ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती. योगसूत्रांमध्ये ‘ईश्वरप्रणिधानाद्वा|’ (पातञ्जल योगसूत्र १.२३), ‘तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोग:|’ (पातञ्जल योगसूत्र २.१) आणि ‘शौचसन्तोष तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमा:|’ (पातञ्जल योगसूत्र २.३२) या तीन सूत्रांमध्ये ईश्वरप्रणिधानाचा उल्लेख आला आहे. योगदर्शनात ईश्वरप्रणिधानाचे दोन प्रकारे प्रतिपादन केले आहे. पहिल्या प्रकाराचे वर्णन समाधिपादामध्ये आढळते, तर दुसरा प्रकार साधनपादामध्ये सांगितला आहे. व्यासभाष्यानुसार ज्या योग्यांचे चित्त सहजपणे समाधी अवस्थेला जाऊ शकते अशा साधकांसाठी समाधिपाद व अन्य साधकांसाठी साधनपादाची रचना असल्यामुळे ईश्वरप्रणिधान दोन प्रकारे केले जाते. समाधिपादात प्रतिपादन केलेले ईश्वरप्रणिधान हे ज्ञानाशी संबद्ध आहे, तर साधनपादातील ईश्वरप्रणिधान हे कर्माशी संबद्ध आहे, असे योगवार्त्तिककार विज्ञानभिक्षु म्हणतात (वार्त्तिक २.१). समाधिपादातील ईश्वरप्रणिधान हे असम्प्रज्ञात समाधीला कारण होणारे ध्यान होय (वार्त्तिक १.२३). योगसिद्धान्तचन्द्रिका या ग्रंथात नारायणतीर्थ (१७ वे शतक) यांनीही समाधिपादातील ईश्वरप्रणिधान हे ज्ञानरूप आहे असा निर्देश केला आहे.
समाधिपादात ‘ईश्वरप्रणिधानाद्वा’ या सूत्राद्वारे सांगितलेले प्रणिधान म्हणजे ईश्वराप्रति असणारे संपूर्ण समर्पण आणि भक्ती होय. या सूत्राद्वारे महर्षी पतंजलींनी भक्तियोगाद्वारेही चित्ताची एकाग्रता आणि समाधी साधता येते याविषयी संकेत दिला आहे. ईश्वराप्रति असणारी संपूर्ण समर्पणाची भावना साधकामध्ये स्वाभाविक रूपाने उपजतच असावी लागते. ज्या साधकामध्ये ही संपूर्ण समर्पणाची भावना असते, त्याला अन्य कोणत्याही साधनेशिवाय समाधी प्राप्त होते. परंतु, ज्या साधकामध्ये ही भक्ती उपजत नसते तो चित्ताच्या एकाग्रतेसाठी अन्य उपायांचे अनुसरण करून अभ्यास आणि वैराग्याद्वारे समाधी प्राप्त करून घेऊ शकतो. ईश्वराच्या भक्तिद्वारे प्राप्त होणारी समाधी ही अभ्यास आणि वैराग्याच्या तुलनेत अधिक शीघ्रतेने साध्य होते. भक्ती ही द्रव्यसाध्य नसून ती ॐकाराचा जप व ईश्वराचे ध्यान याद्वारे केली जाते. भक्तिमुळे साधकाचे चित्त विनायास एकाग्र होते आणि साधकाला समाधी प्राप्त होते. ‘ईश्वराप्रमाणेच चैतन्यस्वरूप असणारा माझा आत्मा सर्वदा क्लेश व कर्मांपासून मुक्त आहे’, याचे ज्ञान साधकाला होते व त्या ज्ञानाद्वारे त्याला कैवल्य प्राप्त होते. ईश्वरप्रणिधानाने योगमार्गातील अंतरायांचा म्हणजेच विघ्नांचा नाश होतो व चैतन्यस्वरूप पुरुषाचे ज्ञान होते (तत: प्रत्यक्चेतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च| पातञ्जल योगसूत्र १.२९).
साधनपादानुसार निष्काम कर्म करणे आणि वैदिक व लौकिक अशा सर्व कर्मांचे फळ ईश्वराला समर्पित करणे हा ईश्वरप्रणिधानाचा अर्थ असून ज्यांचे चित्त अधिक काळ एकाग्र अवस्थेत राहू शकत नाही अशा साधकांसाठी ते योग्य ठरते. ज्या साधकांचे चित्त सहजपणे समाधीत स्थिर होऊ शकत नाही त्या साधकांसाठी महर्षी पतंजलींनी साधनपादात क्रियायोगाचा मार्ग सांगितला आहे. तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान म्हणजे क्रियायोग होय (तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोग:||). कर्माच्या फळाची अपेक्षा न करता समर्पित भावाने कर्मफळ ईश्वराला अर्पण करणे म्हणजे ईश्वरप्रणिधान होय. या प्रणिधानामुळे कर्तृत्वाचा अभिमान नष्ट होतो, अविद्या इत्यादी क्लेश क्षीण होतात आणि चित्तशुद्धी होऊन समाधी प्राप्त होणे सुकर होते. योगवार्त्तिककार विज्ञानभिक्षु या संदर्भात असे म्हणतात की, भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ‘तू जे काही करतोस ते मला म्हणजे ईश्वराला अर्पण कर’ (यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्| यत्तपस्यसि कौन्तेय ! तत्कुरुष्व मदर्पणम्|| भगवद्गीता ९.२७) या उपदेशानुसार ईश्वराला सर्व कर्मांचे फळ समर्पित करावे.
कामतोऽकामतो वाऽपि यत्करोमि शुभाशुभम्| तत्सर्वंत्वयिसंन्यस्तं त्वत्प्रयुक्तः करोम्यहम्|| स्मृतिग्रंथातील या श्लोकात अशुभ कर्मदेखील ईश्वराला अर्पण करावे असे म्हटले असले तरी अशुभ कर्म ईश्वराला अर्पण करण्याविषयी श्रुतीचा आधार नसल्यामुळे ते ईश्वराला अर्पण करू नये, असे विज्ञानभिक्षूंनी स्पष्ट केले आहे. व्यासभाष्यात तसेच योगसिद्धान्तचन्द्रिका या ग्रंथामध्ये सर्व क्रिया व त्यांचे फळ ईश्वराला अर्पण करणे म्हणजे ईश्वरपूजन असे सांगितले आहे. कारण उपासनेमुळे ईश्वराचे साक्षात् दर्शन होणे अभिप्रेत आहे. ईश्वरप्रणिधान केल्यामुळे साधकाची चित्तशुद्धी होते, अविद्येतून निर्माण झालेले अहंकार, ममत्व इत्यादी भाव कमी होतात. साधक कर्मबंधातून मुक्त होतो आणि चित्तातील अविद्या, अस्मिता, राग, द्वेष व अभिनिवेश हे क्लेश क्षीण होतात. त्यामुळे धारणा, ध्यान आणि समाधी सहजतेने साधतात. योगसिद्धान्तचन्द्रिका या ग्रंथात नारायणतीर्थ यांनी साधनपादातील ईश्वरप्रणिधानाचे वर्णन करताना ईश्वरगीतेचा दाखला देऊन स्तुती, स्मरण, पूजा, शारीरिक, मानसिक व वाचिक कर्मे यांनी ईश्वरभक्ती दृढ करणे म्हणजे प्रणिधान अशी ईश्वरप्रणिधानाची व्याख्या केली आहे (प्रणिधानं स्तुत्यादिजनिता भक्ति:|).
योगसूत्र, त्यावरील भाष्ये आणि टीकाग्रंथ यांमध्ये ईश्वराचे व प्रणिधानाचे विवेचन केल्यामुळे योगदर्शनाला सेश्वर सांख्य असे म्हटले जाते.
पहा : क्रियायोग.
संदर्भ :
- कर्नाटक विमला (व्याख्या), पातञ्जलयोगदर्शनम्, बनारस हिंदु विश्वविद्यालय, वाराणसी, १९९२.
- कर्नाटक विमला, योगसिद्धान्तचन्द्रिका, चौखम्बा संस्कृत सीरीज आफिस, वाराणसी, २०००.
- कोल्हटकर केशव कृष्णाजी, भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, आदित्य प्रतिष्ठान, पुणे, २००८.
- पं. धुण्डिराजशास्त्री (संपा.), योगसूत्रम् (षट्टीकोपेतम्), वाराणसी, २००१.
- स्वामी हरिहरानन्द आरण्य, पातञ्जलयोगदर्शनम्व्यासभाष्य, मोतीलाल बनारसीदास दिल्ली, १९८०.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर