प्राचीन ग्रीकमधील साधारण इ.स.पू. ५३० ते ५०० या कालावधीतील मृत्पात्र चित्रणाची एक शैली. द्विभाषिक कलश चित्रण (Bilingual vase painting) हा शब्द भाषाशास्त्रानुसार रूपकात्मकरित्या ह्या शैलीला देण्यात आलेला असून, त्यावरून मृत्पात्री दोन वेगवेगळ्या रंगात रंगविल्याचे लक्षात येते. या शैलीत कलशाच्या एका बाजूस काळ्या आकृत्यांची शैली तर दुसऱ्या बाजूस लाल आकृत्यांच्या शैलीचे चित्रण केलेले आढळते. ह्या शैलीतील द्विभाषिक कलशांमधून प्राचीन ग्रीकमधील चित्रण शैलीच्या संक्रमणकाळाची कल्पना येते. ज्यात आधीच्या काळातील काळ्या आकृत्यांची जागा लाल आकृत्या घेऊ लागल्याचे आढळते. ही चित्रशैली अतिशय असामान्य असून ज्यामध्ये एकच विषय दोन भिन्न शैलींमध्ये पुनर्चित्रीत केल्याचे उदाहरणही दुर्मीळ आहे. त्या काळातील प्रमुख ग्रीक चित्रकार अँडोकिड्स (Andokides), ओल्टोस (Oltos) आणि सायआक्स (Psiax) या चित्रकारांनी या द्विभाषिक मृत्पात्र चित्रशैलीत काम केल्याचे आढळते.

द्विभाषिक कलश चित्रण हे प्रामुख्याने पोट असलेल्या अँफोरा (belly amphora) कलशांवर तसेच किलिक्स (kylix) या डोळ्यांसारख्या आकाराच्या वाडग्यांवर (eye-cups) केलेले दिसते. पोट असलेल्या अँम्फोरा कलशांवर अँडोकिड्स या चित्रकाराशिवाय सायआक्स या चित्रकाराने चित्रण केलेले आढळते. तर डोळ्यांसारख्या आ

