झॉयनर, फ्रिडरिक ईव्हरार्ड : (८ मार्च १९०५–५ नोव्हेंबर १९६३). विख्यात जर्मन भूपुरातत्त्वज्ञ आणि पुराजीववैज्ञानिक. त्यांचा जन्म जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये रोजी झाला. पोलंडमधील ब्रेस्लाऊ विद्यापीठातून झॉयनर यांनी पीएच.डी संपादन केली (१९२७). सुडेटन पर्वतराजीतील भूगर्भीय हालचालींमुळे वर आलेला बार्डो गॉर्जचा प्रदेश त्यांनी संशोधनासाठी निवडला होता. पीएच. डी नंतर काही काळ त्यांनी तेथेच खासगी शिक्षक (प्रिवातडोजेंट) म्हणून काम केले (१९२७-१९३०). पुढे त्यांनी व्याख्याता होण्यासाठी आवश्यक अशी ‘डॉक्टर हबिलिटेशन’ (Dr. Habil.) ही पात्रता प्राप्त केली (१९३१). या प्रबंधासाठी त्यांनी टर्शरी (तृतीयक) कालखंडातील कीटकांच्या जीवाश्मांवर संशोधन केले होते.

जर्मनीतील फ्रायबुर्ग विद्यापीठात भूविज्ञान विषयाचे व्याख्याता म्हणून त्यांनी काही काळ काम केले (१९३०-३४) जर्मनीतील नाझी पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे व वैज्ञानिकांवरील दपडशाहीमुळे झॉयनर अस्वस्थ झाले. ते स्वतः ज्यू नसले तरी त्यांची पत्नी इटा ही ज्यू असल्याने, त्यांनी पत्नी व मुलगा वूल्फगांग यांच्यासह इंग्लंडला स्थलांतर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

झॉयनर यांनी इंग्लंडला आल्यानंतर लगेचच लंडनच्या ब्रिटिश म्युझियम (नॅचरल हिस्ट्री) येथे १९३४-३६ दरम्यान सहयोगी संशोधक या पदावर काम स्वीकारले. त्यांची लंडन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजीत जिओक्रोनॉलॉजी (भूकालक्रम) या विषयाचे व्याख्याता या पदावर नेमणूक झाली (१९३६-४६). या पदावर असतानाच त्यांनी डीएससी ही विज्ञानातील सर्वोच्च पदवी प्राप्त केली (१९४२). कीटकांमधील ’ऑथ्रोप्टेरा’ हा त्यांच्या डीएससी प्रबंधाचा विषय होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात साउथ केन्सिंग्टन येथे काही काळ त्यांनी ’टोळविरोधी केंद्रात’ सेवा केली होती.

पुढे त्यांची प्राध्यापक व इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजीत पर्यावरणीय पुरातत्त्व विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. ते अखेरपर्यंत या पदावर कार्यरत होते. विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ व्ही. गॉर्डन चाइल्ड (१८९२-१९५७) हे झॉयनर यांचे समकालीन होते. कीटकशास्त्रज्ञ म्हणून सुरुवात केलेले झॉयनर नंतरच्या काळात जीवाश्मांच्या अभ्यासाकडे वळले आणि लंडनला आल्यावर त्यांनी प्लायस्टोसीन कालखंडातील पर्यावरण व त्यामधील बदलांचे कालमापन या विषयांमध्ये भूविज्ञान आणि जीवशास्त्र यांचा उपयोग करून घेतला. त्यांना मानव आणि प्राणी यांच्यातील परस्परसंबंधामध्ये रस होता. त्यांचे अ हिस्ट्री ऑफ डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स (१९६३) हे पुस्तक पुरातत्त्वीय प्राणिविज्ञानात एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

झॉयनर यांना यूरोपातील क्वाटर्नरी (चतुर्थक) कालखंडातील निक्षेपांचा व सागरी किनाऱ्यांच्या अभ्यासाचा विस्तृत अनुभव होता. भूविज्ञान आणि जीवशास्त्र यांचे सखोल ज्ञान असल्याने ते चतुर्थक कालखंडातील हवामान बदलांसंबंधी सर्वस्वी नवे सिद्धांत मांडू शकले. त्या वेळी निरपेक्ष कालमापनाची पद्धत उपलब्ध नसल्याने चतुर्थक कालखंडात झालेल्या हवामान बदलांचा कालानुक्रम ठरवणे हे काम अवघड होते. आलटून पालटून झालेले हिमयुग व आंतर-हिमयुग यांचे काल ठरवण्यासाठी झॉयनर यांनी मिलुटिन मिलानकोविच (१८७९-१९५८) या सर्बियन गणिती व खगोलवैज्ञानिकांनी पृथ्वीच्या वातावरणातील दीर्घकालीन बदलांसाठी सुचवलेल्या प्रारूपाचा (मिलानकोविच चक्रे – Milonkovich Cycles) वापर केला होता.

