ॲलिस, मोरित्स (Allais Maurice) : (३१ मे १९११ – ९ ऑक्टोंबर २०१०). फ्रेंच अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. भौतिकी बाजारपेठांची कार्यप्रणाली व संसाधनांच्या कार्यक्षम विनियोगाबाबत केलेल्या संशोधनासाठी ॲलिस यांना अर्थशास्त्राचा १९८८ मध्ये नोबेल स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

ॲलिस यांचा जन्म फ्रान्समधील पॅरिस शहरात झाला. शालेय शिक्षण लिसी लॅकलन विद्यालयात झाले, तर १९३३ मध्ये इकोले पॉलिटेक्निक, पॅरिसमधून अर्थशास्त्र व भौतिकी या विषयांतील पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर १९३४ – १९३६ या काळात इकोले नॅशनल सुपिरियर देस माईन्स दे, पॅरिस विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९४९ मध्ये त्यांना पॅरिस विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेने डॉक्टर-इंजिनियर ही पदवी प्रदान केली. तत्पूर्वी त्यांनी १९४४ मध्ये इकोले नॅशनल सुपिरियर देस माईन्स दे, पॅरिस येथे अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर ते १९४७ – १९६८ या काळात इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक पॅरिस विद्यापीठात सैद्धांतिक अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत.

ॲलिस यांनी सार्वजनिक अगर शासकीय मालकीच्या हितसंस्था व मक्तेदारी असणाऱ्या संस्थानी सेवा व वस्तुंचा पुरवठा करताना सामाजिक लाभ व कर्यक्षमता यांत समतोल कसा साधायचा यासंबंधीचे मूलगामी संशोधन केले. यासंर्भातील सैद्धांतिक मांडणी व मार्गदर्शक तत्वांमुळे शासकीय संस्थांना किंमतीविषयक धोरण ठरविणे तसेच नियंत्रण करणे शक्य झाले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शतकात पश्चिम युरोपमधील संपूर्ण शासकीय मालकीच्या उद्योगांना त्यांच्या संशोधनकार्याचा विशेष लाभ झाला. यासंदर्भात ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ सर जॉन रिचर्ड हिक्स (Sir John Richard Hicks) व अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ पॉल अँटनी सॅम्युएल्सन (Paul Anthony Samuelson) या अर्थतज्ञांनी केलेले संशोधन कार्य व ॲलिस याचे कार्य समांतर, तर काही बाबतीत अग्रणी मानले जाते. ॲलिस यांच्या फ्रेंच भाषेतून प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचे व विचारपणालीचे त्या वेळी इंग्रजीत रूपांतर झाले असते, तर अर्थशास्त्राच्या विचारधारेला वेगळेच वळण लाभले असते, असे भाष्य सॅम्युएल्सन यांनी केले. यावरून ॲलिस यांचे यासंदर्भातील वेगळेपण व उल्लेखनीय कार्य लक्षात येते. आपल्या लिखाणाचे इंग्रजी भाषांतर व्हावे, यासाठी ॲलिस हे फारसे उत्सुक नव्हते. मुद्रा मिमांसा व सिद्धांत  पुनरजिवित करण्याचे श्रेयही त्यांच्याकडे जाते. वस्तूंची निवड करताना बाजारपेठांतील व्यक्तींच्या वर्तनातील विरोधाभासांचा शोध घेवून त्यांबाबतच्या निष्कर्षांची मांडणी करणारी प्रणाली ‘ॲलिस पॅरॉडॉक्स’ या नावाने ओळखली जाते. फ्रान्स तसेच युरोपियन देशांनी मुक्त व्यापाराला अवाजवी महत्त्व दिल्याबद्दल त्यांनी टिका केली. सर्व युरोपियन राष्ट्रासाठी एकच चलन असावे, या विचारप्रवाहाबाबतही ते साशंक होते. बाजारपेठामधील विविध घटकात संतुलन राखण्यासाठी परिश्रमपूर्वक विकसित केलेली गणिती मांडणी तसेच बाजारपेठांचे गुणधर्म व प्रवृत्ती यांबाबतचे त्यांचे संशोधनकार्य वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. शिवाय भौतिकशास्त्र या विषयात त्यांना विशेष रस असल्याने १९५२ – १९६० या काळात गुरुत्वाकर्षण तसेच विशेष सापेक्षता यांबाबत त्यांनी विविध प्रयोग केले. त्यासाठी भौतिकशास्त्र विषयाचे नोबेलही त्यांना मिळाले असते, असे म्हटले जाते.

ॲलिस यांना अर्थशास्त्रातील संशोधनकार्यासाठी पुढील सन्मान लाभले : ग्रुप ऑफ इकॉनॉमिक ॲण्ड सोशल रिसर्च, पॅरिसचा संचालक (१९४४ – १९७०), इकॉनॉमिक ॲनॅलिसिस सेंटरचा संचालक (१९४६), नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचा संचालक (१९४६ – १९८०), इंटरनॅशनल इकॉनॉमेटिक सोसायटी फेलो (१९४९), इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचा सदस्य (१९५१), रिव्ह्यू ऑफ इकॉनॉमिक पॉलिटिक्स संपादक मंडळ सदस्य (१९५२ – १९८४), न्यूयॉर्क अकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो (१९५६), रिलँचेस्टर प्राइझ ऑफ जॉन हॉपकीन (१९५८), व्हर्जिनिया विद्यापीठ डिस्टिंग्युश्ड व्हिजिटिंग स्कॉलर (१९५८-५९), एनर्जी कमिशनचा सदस्य (१९६०-६१), कौन्सिल ऑफ इकॉनॉमेट्रिक सोसायटीचा सदस्य (१९६० – १९६५), कमिशन ऑफ एक्सपर्टस् युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटचा अध्यक्ष (१९६३-६४), युनिव्हर्सिटी ऑफ ग्रोनीनगेन ऑनररी डॉक्टरेट (१९६४), नॅशनल इंडस्ट्री सोसायटी गोल्ड मेडल (१९७०), सेमिनार ऑफ मॉनेटरी ॲनॅलिसिस पॅरिस-एक्स विद्यापीठाचा तो संचालक (१९७० – १९८५), अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचा सन्माननीय सदस्य (१९७६), ऑफिसर ऑफ दि लेजीयन ऑफ ऑनर (१९७७), नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचा सदस्य (१९७८).

ॲलिस यांचे अर्थशास्त्र व भौतिकशास्त्र विषयावरील शंभराहून अधिक ग्रंथ फ्रेंच भाषेतून प्रसिद्ध झाले आहेत.

ॲलिस यांचे पॅरिस येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा