilingual vase painting), ‘काळी झिलईयुक्त मृत्पात्रे’ (Black-Glazed Ware).

द्विभाषिक कलश चित्रण

आर्ष काळापासून अभिजात कलाकृतींमध्ये दगड व पक्व मृदेतील (terracotta) रंगविलेल्या फरशा, लाकडी फलकांचे भाग, भित्तिचित्रे आणि मातीच्या कलशांवर केलेले सजावटीचे चित्रण अशा विविध माध्यमांवर चित्रण केलेले आढळते. भित्तिचित्रे आणि कलशांवरील चित्रकला ही नंतर अभिजात काळातही सुरू राहिलेली दिसून येते. अभिजात चित्रकलेतील संगमरवरातील फलक आणि भित्तिचित्रांच्या प्रतिकृती नंतरच्या काळातही उपलब्ध झालेल्या आढळतात. भित्तिचित्रांसाठी भित्तिलेपचित्रण (fresco) व चिकणरंग चित्रणपद्धती (tempera), संगमरवर आणि लाकडी फलकांवरही चिकणरंग चित्रणपद्धती तसेच लाक्षचित्रण पद्धतींचा वापर केलेला दिसतो. लाक्षचित्रण पद्धती ही प्रथम नियमितपणे संगमरवरातील शिल्प-प्रतिमांवरती, नंतर इ.स.पू. सहाव्या शतकात वास्तुशिल्पांवरील बारकावे दाखविण्यासाठी, पाचव्या शतकात तावदाने व फलकांवर चित्रणासाठी  वापरल्याचे आढळते.

हेलेनिस्टिक काळातील चित्रकलेमध्ये कलशांवरील चित्रणाचे प्रमाण कमी होऊन कबरींवरील, घरांवरील भितींवर तसेच थडग्यांचे दगड यांवरील चित्रणाचे प्रमाण वाढलेले दिसते. काही चित्रमय मोझेक (mosaic) कलाकृतीही या काळात निर्माण केल्याचे आढळते. याशिवाय कितीतरी ग्रीक चित्रकलेचे व चित्रकारांचे उल्लेख रोमन तत्त्वज्ञ प्लिनीच्या (इ.स. २३ ते ७९) व इतर लेखकांच्या लेखनांतून मिळतात.

ग्रीक शिल्पकला : ग्रीकांचे कलाविश्व पूर्णतः वेगळेच असून यात तात्कालीन, शाश्वत, क्षणिक असे अनेक विषय व्यक्त केलेले आढळून येतात. ग्रीक शिल्पाकृती देव-देवता, वीर पुरुष, विविध प्रसंग, पौराणिक प्राणी आणि सामान्य ग्रीक संस्कृतीबद्दल माहिती पुरवीत असल्याने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. खरेतर खूपशा मूळ ग्रीक शिल्पाकृती नष्ट होऊन आता ज्या अस्तित्वात आहेत, त्या रोमन शिल्पकारांनी केलेल्या प्रतिकृती आहेत. रोमनांवर ग्रीकांचा असलेला प्रभाव आणि त्यांना ग्रीक शिल्पांबद्दल असलेला आदर ह्या प्रतिकृतींवरून लक्षात येतो. रोमन शिल्पकारांनी जर ह्या प्रतिकृती निर्माण केल्या नसत्या तर कितीतरी ग्रीक पुरावे प्राचीन काळीच नामशेष झाले असते. ग्रीक शिल्पकारांनी शिल्पनिर्मितीसाठी ग्रीसमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्रामुख्याने दगड, संगमरवर, चुनखडक अशा माध्यमांचा वापर केलेला दिसतो. ग्रीक शिल्पकला सामान्यतः मायसीनीअन काळ, अंधःकार काळ, भौमितिक काळ, आर्ष काळ, अभिजात काळ आणि ग्रीकांश वा हेलेनिस्टिक काळ या काळांप्रमाणे विभागली जात असली, तरी आर्ष काळापासून ग्रीकांच्या कलाकृतींमध्ये शिल्पकलेने एक आदर्श ओळख निर्माण केलेली दिसते. ग्रीक कलेमध्ये एक विशिष्ट प्रकारचे स्वातंत्र्य तर दिसतेच; पण त्याबरोबरच नम्यता आणि सौम्यताही आढळते. ग्रीक कलाकारांसाठी त्यांच्या आजूबाजूचे दृश्य आणि भौतिक विश्व हेच सत्य असावे हे त्यांच्या कलाकृतींवरून आढळून येते.

प्राचीन ग्रीसमधील, साधारण इ.स.पू. ७०० ते ३० ह्या काळातील, शतकानुशतके एका अद्वितीय ग्रीक कला-दृष्टिकोनामध्ये विकसित झालेल्या शिल्पकलेने, इजिप्त आणि पूर्वेकडील स्मारक-कलांमधून प्रेरणा घेतल्याचे आढळते. याकाळात ग्रीक कलाकारांनी त्यापूर्वी कधीही न घडविलेल्या मानव-शिल्पाकृतींची निर्मिती केली. त्यानंतर रोमनांनी त्यांच्या प्रतिकृतीही केल्या. इतकी कलात्मक उंची त्यांच्या कलाकृतींमध्ये होती. ग्रीक शिल्पकार प्रामुख्याने मानवी शरीराची प्रमाणबद्धता, समतोल आणि आदर्श परिपूर्णता याबाबतींत चिंतीत असत. म्हणूनच त्यांच्या दगड आणि कांस्य प्रतिमा ह्या इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा जास्त कलात्मक कलाकृती म्हणून ओळखल्या जातात.

ग्रीकांनी कितीतरी आश्चर्यकारक व सुंदर कलाकृती निर्माण केल्या, तरी त्यातील काही सगळ्याच आजपर्यंत टिकू शकलेल्या नाहीत. ही खरेतर ग्रीक कलेची शोकांतिकाच म्हणावी लागेल. अगदी पार्थेनॉन व हॅफेस्टससारखी काहीच मंदिरे टिकली आहेत. ग्रीकांचे कांस्य व इतर धातूंमधील काम नंतरच्या काळात वितळवून त्याची हत्यारे बनविण्यात आली. तर दगडांतील मूर्त्या व शिल्पांची युद्धात नासधूस अथवा इमारतींसाठी तोडफोड करण्यात आली. ग्रीक कलासंस्कृतीचा कितीतरी मोठा ठेवा जरी नाहीसा करण्यात आला असला, तरी उत्खननातून मिळालेली मृत्पात्रे तसेच ग्रीक कलाकृतींच्या रोमन कलाकारांनी केलेल्या प्रतिकृती आपल्याला आज संग्रहालयातून ठेवलेल्या कलाकृतींमध्ये पाहायला मिळतात.