विल्यम स्पेन्सर व्हिक्रेय : (२१ जून १९१४–११ ऑक्टोबर १९९६). कॅनेडीयन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. व्हिक्रेय यांना ब्रिटिश अर्थतज्ज्ञ जेम्स अलेक्झांडर मिर्लीझ (James Alexander Mirrlees) यांच्या बरोबरीने बाजारपेठांतील असममित (Asymmetry) माहितीस्रोताच्या परिस्थितीत आर्थिक प्रेरणाप्रणाली विकसित केल्याबद्दल अर्थशास्त्रविषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार १९९६ मध्ये प्राप्त झाला. सदरचा पुरस्कार घोषित झाल्यानंतर धावपळीमुळे त्यांचा पुढील तीनच दिवसांत मृत्यू ओढवला. त्यामुळे त्यांच्या वतीने कोलंबिया विद्यापीठातील त्यांचे सहकारी प्रा. सी. लोएल हॅरीस यांनी सदरचा पुरस्कार स्वीकारला.
व्हिक्रेय यांचा जन्म कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील व्हिक्टोरिया शहरात झाला. ते तीन महिन्यांचे असतानाच त्यांच्या कुटुंबीयांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराकडे प्रयाण केले. मॅसॅच्यूसेट्समधील फिलिप्स अकॅडमीमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. १९३५ मध्ये येल विद्यापीठातून गणितविषयातील बी. एस. पदवी त्यांनी मिळविली. १९३७ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व पुढे तेथूनच १९४७ मध्ये अर्थशास्त्र विषयातील पीएच. डी. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी आपली बहुतेक शैक्षणिक कारकिर्द कोलंबिया विद्यापीठातच अर्थशास्त्रविषयाच्या अध्यापनात व्यथीत केली.
व्हिक्रेय यांना मानवी कल्याणाच्या (Human Welfare) गोष्टीत विशेष रस होता व त्यानुसारच त्यांनी आपले व्यावहारिक पातळीवरचे संशोधनकार्य आयुष्यभर चालू ठेवले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी, याबाबत त्यांनी संशोधन केले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या आगगाड्या तसेच रस्त्यावरील वाहनांमुळे गर्दीच्या वेळी कोंडी होते. त्यासाठी वाहनमार्ग वापरण्यानुसार तसेच अतिगर्दीच्या वेळांसाठी जादा शुल्क आकारणी करावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यामुळे नोकरधंदा करणाऱ्या व्यक्ती एकत्रितपणे प्रवास करण्यास तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यास प्रवृत्त होतील. त्यांचे वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी सूचविलेले शुल्कनिश्चिती धोरण पुढे टेलिफोन तसेच विमानवाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी अवलंबले. आपल्या Agenda For Progressive Taxation या पीएच. डी.च्या प्रबंधात त्यांनी पुरोगामी वाजवी (पर्याप्त) आयकरप्रणालीची शिफारस केली. वार्षिक उत्पन्नाऐवजी दीर्घ मुदतीमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर आकारणी व्हावी, अशी मांडणी त्यांनी केली. त्यांनी सुचविलेल्या नावीन्यपूर्ण लिलावपद्धतीचा उल्लेख नोबेल पुरस्कार वितरणाच्या समारंभात आवर्जून केला गेला. व्हिक्रेय Auctions नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या या बंदिस्त लिलावपद्धतीनुसार वस्तू सर्वांत जास्त बोली बोलणाऱ्याला (Highest Bidder), परंतु त्यानंतरच्या दुसऱ्या व्यक्तीने देऊ केलेल्या किंमतीला विकली जाते. सदर पद्धतीध्ये विक्रेता व खरेदीदार या दोघांनाही उचित किंमतीला वस्तूची खरेदी-विक्री झाल्याने लाभकारक ठरते.
व्हिक्रेय यांनी शासनाच्या आर्थिक स्वरूपांच्या प्रेरणांचा (Incentives) व्यक्तींच्या आर्थिक वर्तनावर कसा प्रभाव प्रडतो, याचे विश्लेषण केले. आर्थिक धोरणांचा होणारा परिणाम शासनकर्त्यांनाच नव्हे, तर समाजातील ज्यांच्यावर त्याचा परिणाम होतो त्यांच्याही लक्षात येत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, संबंधितांना बाजारपेठांसंबंधी असणारी असममित माहिती. शासनकर्त्यांनाच जर आपले अज्ञान जाणवत असेल, तर ते लोकांना आर्थिक प्रेरणा कशा देणार व त्यांचे आर्थिक वर्तन कसे बदलणार, या समस्यांचा ऊहापोह व्हिक्रेय यांनी केला. त्यात उत्पन्नावरील करप्रणालीपासून ते लिलावपद्धती संरचना यांसारख्या अनेक सार्वजनिक क्षेत्रांचा समावेश होतो. श्रीमंतांकडून जास्त दराने कर गोळा करून ती रक्कम गरिबांसाठी वापरणे वा सक्तीने वर्ग करण्यावर त्याचा दृढ विश्वास असला, तरी त्यामुळे लोकांना अधिक कष्ट करण्यासाठी आवश्यक त्या प्रेरणा मिळत नाहीत, हेही त्यांनी दाखवून दिले. त्यांनी १९६४ मधील आपल्या मायक्रोस्टॅटिस्टिक या ग्रंथात म्हटले की, जे अनियमितपणे व आरामदायी पद्धतीने काम करून अल्प पैसे मिळवतात, ते करांच्या जबाबदारीतून सुटतात. परिणामत: कष्ट करण्यापेक्षा लोक आरामाला अधिक पसंती देतात. त्यासाठी व्हिक्रेय यांनी अधिक उत्पन्न मिळविणाऱ्यांसाठी सीमांत (Marginal) करव्यवस्था सुचविली.
व्हिक्रेय यांचे एकूण ९ ग्रंथ प्रकाशित झाले. त्यांपैकी ग्रंथ पुढीलप्रमाणे : अजेंडा फॉर प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन (१९४७), जनरल ॲण्ड स्पेसिफिक फायनॅन्सिंग ऑफ अर्बन सर्व्हिसेस (१९६३), पब्लिक इकॉनॉमिक्स (१९९४). तसेच जर्नल ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी, अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू आणि जर्नल ऑफ फायनान्स अशा सुप्रसिद्ध नियतकालिकांमध्ये त्यांचे जवळपास १६६ लेख प्रसिद्ध झाले.
व्हिक्रेय यांना नोबेल स्मृती पुरस्काराबरोबर समाजाभिमुख संशोधनामुळे पुढील सन्मान लाभले : फेलो ऑफ इकॉनॉमेट्रिक सोसायटी (१९६७), डिस्टिंग्विश्ड फेलो ऑफ अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन (१९७८), शिकागो विद्यापीठाची मानद पदवी (१९७९), प्रेसिडें, -अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन (१९९२).
व्हिक्रेय यांचे न्यूयॉर्क-हॅरीसन येथे निधन झाले.
समीक्षक – संतोष ग्या. गेडाम