ग्रीक आर्ष काळातील कलेवर साधारण इ.स.पू. आठव्या शतकाच्या मध्यापासून इ.स.पू. सहाव्या शतकापर्यंत सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या पूर्व भूमध्यासागरीय व पूर्वेकडील प्राचीन भूभागाचा अतिप्रभाव दिसून येतो. प्राचीन ग्रीकमधील या विशिष्ट विकासाच्या टप्प्याला पौर्वात्यीकरण अथवा प्राच्यक्रांती काळ (Orientalising revolution) असे ओळखले जाते. ह्या काळातील महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये धातुकाम, कोरीव माणके व प्रामुख्याने मृत्पात्रांचा समावेश होतो. या काळात मृत्पात्रांवर चित्रित केलेली अलंकृत रूपचिन्हे, प्राणी व राक्षसाकृती पुढील अनेक शतके चित्रित करण्यासाठी वापरली गेली. तसेच ती रोमन व इट्रुस्कन कलेतही पसरल्याचे आढळते. हा काळ आधीची भौमितिक शैली ते पूर्व-प्रेरित प्रेरणादायी शैली असा बदल दर्शवितो; जसे कोरलेल्या व गतिमय रेषांचा मुक्त वापर, नैसर्गिक आकारांचा वापर ह्या काळात सुरू झाल्याचे आढळते. या नवीन शैलीमुळे इजीअन-ग्रीक जगातील वाढत्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचा काळ प्रतिबिंबित होतो.

ग्रीक मृत्पात्रांवरील उत्तर भौमितिक काळाच्या शेवटी पौर्वात्य (ओरिएंटल) रूपचिन्हांचा उदय स्पष्ट होतो. ह्या काळातील कॉरिंथ या महत्त्वाच्या शहरातून पसरलेला पौर्वात्य प्रभाव खूप दिसून येतो. या शैलीला ‘प्रोटो-कॉरिंथियन शैली’ (proto-Corinthian Style) असे ओळखले जाते. या शैलीतूनच पुढील कालावधीत काळ्या-आकृत्यांच्या मृत्पात्रांची शैली उदयास आली. कॉरिंथमध्ये निर्माण केलेली मृत्पात्री संपूर्ण ग्रीसमध्ये निर्यात केली गेली. ज्यामुळे कॉरिंथमध्ये निर्माण झालेली नवीन शैली अथेन्स व नंतर ग्रीसमध्ये पर्यंत जाऊन पोहोचली. मूळ कॉरिंथ नगरातून निर्माण होऊन सर्वत्र पसरलेल्या ह्या चित्रण शैलीला पौर्वात्य /ओरिएंटल काळ्या आकृत्यांची शैली (Oriental Black Figure Style/ Orientalizing style) असेही ओळखतात.

आर्ष काळातील कॉरिंथ येथील मृत्पात्रांवर मानवाकृतींच्या चित्रणापेक्षा सिंह, ग्रिफीन (griffin), स्फिंक्स (sphinx) आणि सिरेन (siren – उभयचर प्राणी) या प्राण्यांची तसेच गैरपौराणिक प्राण्यांचे चित्रण आडव्या पट्टीत वारंवार केलेले दिसते. मृत्पात्रांवरील या आडव्या सजावटीच्या पट्टीत चित्रकारांनी भौमितिक आकारांच्याऐवजी कमळ व ताडाच्या पानांचे आकार रिक्त जागा भरण्यासाठी वापरण्यास सुरुवात केलेली दिसते. त्यामुळे काही कलशांवर पृष्ठभागावरील नकारात्मक जागा जास्त उठावदार झाल्याचे आढळते. मानवी आकारांचे चित्रण कमी झालेले दिसते आणि जे थोडेफार मानवी आकार आढळतात. ते नंतरच्या काळातील असून चित्रांत मागे छटेसारखे कोरलेले दिसतात. या काळात लहान आकारातील परंतु अत्यंत तपशीलदार सजावट असलेल्या मृत्पात्रांचेही उत्पादन केलेले आढळते.

आरंभिक प्रोटो- कॉरिंथियन (इ.स.पू. ७२५ ते ७००) मृत्पात्रांमध्ये प्रामुख्याने अरीबल्लोस (aryballos) या एक मुठी गोलाकार अत्तरासाठी वापरण्यात आलेल्या छोट्या कलशाचा तसेच ओइनोकोइ (oinochoe), कोतीले (kotyle), सरळ बाजूंचे व सपाट मुठीचे पायक्सिस (pyxis) अथवा लहान पेटी या मृत्पात्रांचा समावेश होतो. उदाहरणार्थ ब्रिटिश संग्रहालय लंडन येथील प्रोटो-कॉरिंथियन इ.स.पू. ७२०-७०० काळातील ६.८ सें.मी. उंचीची अरीबल्लोस अत्तराची कुपी. या कुपीवर एवलीन (Evelyn) या चित्रकाराने काढलेले घोडेस्वार व योद्धा हे चित्र आहे. घोडा भौमितिक चित्रशैलीसारखाच पण एका छटेप्रमाणे चित्रित केलेला असून त्याव्यतिरिक्त बाकीच्या आकृत्या फक्त मातीच्या राळेच्या बाह्यरेषांनी काढलेल्या दिसतात. ज्यामुळे नाक, तोंड, दाढी व डोळे असे शरीराचे बारकावे दाखविणे सोपे झाल्याचे आढळते. या अरीबल्लोसवरील बरेचसे चित्रण भौमितिक शैलीप्रमाणे आढळते; मात्र याच्या मानेवरील शंकरपाळ्याच्या आकारातील पाकळ्यांच्या फुलांचे आकार या काळात प्रथमच वापरण्यात आलेले दिसतात. जे नंतर सातव्या शतकात खूप लोकप्रिय झाले.

अलाबस्त्रोन पात्र

या शैलीतील इतर उल्लेखनीय उदाहरणांमध्ये ऱ्होडस भूबेटांवरील कमिरो (Kamiros) येथील थडग्यातून मिळालेली साधारण इ.स.पू. ६६० ते ६५० या काळातील अलाबस्त्रोन (अलाबस्तोर या दगडापासून प्रेरित असलेली) ह्या पायाशी रुंद असलेल्या अंडाकृती उंच कुपीचा समावेश होतो. अरीबल्लोसपेक्षा छोट्या असलेल्या या कुपीची उंची ५.८ सें.मी. इतकी आहे. या छोट्याश्या पात्रावर काळ्या आकृत्यांच्या शैलीचे प्रारंभिक स्वरूप दिसून येते. ज्यामध्ये ग्रिफीन या प्राण्याचा आकार छटेमध्ये दाखविलेला दिसतो. यात प्रथम रंग भरून मग पंखांची पिसे, कान, डोळे, मुख आणि पायांचे स्नायू असे शरीराचे बारकावे टोकदार हत्याराने कोरलेले दिसतात. ग्रिफीनवर काळ्या रंगासोबत लाल रंगाच्या राळेचाही वापर केलेला आढळतो. ज्यामुळे चित्रांत उठाव व चैतन्य निर्माण झालेले दिसते. उजवीकडे या ग्रिफीनसमोर सुतळीप्रमाणे एकमेकांत घुसलेल्या वेली व त्यांवर मुकुटासारखा तुरा असे पवित्र नक्षीकाम केलेले आढळते. या अलाबस्त्रोनच्या दुसऱ्या बाजूसही असेच सममितीय ग्रिफीनचे चित्रण केलेले दिसते. फिकट गुलाबी रंगातील अलाबस्त्रोन कुपीच्या उर्वरित भागात गुलाब, कमळाच्या उमलणाऱ्या कळ्या, गोलाकार पाम याची पाने अशा विविध अलंकारिक नमुन्यांनी सजावट केलेली आढळते.

मध्य प्रोटो-कॉरिंथियन (इ.स.पू. ७०० ते ६५०) या शैलीत पार्श्वभाग रिकामा न ठेवता बिंदू, गुलाब व अनियमित आकारांनी भरलेला दिसतो. जोरदार अविर्भावातील आकृत्या एकमेकांवर आच्छादित दाखवताना वेगवेगळ्या आडव्या पट्ट्यांमध्ये अलंकरण करत. प्राण्यांच्या आकारामागे छटा दाखवून बाकी चित्रांत लाल अथवा काळ्या रंगाच्या मातीच्या राळेवर बाह्यरेखा कोरलेल्या दिसतात. उत्तर प्रोटो-कॉरिंथियन (इ.स.पू. ६५० ते ६४०) व संक्रमणकाळातील (इ.स.पू. ६४० ते ६२५) शैलीत चित्रांतील प्राणी मोठे व लंबाकृती होऊ लागले, तर बिबळ्याची जागा सिंहाने घेतलेली दिसते. मृत्पात्रांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेले आढळते. काळ्या आकृतीचा वापर सुरू होऊन, काळी किनार असलेल्या पांढऱ्या, जांभळ्या व पिवळ्या रंगाच्या पट्ट्या चित्रांत दाखविलेल्या दिसतात.

