कॉर्व्हिनस, गुडरुन : (१४ डिसेंबर १९३१ — १ जानेवारी २००६). जर्मन प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पोलंडमध्ये श्टेट्सीन (श्टेटीन) येथे झाला. जर्मनीतील बॉन विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी ट्युबिंगन विद्यापीठात गेल्या. त्यांना लहानपणापासूनच भूविज्ञान व निसर्गविज्ञानाचे आकर्षण होते. त्यांनी फ्रान्समधील जुरासिक कालखंडातील अमोनाइट जीवाश्मांच्या अध्ययनावर डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांच्या प्रबंधाचे परीक्षक एफ. ई. झॉयनर (१९०५—१९६३) यांच्यामुळे त्या पुरातत्त्व विषयाकडे ओढल्या गेल्या.

कॉर्व्हिनस विवाहानंतर १९६१ मध्ये भारतात आल्या. पुण्यातील वास्तव्यात त्यांचा संबंध डेक्कन कॉलेजमधील प्रागैतिहासिक संशोधकांशी आला. प्रवरा नदीच्या परिसरात त्यांनी चंदीगढ येथील एम. आर. सहानी यांच्या मार्गदर्शनाखाली १९६४ ते १९६७ या काळात अश्मयुगीन संस्कृतीच्या स्थळांचे सर्वेक्षण केले. ह. धी. सांकलिया यांच्या प्रेरणेने त्यांनी नेवासाजवळील चिरकी या ठिकाणी उत्खनन केले (१९६७-१९६९). अश्मयुगीन अवजारांच्या सखोल विश्लेषणामुळे भारतीय उपखंडातील प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय संशोधनात हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कॉर्व्हिनस यांनी भारतात सर्वप्रथम अश्मयुगीन अवजारे तयार करण्याच्या कोम्बेवा तंत्राचे (Kombewa technique) संशोधन केले. तसेच त्यांनी अवजार बनवणारी व्यक्ती उजवी की डावखुरी होती यावर प्रकाश टाकला.

चिरकी उत्खनन पूर्ण करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर कॉर्व्हिनस आफ्रिकेत सक्रिय झाल्या (१९७०—८४). इथिओपियात अफार भागात सुप्रसिद्ध ल्युसीचा शोध लावणाऱ्या शोधपथकात त्यांचा समावेश होता. इथिओपियातच हडार (Hadar) या स्थळाच्या जवळच त्यांनी अनेक पुराश्मयुगीन स्थळे शोधून काढली. त्यानंतर त्यांना नामिबियातील हिऱ्याच्या खाणींमध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून डी. बीर्स या कंपनीने आमंत्रित केले. तेथे त्यांनी मायोसीन (Miocene) काळातील जीवाश्मांचा आणि अनेक पुराश्मयुगीन स्थळांचा शोध लावला. भारताच्या सीमेजवळ नैर्ऋत्य नेपाळमधील शिवालिक टेकड्यांमध्ये आद्य प्लाइस्टोसीन काळात विवर्तनीय हालचालींमुळे डांग-देवखुरी भागात खोलगट खोरी (Dun Valley) तयार झाली. या खोऱ्यांमधील जलोढी निक्षेपांमध्ये कॉर्व्हिनस यांना अश्मयुगीन हत्यारे मिळाली.

आफ्रिकेत अनेक ठिकाणी भूवैज्ञानिक व पुरातत्त्वज्ञ म्हणून काम केल्यानंतर कॉर्व्हिनस पुन्हा भारतीय उपखंडातील प्रागैतिहासिक संशोधनाकडे परतल्या (१९८४). सलग वीस वर्षे त्यांनी नेपाळमधील हिमालय व शिवालिक पर्वतरांगांमध्ये काम केले. नेपाळमधील डांग-देवखुरी जिल्ह्यातील सर्वेक्षणात त्यांनी अनेक पुराश्मयुगीन स्थळे शोधली आणि त्यांसंबंधी सखोल संशोधन केले. नेपाळमधील अश्युलियन संस्कृतींच्या पुरातत्त्वीय स्थळांचा केलेला अभ्यास हे कॉर्व्हिनस यांचे विशेष योगदान मानले जाते.

कॉर्व्हिनस यांनी प्रवरा नदी खोऱ्यात केलेले संशोधन हे भारतीय प्रागैतिहासिक आणि भूपुरातत्वीय दृष्टीकोनातून एक महत्त्वाचा टप्पा ठरतो (१९६७-६९). कारण या संशोधनातून काढलेले निष्कर्ष विशेषतः पुराहवामान, विवर्तनीय हालचाली आणि प्रागैतिहासिक संस्कृतीतील बदल हे अतिशय महत्त्वाचे आहेत. या अमूल्य संशोधनाचा उपयोग डेक्कन कॉलेजमधील प्रागैतिहासिक पुरातत्त्वामध्ये काम करणाऱ्या संशोधकांना आजही होत आहे (१९७५—२०२०). तसेच कॉर्व्हिनस यांनी नेपाळमध्ये २० वर्षे संशोधन करून काढलेले भूपुरातत्त्वीय आणि प्रागैतिहासिक निष्कर्ष पुढे त्यांच्या मृत्यूनंतर दोन खंडांत जर्मनीतून प्रकाशित झाले. नैर्ऋत्य नेपाळमधील गेल्या ६ लाख वर्षांपासूनची पर्यावरणीय आणि सांस्कृतिक बदलांविषयीची ही माहिती भावी संशोधकांना मार्गदर्शक ठरणारी आहे.

या थोर विदुषींची पुणे येथे हत्या झाली.

संदर्भ :

  • Chauhan, Parth R. & Patnaik, Rajeev, ‘Gudrun Corvinus (1932–2006) – Pioneering paleoanthropologist’, Quaternary International, 192 (1): 1–5, 2008.
  • Corvinus, Gudrun,  ‘An Acheulian Occupation Floor at Chirki-on-Pravara, India’, Current Anthropology, 9(2/3):216-218, 1968.
  • Corvinus, Gudrun, ‘Prehistoric exploration at Hadar, Ethiopia’, Nature, 261 (5561): 571-572, 1976.
  • Rajaguru, S. N.; Mishra, Sheila; Ghate, Savita; Pappu, Shanti & Wadia, S. F.  ‘Obituary : Gudrun Corvinus (1932-2006)’, Man and Environment, 31(1), 2006.

                                                                                                                                                                       समीक्षक : शरद राजगुरू