प्राचीन ग्रीक संस्कृतीत इ.स.पू. सातव्या शतकापासून सुरू झालेल्या आर्ष कालावधीत (इ. स. पू. ७०० ते इ. स. पू. ४८०) नागरी जीवनास पुन्हा सुरुवात झालेली दिसते. ह्या काळात नागरिक, परदेशी रहिवासी व गुलाम यांचा समावेश असलेली राजकीय दृष्ट्या संघटित नगरे नगरराज्यांमध्ये परिवर्तित होऊन नागरी समाजजीवन पूर्वस्थितीत आल्याचे आढळते. आर्ष काळातील वसाहती व नगरराज्ये भूमध्यसागरातील भू बेटांवर जोमात पसरल्याचे दिसते; मुख्य नगरराज्यांमध्ये इजीअन समुद्रातील आयोनियन (Ionian), अनातोलिआ (Anatolia) म्हणजे आजचे तुर्कस्थान, फोनिशिया (Phoenicia), लिबिया (Libya), दक्षिण इटली (Southern Italy) व इतर काही राज्यांचा यात समावेश होतो. शंभरात असलेली ही राज्ये, वसाहती आणि व्यापारी केंद्रे यांचे मोठ्या प्रमाणावर व्यापारी जाळे निर्माण होऊन ग्रीकांचा आफ्रिका, आशिया आणि यूरोपशी संपर्क होऊन व्यापारी माल आणि विचारांची देवाणघेवाण सुरू झाल्याचे दिसून येते.
ग्रीक कलेत आर्ष काळाच्या सुरुवातीस उल्लेखनीय बदल झालेले दिसून येतात. या काळात उदयास आलेली ग्रीक संस्कृती उच्च दर्जाची होती व कला, शिल्पकला व हस्तकौशल्य व्यवसाय आणि वास्तू यांतील प्रगती विशेष उल्लेखनीय अशी आहे. इ.स.पू. साधारण १०५० ते ७०० या काळात प्रभावीत असलेल्या भौमितिक सांघातीकरणाची जागा नंतर पूर्वेकडील राज्ये, आशिया मायनर व इजिप्त यांच्यामुळे प्रभावित होऊन नैसर्गिक शैलीने घेतल्याचे आढळते. सांस्कृतिक संबंध वाढल्याने इतर कला-संस्कृतींमधील रूपचिन्हे, प्राणी आणि शैलींचा प्रभाव ग्रीक कलेवर पडून ग्रीक-पूर्वेकडील अशी मिश्रित पण नैसर्गिक शैली निर्माण झालेली दिसते. क्रमाक्रमाने केलेल्या प्रयोगांच्या इ.स.पू. ७०० ते ६०० दरम्यानच्या या काळाला प्रादेशिक काळ (Orientalizing Period) असे म्हणतात. ह्या काळातील उल्लेखनीय कलाकृतींमध्ये ‘ओरिएंटल काळ्या आकृत्यांच्या शैली’तील मृत्पात्रांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, कॉरिन्थिया येथून मिळालेली इ.स.पू. ६९० ते ६७५ मधील अरिबल्लोस (Aryballos) ही गोलाकार अरुंद मानेची व निमुळत्या तोंडाची बाटली. ही ३ इंच उंचीची पक्वमृदेमधील कुपी मृत व्यक्तीला सुगंधी द्रव्य अर्पण करण्यासाठी वापरण्यात आली असावी. तिच्यावर चित्रकाराने अजाक्सची पौराणिक कथा चित्रित केलेली आढळते.
आर्ष काळातील शिल्पकलेवर इजिप्तच्या शिल्पांचा आणि सीरियन तंत्राचा असलेला प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. ग्रीक शिल्पकारांनी
ह्या काळात दगडातील कोरीव चित्रमालिका व उठावशिल्पांबरोबर दगड, पक्वमृदा व कांस्यधातूमधील शिल्प-प्रतिमा आणि हस्तिदंत व हाडांचा वापर करून छोट्या प्रतिमांची निर्मिती केल्याचे आढळते. संपूर्ण सहाव्या शतकात ग्रीक कलाकारांनी मानवी आकृत्या नैसर्गिकरित्या वाढत्या प्रमाणात दर्शविलेल्या दिसतात. ह्या काळात दोन प्रकारची मुक्त स्थायी आणि मोठ्या आकारातील शिल्पांची निर्मिती केलेली दिसते. सुरुवातीच्या काळातील उदाहरणांमध्ये दगडांत कोरलेल्या मानवी प्रतिमांवर त्यांची उभी राहण्याची स्थिती व प्रमाण यांवरून इजिप्तचा प्रभाव दिसून येतो; उदाहरणार्थ, ‘कौरोस’ (kouros) ही उभ्या नग्न तरुण पुरुषाची प्रतिमा आणि ‘कोरे’ (kore) ही वस्त्र नेसलेल्या उभ्या कुमारी वा तरुणीची संगमरवरात कोरलेली प्रतिमा.
कलात्मक यशासाठी आर्ष काळात संकुलांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे आढळून येते. ह्या संकुलांचा तत्कालीन प्रमुख कलाभांडार म्हणून वापर झालेला दिसतो. अनेकदा, अथेन्सच्या पैसिस्ट्रेटोस (Peisistratos) आणि सेमॉसच्या पोलिक्रेट्स (Polykrates of Samos) यांसारख्या शासकांनी आणलेल्या बांधकाम प्रकल्पाद्वारे ह्या काळातील मंदिरांची उभारणी सशक्त प्रयोगांच्या प्रक्रियेने अधिक सुसंस्कृत झाली दिसते. या इमारती सहसा दगड वा पक्वमृदेच्या शिल्पाकृत्यांनी, चित्रांनी तसेच विस्तृत साचेकामाने सुशोभित केलेल्या असत. सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात, जसजसा धावत्या मानवाकृत्या दाखवण्याचा कलाकारांचा रस वाढत गेला, तसतसे उठावशिल्पांमध्ये वास्तविक कथात्मक दृश्ये दाखवलेली आढळतात.