प्रोटो-कॉरिंथियन शैलीत पौर्वात्य अनुप्रयोगांना अंतर्भूत केलेले असले तरीही सरळ रेषा, वक्रगती रेषा, चौकोन, त्रिकोण, मुक्तहस्त व एकाग्र करणारी वर्तुळे, बिदूंसहीत वर्तुळे अशा भौमितिक आकारांचा वापर कायम दिसतो. एकंदरीत ही शैली अलंकारिक स्वरूपाची होती. मृत्पात्रांच्या मानेवरील सजावटीत वक्रगती रेषा व चौकोनांचा वापर जास्त प्रमाणात दिसतो; खांद्यांवर प्राणी व हंस, पोटावर शेळी तर पायाकडे कमळाच्या फुलांची साखळी तर कधी कळ्या व लांब किरणे दाखवलेली दिसतात. नंतरच्या काळातील प्राण्यांच्या आकृतींमध्ये शरीर पूर्ण रंगविलेले आढळते.

साधारण इ.स.पू. ७२५ ते ६२५ मध्ये अथेन्स येथून पसरलेल्या ॲटीक मृत्पात्रांवरील फुले व प्राण्यांची रूपचिन्हे ही ‘प्रोटो-ॲटीक’ (proto-Attic) या विशिष्ट पौर्वात्य शैलीतील म्हणून ओळखली जातात. मृत्पात्रांच्या पायाकडील भागावर भौमितिक आकारांचे चित्रण दिसते. ह्याच काळात प्रथमच ग्रीक धार्मिक व पौराणिक विषय मृत्पात्री चित्रणात अंतर्भूत झालेले दिसून येतात. चित्रकारांनी भौमितिक काळाप्रमाणे मिरवणूक तसेच शिकारीची दृश्ये चित्रित केलेली आढळतात. नंतर मात्र येथे चित्रातील मागील छटा कमी होऊन त्याची जागा रेखाचित्रणाने घेतलेली दिसते. पुरुषांची व प्राण्यांची शरीरे काळ्या सावलीप्रमाणे चित्रित केलेली, तर त्यांची डोकी बाह्यरेषांनी रेखाटलेली आढळतात. स्त्रीप्रतिमा पूर्णतः बाह्यरेषांनी चित्रित केलेल्या दिसतात. महत्त्वाच्या रूपचिन्हांमध्ये स्फिंक्स, घोडा, पंख असलेली मानवाकृती व सेंटॉर (Centaur) तर इतर आकारांमध्ये कुत्रे, गरुड, कोंबडा यांचे चित्रण केलेले दिसते. प्रोटो-ॲटीक शैलीत पूर्वेकडील रूपचिन्हे जरी दिसत असली तरी ती वास्तववादी नव्हती. या काळातील महत्त्वाच्या मृत्पात्रांमध्ये हायड्रीया, अँफोरा, लहान ओइनोकोइ, पाया असलेले वाडगे अशा मृत्पात्रांचा समावेश होतो. अथेन्समध्ये ह्या पौर्वात्यीकरण कालावधीमध्ये अनालतोस (Analatos), मेसोजेईआ (Mesogeia), पॉलीफिमस (Polyphemos) हे कलाकार होऊन गेले. इ.स. पू. सातव्या शतकाच्या मध्यास काळ्या व पांढऱ्या शैलीमध्ये, पांढऱ्या पृष्ठभागावर काळ्या आकृत्या आणि त्याच्यासोबत देह व कपड्यांचे चित्रण बहुरंगात केलेले आढळते. अथेन्समध्ये वापरण्यात आलेली मृत्तिका ही कॉरिंथच्या मृत्तिकेपेक्षा जास्त नारिंगी रंगाची होती. त्यामुळे शरीराचे बारकावे दाखविण्यास मर्यादा येत असावी.

संदर्भ :

  • Boardman, John., Early Greek Vase Painting : 11th-6th Centuries, London, 1998.
  • Cook M. Robert, Greek Painted Pottery (Handbooks of archaeology), Methuen, 1960.
  • Herford, Mary; Beatrice, Antonie, A Handbook of Greek Vase Painting, 1995.
  • Stansbury-O’donnell, Mark, A History of Greek Art, 2015.
  • Steiner, Ann, Reading Greek Vases, Cambridge, 2007.
  • Von Bothmer, Dietrich, Greek Vase Painting, New York, 1987.