गुजरातमधील वाळूच्या टेकाडांवर मिळत असलेल्या मध्याश्मयुगीन अवशेषांचे पर्यावरणीय दृष्टिकोनातून परीक्षण करावे आणि त्याच बरोबर येथील तरुण पुरातत्त्वज्ञांना प्रशिक्षण मिळावे, या हेतूने ह. धी. सांकलिया (१९०८-१९८९) यांनी झॉयनर यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले (१९४९). त्यानुसार झॉयनर यांनी साबरमती, माही, नर्मदा, गोदावरी व मलप्रभा या नद्यांच्या खोऱ्यांमधील प्रागैतिहासिक स्थळांचे भूपुरातत्त्वीय पद्धतीने सखोल अवलोकन केले. पुढे ते पुन्हा एकदा डेक्कन कॉलेजच्या निमंत्रणावरून भारतात आले (१९६०-६१). त्यांनी नेवासा, नावडातोली व नर्मदा नदीच्या परिसरांत भूपुरातत्त्वाशी निगडित क्षेत्रीय संशोधन केले. त्या वेळी त्यांच्या बरोबर असलेल्या (पुढे प्राध्यापक झालेल्या) श. न. राजगुरू (जन्म १९३३) व वीरेंद्रनाथ मिश्र (१९३५–२०१५)  यांनी या प्रशिक्षणानंतर डेक्कन कॉलेजमध्ये भूपुरातत्त्व, पर्यावरणीय पुरातत्त्व आणि प्रागितिहास अशा बहुविद्याशाखीय संशोधनाला प्रारंभ केला व पर्यावरणीय पुरातत्त्व आणि प्रागितिहास यात दीर्घकाळ भरीव कामगिरी केली. झॉयनर यांच्या भारतातील कामाचा फायदा भारतीय पुरातत्त्व क्षेत्राला अनेक प्रकारे झाला. उदा., विख्यात पुरातत्त्वज्ञ बी. सुब्बाराव (१९२१–१९६२) आणि के. टी. एम. हेगडे हे झॉयनर यांच्या गुजरातमधील संशोधन मोहिमेत सामील होते. नंतर त्यांनी बडोदा विद्यापीठात पर्यावरणीय पुरातत्त्वाचे संशोधन हाती घेतले. भारतातील संशोधनाचे निष्कर्ष झॉयनर यांनी स्टोन एज अँड प्लायस्टोसीन क्रोनॉलॉजी ऑफ गुजरात (१९५०), प्रिहिस्ट्री इन इंडिया (१९५१), आणि एन्व्हायरमंट ऑफ अर्ली मॅन विथ स्पेशल रेफरन्स टू द ट्रॉपिकल रिजन्स (१९६३) या तीन पुस्तकांमध्ये प्रकाशित केले. भारतातील पर्यावरणीय पुरातत्त्वाला प्रारंभीच्या या तीन पुस्तकांनी दिशा दिली असे मानले जाते.

झॉयनर हे क्षेत्रीय संशोधनात नेहमी अग्रेसर असत. त्यांनी भारताखेरीज मध्यपूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका व आफ्रिकेत अनेक ठिकाणी संशोधन केले. त्यांच्या द प्लायस्टोसीन पिरियडः  इट्स क्लायमेट, क्रोनॉलॉजी अँड फॉनल सक्सेशन (१९४५) आणि डेटिंग द पास्ट : ॲन इंट्रोडक्शन टू जिओक्रोनॉलॉजी (१९४६) या पुस्तकांनी यूरोपात पर्यावरणीय पुरातत्त्वाचा पाया घातला. त्यांचे दोनशेपेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झाले. त्यांना हाले येथील जर्मन ॲकॅडमी ऑफ नॅचरल सायन्सेस लिओपोल्डिना (सध्याचे नाव नॅशनल ॲकॅडमी) या संस्थेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले होते (१९५२). तसेच लंडनच्या सोसायटी ऑफ झूलॉजीचे फेलो आणि रॉयल अँथ्रापॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे ते उपाध्यक्ष होते (१९६३).

लंडन येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Harris, D. R.  ‘Zeuner, Frederick Everardʼ, Encyclopedia of Global Archaeology, (Claire Smith (Ed), New York, 2014.
  • Paddayya, K. ‘Investigation of Man-Environmental Relationships in Indian Archaeologyʼ, Man and Environment,  XIX: 1-28, 1994.

                                                                                                                                                                                     समीक्षक : सुषमा देव