संपात : 

वसंत संपात  (Vernal Equinox) : आयनिक वृत्तावरील सूर्याचे एक भ्रमण म्हणजे एक वर्ष. पृथ्वीचा अक्ष सुमारे २३.५ अंशांनी कलता असल्याने आयनिकवृत्ताचे  प्रतल आकाशातील वैषुविकवृत्ताच्या प्रतलाला सुमारे २३.५ अंशाच्या कोनात तिरपे असते. त्यामुळे ते एकमेकांना दोन बिंदूत छेदते. एका बांगडीत दुसरी बांगडी तिरकी बसवावी तसेच हे आहे. आयनिकवृत्त (ecliptic) वैषुविकवृत्ताला (celestial equator) ज्या दोन बिंदूत छेदते, त्या दोन बिंदूंना ‘संपात बिंदू’ म्हणतात. (संपात = एका ठिकाणी पडणे. अर्थात येथे दोन महत्तम वर्तुळांचे एकत्र येणे, म्हणजे एकमेकांना छेदणे) यापैकी एका बिंदूला ‘वसंत संपात बिंदू’ म्हणतात. तर दुसऱ्या बिंदूस ‘शरद संपात बिंदू’ म्हणतात. ज्या संपात बिंदूपासून ‘सूर्य-मार्ग’ वैषुविक वृत्ताच्या उत्तरेस जातो, त्या संपात बिंदूला वसंत संपात बिंदू (Vernal equinox) म्हणतात. ह्या वसंत संपात बिंदूचे स्थान तारकांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सांगता येते. सध्या सूर्य वसंत संपात बिंदूपाशी येतो, तेव्हा तो उत्तरा-भाद्रपदा नक्षत्रात असतो. म्हणजे वसंत संपात बिंदू सध्या उत्तरा-भाद्रपदा नक्षत्रात आहे असे आपण म्हणू शकतो. वसंत संपात बिंदूशी सूर्य येतो, तेव्हा तो बरोबर पूर्व बिंदू पाशी उगवतो आणि मावळतांना बरोबर पश्चिम बिंदूपाशी मावळतो. या वेळी १२ तासांचे दिनमान आणि १२ तासाचे रात्रीमान अनुभवायला येते. येथून पुढे दररोज सूर्याचे उगवणे आणि मावळणे क्षितिजावरील पूर्व आणि पश्चिम बिंदूच्या संदर्भाने उत्तरेकडे होत जाते. सूर्य एकदा वसंत बिंदूपाशी आला की पुन्हा त्याच बिंदूपाशी ३६५ दिवस ५ तास ४८ मि. ४५ सेकंदांनी येतो. आपण मात्र वर्षाचे ३६५ किंवा ३६६ असे पूर्ण दिवस धरतो. त्यामुळे संपात क्षण ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे २० किंवा २१ मार्च या दिवशी येतो.

या विशिष्ट घटनेचा उपयोग करून भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेचे वर्ष २२ मार्च रोजी सुरू होते. २२ मार्च हा दिवस म्हणजे राष्ट्रीय कॅलेंडरची सौर चैत्र महिन्याची एक तारीख असते.

आकाशाचा वैषुविक नकाशा तयार करताना वसंत संपात बिंदूला पायाभूत ०,० सहनिर्देशक मानून नकाशा तयार केला जातो. आलेखात जसे ‘क्ष’ आणि ‘य’ सहनिर्देशक असतात, तसे आकाशाच्या नकाशातील सहनिर्देशकांना होरा आणि क्रांति असे म्हणतात. सध्या २१ मार्च २००० (2000 epoch) च्या वसंत संपात बिंदूवरून तयार केलेला आकाशाचा नकाशा जगभरात वापरात आहे.

 

शरद संपात (Autumnal Equinox) : सूर्याचा प्रवास सातत्याने रोज साधारण एक अंश या गतीने पूर्वेकडे चालू असतो. तो आपल्या मार्गावरून म्हणजे आयनिकवृत्तावरून कधीच ढळत नाही. २१ जून रोजी उत्तर विष्ट्म्भबिंदूपाशी असणारा सूर्य, तीन महिन्यांनी ज्या बिंदूपाशी पोहोचतो, त्या बिंदूला शरद संपात बिंदू म्हणतात. तेव्हा तारीख असते २२ किंवा २३ सप्टेंबर. आयनिकवृत्तावर शरदसंपात बिंदू हा वसंत संपात बिंदूच्या बरोबर समोर, १८० अंशावर असतो. या बिंदूपाशी आयनिकवृत्त पुन्हा एकदा वैषुविकवृत्ताला छेदते. अर्थातच सूर्याची क्रांती (Declination) शरद संपात बिंदूशी ० अंश असते. सूर्य वसंतसंपाती असतांना ज्या घटना घडल्या त्यांचीच पुनरावृत्ती होते. पृथ्वीवर (ध्रुवीय प्रदेश) सोडला तर दोन्ही गोलार्धात सर्व ठिकाणी दिनमान आणि रात्रिमान समान म्हणजे प्रत्येकी १२ तासाचे राहते. सूर्योदय बरोबर पूर्व बिंदूशी आणि सूर्यास्त पश्चिम बिंदूपाशी होतो. तुमच्या परिसराच्या संदर्भात क्षितिजावरील पूर्व आणि पश्चिम दिशांचे बिंदू निश्चित करण्यासाठी सूर्याचे दोन्ही संपात बिंदूवरील स्थान मार्गदर्शक ठरते. मात्र या दिवशी सूर्योदयाच्या वेळी क्षितिजालगतचा सूर्य पाहावा. यानंतर सूर्य दक्षिण गोलार्धातील प्रवास धिम्या गतीने जसजसा चालू ठेवतो, तसतसा तो वैषुविकवृत्तापासून दूर सरकतो. मात्र हे अंशात्मक अंतर दक्षिणेकडे असल्यामुळे दक्षिणक्रांती दर्शविण्यासाठी ऋण चिन्ह वापरण्याचा संकेत आहे. सूर्याची क्रांती -१० अंश याचा अर्थ तो वैषुविकवृत्ताच्या दक्षिणेस दहा अंशावर आहे. शरद संपाती आलेल्या सूर्याचा मुक्काम सध्या अनुराधा नक्षत्रात असतो. म्हणजे शरदसंपात बिंदू कोठे आहे तर अनुराधा नक्षत्रात आहे. सध्या शब्दाने गडबडून जायला नको, कारण या बिंदूंची स्थाने अनेक वर्ष या विशिष्ट नक्षत्रांमध्ये असली, तरी दीर्घ कालावधीनंतर नक्षत्र संदर्भाने ती बदलतात.

शरद संपातानंतर दक्षिण ध्रुव प्रदेशात दिवस ठाण मांडून बसेल, तर उत्तर ध्रुवाजवळच्या भागात रात्र सहा महिन्यासाठी मुक्कामाला येईल. सूर्य शरद संपाती येतो तेव्हा राष्ट्रीय कॅलेंडरचा सौर अश्विन महिना सुरू होतो आणि दिनांक असतो सौर १ अश्विन.

 

समीक्षक : आनंद घैसास