राजस्थानातील एक मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ पाली जिल्ह्यात असून राजपुतांच्या चौहान कालखंडातील आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने १९९०-९१ मध्ये येथे उत्खनन केले.

अभिलेखीय पुराव्यांवरून असे दिसते की, नाडोल हे चौहान राजपूत वंशाच्या शाकंबरी शाखेचे महत्त्वाचे ठाणे होते. येथील टेकाडाच्या उत्खननात दहाव्या शतकातील मंदिराचे अवशेष मिळाले. हे मंदिर महा-गुर्जर शैलीचे आहे. तसेच तेथे एका प्रासादाचे अवशेष मिळाले. त्यात निवासासाठी दालने व स्वयंपाकघर असून या प्रासादाच्या बांधकामात मोठ्या दगडांचा, उन्हात वाळवलेल्या विटा (sun-dried bricks) आणि काही प्रमाणात भट्टीत बनवलेल्या विटांचा वापर केला होता. या प्रासादात एक देवनागरी शिलालेख मिळाला. तसेच नाडोल येथील नीळकंठ महादेव मंदिरात विक्रम संवत १०२५ (इ. स. १०८३) मधील शिलालेखात रावळ लखा अथवा लक्ष्मण याचा उल्लेख आहे. शिलालेख व इतर लिखित पुराव्यांवरून असे दिसते की, हा बाडोलच्या चौहान घराण्याचा संस्थापक होता. उत्खननात या संस्थापकाची मुद्रा प्राप्त झाली.

उत्खननात मातीची खेळणी, पुरुष व स्त्रियांच्या प्रतिमा आणि अनेक नाणी मिळाली. त्यात इंडो-ससानियन अथवा व गधैया नाणी (इ. स. सहावे ते बारावे शतक) नाण्यांचा समावेश होता. कवड्यांची संख्या लक्षणीय होती. बहुधा छोट्या अर्थव्यवहारांसाठी त्यांचा वापर केला जात होता. उत्खननात मूग, तांदूळ, कुळीथ व तूर या धान्यांचे जळालेले दाणे मिळाले. तसेच गाईगुरे, शेळ्यामेंढ्या व उंट यांची हाडे मिळाली.

जुनाखेडा नाडोलचे वैशिष्ट्य म्हणजे उत्खननात इतस्ततः विखुरलेल्या अवस्थेत अनेक मानवी सांगाडे मिळाले आणि बरोबरीने तलवारी व कट्यारी अशी शस्त्रे मिळाली. लिखित पुराव्यांवरून असे दिसते की, गझनीचा महंमद एका स्वारीच्या दरम्यान नाडोल या ठिकाणी आला होता आणि हा पुरावा त्या वेळच्या एखाद्या चकमकीचा असावा. हे भारतीय उपखंडातील संघर्षाच्या पुरातत्त्वाचे (पाहा : संघर्षाचे पुरातत्त्व) दुर्मीळ उदाहरण आहे.

संदर्भ :

  • Indian Archaeology: A Review 1990-91, Archaeological Survey of India, pp. 60-62, New Delhi.

                                                                                                                                                                                     समीक्षक :  गिरीश मांडके