चित्रकार- अँडोकिड्स, अ. अकिलीस व अजाक्स, ब. हर्क्यूलीझ व नेमियन सिंहाचे दृश्य

काराच्या वाडग्यांवर ओल्टोस व इपिक्टेतोस (Epiktetos) या चित्रकारांनी चित्रण केल्याचे दिसते. सामान्यतः दोन्ही शैलीतील चित्रणाचे काम एकाच चित्रकाराने केलेले असावे; परंतु काही मृत्पात्रांच्या बाबतीत हे सांगणे कठीण आहे, तर काहींच्या बाबतीत वादातीत आहे. उदाहरणार्थ, अँडोकिड्स या चित्रकाराने केलेले ब्रिटिश म्युझियम येथील अँफोरावरील दोन्ही शैलीतील चित्रण. साधारण इ.स.पू. ५२० ते ५०० ह्या कालावधीतील या अँफोराच्या एका बाजूस काळ्या आकृत्यांच्या शैलीत अकिलीस आणि अजाक्स (Achilles and Ajax) हे दोन योद्धे बसून फाश्यांचा खेळ खेळताना दाखविलेले दिसतात. उजवीकडे दाढी वाढलेला, डोक्याचे केस पट्ट्याखाली गुंडाळून बसवलेले, त्यांवर उंच तुरा असलेले शिरस्त्राण घातलेला व अंगात उंची रेशमी कापडाचा अंगरखा परिधान केलेला अकिलीस बसलेला असून त्याच्या संपूर्ण अंगात संरक्षक चिलखत घातलेले असून त्यावर उच्च भरतकामात केलेले तारे, विशिष्ट नागमोडी वळणाच्या आकारांनी व इतर रूपचिन्हांनी सजविलेले दिसते. त्याच्या डाव्या हातात दोन भाले असून त्याच्या मागे सजावटीने भरलेली एक बोईटियन ढाल ठेवलेली दिसते. डावीकडे बसलेला अजाक्सही त्याचप्रमाणे सजलेला आणि सुसज्ज आहे. दोघेही खेळण्यात मग्न असून मध्यभागी असलेल्या मेजावरील फासे खेळण्यासाठी पुढे झुकलेले दाखविले आहेत. अँफोराच्या दुसऱ्या बाजूस हर्क्यूलीझ (Hercules) आणि नेमियन (Nemean) सिंहाचे युद्ध चित्रित केलेले आहे. ह्यातील दाढीधारी, डोक्यावरील कुरळ्या केसांत पट्टा असलेला दोन्ही गुडघ्यांवर टेकलेला अनावृत्त हर्क्यूलीझ सिंहाला पुढच्या पायांनी पकडून हवेत उचलून खाली आपटत असल्याचे दाखविलेले दिसते. हवेत उचललेल्या सिंहाचे शरीर ताणलेले असून जबडा आ वसलेला, डोळे भेदरलेले आहेत व त्याचे डोके हर्क्यूलीझच्या छातीजवळ आहे. हर्क्यूलीझच्या उजवीकडे दाढीधारी कुरळ्या केसांत पट्टा असलेला अनावृत्त आयोलास उभा असून मागे वळून बघत आहे. त्याच्या उजव्या हातात दंडुका व तलवार आहे. हर्क्यूलीझच्या मागे डावीकडे अंगात उंची रेशमी कापडाचा अंगरखा परिधान केलेली, डोक्यात उंच तुरायुक्त मुकुट घातलेली, केसांबरोबर सापांची झालर असलेली अथेना हातात भाला घेऊन उभी आहे. या अँफोरावरील चित्रण काही तज्ञांच्या मते लीसिप्पीड्स (Lysippides) या समकालीन चित्रकाराने (एकसारख्या चित्रशैलीमुळे) केल्याचे सांगितले जाते.

अनेक मृत्पात्रांवर दोन्ही बाजूस एकच विषय परंतु काळ्या व लाल या दोन्ही शैलींत चित्रित केलेला दिसतो. उदाहरणार्थ, अँडोकिड्स या चित्रकाराचा ‘बिछान्यावर आराम करत असलेला हर्क्यूलीझ’ या विषयाचे चित्र असलेला अँफोरा. साधारण इ.स.पू. ५२० ते ५१० ह्या कालावधीतील हा अँफोरा ५३.५ सें.मी. उंचीचा व २२.५ सें.मी. व्यासाचा असून वूल्ची (vulci) येथून प्राप्त झाला. अँफोरावरील दोन्ही बाजूंच्या शैलीची तुलना करता येऊ शकते. यातील दृश्यांमध्ये ग्रीक पौराणिक कथेचा सर्वांत महत्त्वाचा नायक हर्क्यूलीझ पलंगावर रेलून बसलेला असून मद्यपान करत असल्याचे चित्रण केले आहे. काळ्या आकृत्यांच्या एका बाजूवर तो कंटाळवाण्या अवस्थेत पडलेला असून त्याचे लक्ष समोर उभ्या असलेल्या अथेना देवीकडे आहे. त्याच्या उजव्या हातात एक पेयाचा प्याला – कंथरोस (kantharos) धरलेला आहे. अथेनाच्या मागे डोक्यावर टोपी व उंच पादत्राणे घातलेला हर्मीस उभा आहे. हर्क्यूलीझच्या डोक्यामागे या तीनही आकृत्यांपेक्षा लहान आकारातील एक अनावृत्त नोकर दीनोस (dinos) मध्ये मद्य मिसळत असल्याचे दाखवलेले आहे. हर्क्यूलीझच्या पलंगासमोरील मेजावर मांस, ब्रेड आणि प्याला (किलिक्स) ठेवलेला आहे. हर्क्यूलीझची आयुधेही त्याच्या मागे टांगून ठेवल्याच्या अविर्भावात काढलेली दिसतात. या आकृत्यांच्या पार्श्वभूमीवर एक द्राक्षांचा वेल दाखवलेला आहे. एकंदरीत या चित्रणामुळे एक देखावा निर्माण होतो. अँफोराची दुसरी लाल आकृत्यांची बाजू काळ्या आकृत्यांच्या चित्रणापेक्षा काही बाबतीत वेगळी असून त्यात देवदूत हर्मीस, नोकर व हर्क्यूलीझची आयुधे दाखवलेली नाहीत. याही चित्रांत द्राक्षांच्या वेलाने देखावा बांधलेला दिसतो. हर्क्यूलीझची लाल आकृती पलंगावर बसलेली असून कमरेपासून वर टेकलेल्या अवस्थेत असून त्याच्या डाव्या हातात काळ्या रंगातील प्याला – कंथरोस धरलेला आहे व उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवलेला दिसतो. लाल आकृतीवरील काळ्या कंथरोसमुळे विरोधाभास निर्माण झालेला आढळतो. अथेनाच्या हातात हर्क्यूलीझच्या दिशेने अर्धवट उघडलेले फुल धरलेले दाखवले आहे. या दुसऱ्या बाजूच्या चित्रापेक्षा लाल आकृत्यांमधील या दोन आकृत्या एकमेकांपासून दूर एकल आहेत. लाल रंगातील आकृत्यांवरील कपड्यांवरील बारकावेही बाजूपेक्षा अधिक समृद्ध वाटतात.

