रत्नागिरी जिल्ह्यातील एक मध्ययुगीन तसेच सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे एक वाळूचे टेकाड (जुने वालुधन्व) असून दापोली तालुक्यात भारजा नदीच्या मुखाशी १५० मी. पूर्वेला वर्तमान पुळणीच्या मागे आहे. सागरी लाटांशी या जुन्या वालुधन्वाचा प्रत्यक्ष संपर्क तुटलेला आहे. या जुन्या वालुधन्वाचा आकार त्रिकोणी असून उत्तर-दक्षिण लांबी ५६० मी., सरासरी उंची १८ मी. तर उत्तरेच्या भागात ती ३२.४ मी. आहे. वालुधन्वाचा नैर्ऋत्येकडील उतार बहिर्वक्र असून पूर्वेकडील उतार तीव्र आहे. वायव्येकडील उतार मानवी हालचालींमुळे उद्ध्वस्त झाला आहे. या वालुधन्वाचा तळ समुद्रसपाटीपासून ३ मी. उंचीवर आहे.

केळशी (जि. रत्नागिरी) येथील पुरातत्त्वीय स्थळ.

एकोणिसाव्या शतकात हे स्थान छोटे बंदर या स्वरूपात असले, तरी त्याला फारसे महत्त्व नव्हते. १५३८ मध्ये भारतातील चौथा पोर्तुगीज व्हाइसरॉय डॉम जाओ डी कॅस्ट्रो (१५००-१५४८) याने या ठिकाणी मशिदी असल्याचा उल्लेख केला आहे. या खेरीज केळशीची इतर कोणतीही ऐतिहासिक नोंद आढळत नाही.

जुन्या वालुधन्वाच्या वायव्येकडील बाजूने उत्तर टोकापासून ४९ मी. अंतरावर ९ मी. उंचीचा पायऱ्यांच्या स्वरूपाचा उभा भूपुरातत्त्वशास्त्रीय चर खणण्यात आला. तळापासून वरपर्यंत विविध उंचीवरून वाळूचे नमुने गोळा करण्यात आले. पहिले सात नमुने प्रत्येकी २० सेंमी. अंतराने आणि उरलेले तेरा नमुने प्रत्येकी ५० सेंमी. अंतरावर घेण्यात आले. भूपुरातत्त्वशास्त्रीय निरीक्षणासाठी घेण्यात आलेल्या या स्तराभिलेख छेदात मानवी वस्तीचे पुरावे वर्तमान सागरी पातळीच्या २.१५ मी. उंचीपासून मिळायला सुरुवात होते. वर्तमान सागरी पातळीच्या ८ मी. उंचीपर्यंत तीन टप्प्यांत सांस्कृतिक अवशेष मिळाले. सागरी पातळीच्या ८ मी. उंचीनंतरच्या वालुधन्वाच्या वरच्या भागात संशोधन करणे शक्य झाले नाही.

पहिला टप्पा २.१५ ते ४ मी. या स्तरांचा आहे. या स्तरातील एक रेडिओकार्बन तिथी आणि खापरांच्या अवशेषांवरून या प्रारंभिक वसतीचा काळ इ. स. तिसऱ्या शतकाचा आहे. ४ मी. उंचीवर जांभा दगडाचे लांबलचक तुकडे आडवे टाकलेले दिसतात. या तुकड्यांची जाडी ६ ते १० सेंमी. आहे.

केळशी येथील मध्ययुगातील पहिल्या वसतीचे पुरातत्त्वीय पुरावे ४ ते ६ मी. या स्तरांमध्ये आढळले. ६ मी. उंचीवरील जांभा दगडाच्या एका थराने या सांस्कृतिक कालखंडाची समाप्ती होते. या स्तरात मिळालेली रेडिओकार्बन तिथी इ. स. ८२० अधिकउणे ९० अशी आहे. या काळातील मातीची भांडी प्रामुख्याने लाल रंगाची व करड्या रंगाची आणि सामान्य प्रतीची होती. ही प्रामुख्याने हंडी व थाळी या प्रकारची आणि मध्यम आकाराची होती.

केळशी (जि. रत्नागिरी) येथील मध्ययुगातीन पुरातत्त्वीय अवशेष.

मध्ययुगातील पहिल्या वसतीनंतर ६ ते ७ मी. उंचीवर १ मी. जाडीचा वाळूचा सलग थर आढळून आला. ७ मी. उंचीवर पुन्हा एकदा जांभा दगडाचे लांबलचक तुकडे आडवे टाकलेले दिसले. या तुकड्यांवर १ मी. जाडीचे वसतीचे तीन थर आढळले. या थरांचे रेडिओकार्बन कालमापन करणे शक्य झाले नाही. या स्तरात आढळलेल्या अवशेषांमध्ये बहुरंगी काचेच्या बांगड्या (Polychrome Bangles) आढळल्या. या बांगड्या ब्रह्मपुरी (महाराष्ट्र) व नेवासा (महाराष्ट्र) येथील मध्ययुगीन थरांमध्ये मिळालेल्या बहुरंगी काचेच्या बांगड्यांशी साम्य असणाऱ्या आहेत. अगोदरच्या प्रारंभिक मध्ययुगीन स्तरांप्रमाणेच लाल रंगाची, करड्या व काळ्या रंगाची आणि सामान्य प्रतीची मातीची भांडी या स्तरांमध्येही आढळली. तथापि जास्त संख्येने निळ्या रंगांची चिनी मातीची (Celadon Ware) उत्तम प्रतीची आणि हिरव्या व काळ्या रंगाची झिलईदार (Glazed Ware) भांडी मिळाली. दौलताबाद (महाराष्ट्र), चिंचणी (महाराष्ट्र), चौल (महाराष्ट्र), लष्करशाह (गुजरात) आणि संजाण (गुजरात) येथे मिळालेल्या अशा भांड्यांच्या तौलनिक अभ्यासाने केळशी येथील या स्तरांचा कालखंड चौदावे ते सतरावे शतक असा निश्चित करण्यात आला आहे.

प्राण्यांच्या अवशेषांमध्ये पाळीव प्राण्यांची हाडे आणि माशांचे अवशेष मिळाले. तसेच सागरी मृदुकाय प्राण्यांच्या कवचांचे अवशेष मोठ्या प्रमाणावर मिळाले. त्यात मेरेट्रिक्स मेरेट्रिक्स व पाफिया गॅलस या मृदुकाय कवची प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग केल्याचे दिसून आले.

लिखित साधनांमधील प्रसिद्ध प्राचीन बंदरांच्या यादीत केळशीचे नाव आढळत नाही; तथापि पुरातत्त्वीय अवशेषांवरून असे दिसते की, केळशी हे एखादे उल्लेख न होण्याजोगे छोटे बंदर असून कदाचित ते समुद्री चाच्यांचे ठिकाण असावे आणि आश्रयासाठी वापर करत असावेत.

संदर्भ :

  • Deo, S. G.; Joglekar, P. P. & Rajaguru, S. N. ‘Late Holocene Human Occupation on Coastal Dune at Kelshi, Konkan Coast, Maharashtra, Indiaʼ, Journal of Indian Ocean Archaeology, 13-14 : 13-27, 2017-2018.
  • Joglekar, P. P.; Deshpande‑Mukherjee, Arati & Joshi, Sharmila, ‘Report on the Faunal Remains from Kelshi, District Ratnagiri, Maharashtraʼ, Puratattva, 27: 91‑95, 1996‑97.

                                                                                                                                                                                      समीक्षक :  गिरीश मांडके