साधारण इ.स. पू. ५६६ च्या सुमारास अथेन्समध्ये अखिल-अथेनिक खेळांची सुरवात झाली. संकुलांमध्ये विजयी खेळाडूंचे पुतळे बनवून समर्पित केले गेले आणि ज्या स्पर्धेत खेळाडूने विजय मिळविला होता, ती दृश्ये चित्रित केलेले ‘अँफोरे’ (amphorai) विजयचिन्ह म्हणून बनवण्यात आले.
भौमितिक काळात रूजलेली ‘ऍटीक मृत्पात्रांची शैली’ (Attic Vase Painting) पुढे आर्ष काळात बीओशिया (Boeotia), कॉरिंथ, सिक्लाडिझ, आयोनिआ या पूर्व इजीअन भू बेटांवर वेगाने फोफावली. इ.स.पू. ५५०च्या सुमारास कुंभकारांनी अथेन्समध्ये स्थानिक व विदेशी अशा दोन्ही कॉरिंथियन (Corinthian) तंत्रामध्ये प्राविण्य मिळविल्याचे दिसते. अथेनिअन – म्हणजे ऍटीक (Attic), अथेन्सच्या आजूबाजूचा प्रदेश, भूमध्यसागर प्रदेशाच्या निर्यात बाजारपेठेत ‘काळ्या आकृत्यांच्या मृत्पात्रां’नी (black-figure pottery) आपले वर्चस्व राखल्याचे दिसते. काळ्या आकृत्यांचे चित्रण अँफोरा व कलश यांबरोबरच प्रामुख्याने प्याला, लेकीथोई (lekythoi) म्हणजे मूठ असलेली बाटली, किलिक्स (kylixes) म्हणजे पाया असलेला प्याला, पिक्सिडस (pyxides) झाकणयुक्त पेट्या आणि वाडग्यांवर केलेले आढळते. सहाव्या शतकाच्या उत्तरार्धातील मृत्पात्री ग्रीक संस्कृतीतील असंख्य पैलू, दफन विधी-संस्कार, दैनिक जीवन, संगोपन, मैदानी खेळ, युद्ध, धर्म आणि पौराणिक कथा अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकतात. ऍटीक काळ्या आकृत्यांच्या मृत्पात्रांवर तत्कालीन कलाकारांनी काळ्या आकृतीच्या चित्रणातील मर्यादांवर मात करण्यासाठी विविध तंत्रांचा प्रयोग केलेला दिसतो. या शैलीतील उल्लेखनीय चित्रकारांमध्ये क्लेईटस (Kleitias), नीरकॉस (Nearchos), लायडॉस (Lydos), अमासिस (Amasis), अन्दोकिडस (Andokides) आणि सोफिलोस (Sophilos) या कलाकारांचा समावेश होतो.
साधारण इ.स.पू. ५३०च्या सुमारास ‘लाल आकृतीच्या तंत्रा’चा शोध लागून त्यामुळे चित्रणात जास्त संधी प्राप्त झाल्याचे आढळून येते. परिणामी, नंतरच्या काळात मृत्पात्री चित्रणामध्ये काळ्या आकृतीची जागा लाल आकृतीने घेतल्याचे दिसते.
आर्ष काळातील मृत्पात्रांबरोबरच शिल्पांवरील चित्रणाचे तसेच भिंती, लाकडांचे व संगमरवराचे फलक, पक्वमृदेच्या फरशा अशा विविध माध्यमांवर चित्रांचे प्रमाण वाढत गेले आणि ओघाने चित्रकारांनाही काम वाढल्याने अधिक वाव मिळत गेल्याचे लक्षात येते. या काळातील भित्तिचित्रांसाठी भित्तिलेपचित्रण (fresco) पद्धतीचा वापर केलेला दिसतो. या काळातील विशेष उल्लेखनीय व उच्च दर्जाच्या चित्रांमध्ये साधारण इ.स.पू. ५३० मधील कॉरिंथिया येथील पितसा लाकडी-फलकांवरील (Pitsa Panels) चित्रणाचा समावेश होतो. या फलकांवर चिकणरंग चित्रणपद्धती व लाक्षचित्रणपद्धती वापरण्यात आलेली दिसते. प्लिनी (इ.स. २३-७९), पॉझनियास (Pausanias) (इ.स. १४३-१७६) या लेखकांनी उल्लेख केल्याप्रमाणे ग्रीक आर्ष काळातील या लाकडी फलकांवरील चित्रणास कलेतील एक आदरणीय रचना म्हणून बघितले जाते.
संदर्भ :
- Boardman, J. and Callaghan, P., Western Painting, Greece, Archaic period (c. 625–500 bc), Encyclopædia Britannica, 2008.
- Neer, Richard T., Greek Art and Archaeology : A New History, c. 2500-c. 150 B.C.E. Thames and Hudson, 2011.
- Norris Michael, Greek Art from prehistoric to classical a resource for educators, New York, 2000.
- Osborne, Robin, Archaic and Classical Greek Art, 1988.
- Spivey, Nigel J., Greek Art, 1997.