अँडोकिड्सने द्विभाषिक कलश चित्रण शैलीत चित्रित केलेला पालेर्मो येथील साधारण इ.स.पू. ५३० च्या सुमारचा किलिक्स (kylix) हा एकमेव प्याला आहे. ह्याच्या बाह्यभागात अर्धे काळ्या आकृत्यांचे व उरलेल्या अर्ध्या भागात लाल आकृत्यांचे चित्रण केलेले आहे. किलिक्सच्या मुठींभोवती योद्ध्यांच्या आकृत्या, दोन्ही बाजूस दाखवलेल्या पानाकृती डोळ्यांच्यामध्ये लाल आकृत्यांच्या बाजूस धनुर्धारी, तर काळ्या आकृत्यांच्या बाजूस तुतारीवादक चित्रित केलेले दिसतात. अन्य किलिक्समध्ये अंतर्भागात काळ्या आकृत्यांची शैली तर बाह्यभागात लाल आकृत्यांची शैली चित्रित केलेली आढळते. उदाहरणार्थ, इ.स.पू. ५१५ ते ५१० या कालावधीतील फेडीप्पोस (Pheidippos) या चित्रकाराने चित्रित केलेला १३.४ सें.मी. उंच व ३२.७ सें.मी. व्यासाचा प्याला. किलिक्सच्या अंतर्भागात मध्यभागी लाल पार्श्वभागावर डायोनिसोसची काळ्या रंगातील आकृती तर प्यालाच्या बाह्यभागावर मोठ्या आकारांतील डोळ्यांच्या व पानांच्या आकृत्यांमध्ये एका बाजूस योद्धा तर दुसऱ्या बाजूस धावपटू चित्रित केलेला आढळतो.

इ. स. पू. ५३० च्या सुमारास लाल आकृतीच्या शैलीचे तंत्र पूर्णतः विकसित होऊन नंतरच्या काळात मृत्पात्र चित्रणामध्ये काळ्या आकृतीची जागा लाल आकृतीने घेतल्याचे दिसते.

संदर्भ :

  • Boardman, John., Early Greek Vase Painting : 11th-6th Centuries, London, 1998.
  • Cook M. Robert, Greek Painted Pottery (Handbooks of archaeology), Methuen, 1960.
  • Herford, Mary; Beatrice, Antonie, A Handbook of Greek Vase Painting, 1995.
  • Stansbury-O’donnell, Mark, A History of Greek Art, 2015.
  • Steiner, Ann, Reading Greek Vases, Cambridge, 2007.
  • Von Bothmer, Dietrich, Greek Vase Painting, New York, 1987.