योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली. २१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिवस’ जगभर साजरा करण्यात आला. या दिवशी संपूर्ण जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारताची राजधानी दिल्ली येथे राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली. या कार्यक्रमात दोन ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ (Guinness world records) करण्यात आले. ३५,९८५ लोकांचा सहभाग असणारा सर्वांत मोठा योगवर्ग आणि एकाच योगवर्गात ८४ वेगवेगळ्या देशातील नागरिकांनी घेतलेला सहभाग असे दोन जागतिक उच्चांक (वर्ल्ड रेकॉर्ड) बनले.

२१ जून हा वर्षातील इतर दिवसांपेक्षा सर्वांत मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशीरा होतो. दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योगसाधना केल्या जातात. प्राचीन काळापासून आजतागायत या सर्व साधना गुरु-शिष्य परंपरेने जतन केल्या गेल्या. परंतु, तरीही लोकांच्या मनात योगाविषयी हवी तेवढी जागरूकता नव्हती. योगाचे महत्त्व काही मर्यादित लोकांनाच माहित होते व लोकांच्या मनात योगाविषयी काही गैरसमजही होते. उदा., योग अंगीकारणे म्हणजे संसारापासून दूर जाणे किंवा योग हा फक्त हिंदूधर्माचा भाग आहे इत्यादी. तसेच काही लोकांनी योगातील साधनांमध्ये अन्य विचित्र गोष्टींचे मिश्रण करून त्यांचे स्वरूप विकृत करून टाकले होते; उदा., बियर योग, डॉग योग इत्यादी. योगाच्या प्राचीन शास्त्रशुद्ध परंपरेतील साधनांविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून जागरूकता उत्पन्न व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी योगाभ्यास करून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले करावे हा जागतिक योग दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे. जागतिक योग दिनामुळे समाजाच्या सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यास मदत झाली आहे.

जागतिक योग दिनानिमित्त शासकीय तसेच इतर स्तरावरूनही योगाशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन केले जाते. त्यामध्ये योगासने, शुद्धिक्रिया, प्राणायाम अशा अनेक योगसंबंधित क्रियांचे प्रात्यक्षिक दाखवले जाते आणि योग-तत्त्वज्ञान, योगाचे प्राचीन ग्रंथ, योगातील साधना, योगचिकित्सा इत्यादी अनेक विषयांची माहिती देणारी व्याख्याने आयोजित केली जातात. शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांकरिता सामूहिक स्वरूपात सूर्यनमस्कार, योगासने इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.

सद्यस्थितीमध्ये योगसाधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. सन २०२० मध्ये आलेल्या कोविड साथीमुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य देखील अधिक धोक्यात आले आहे. अशा काळात असंख्य लोक महाजालकाच्या (इंटरनेटच्या) माध्यमातून एकत्र येऊन योगसाधना करताना दिसत आहे. सन २०२० व २०२१ मध्ये ज्याठिकाणी कोविड साथीमुळे लोकांना एकत्र येऊन योगसाधना करणे शक्य नाही, अशा ठिकाणी महाजालकाच्या माध्यमातून एकत्र येऊन मोठ्या उत्साहात ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला.

जागतिक योग दिनानिमित्त दरवर्षी विशिष्ट रूपरेखांचे (Theme) आयोजन करून त्याअनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी काही रूपरेखा पुढीलप्रमाणे आहेत — सन २०१७ मध्ये ‘आरोग्यासाठी योग’ (Yoga for health) ही रूपरेखा निश्चित केली होती. याप्रमाणे २०१८ मध्ये ‘शांततेसाठी योग’ (Yoga for Peace), २०१९ मध्ये ‘हृदयासाठी योग’ (Yoga for Heart), २०२० मध्ये ‘कौटुंबिक योग’ (Yoga at Home and Yoga with Family) आणि २०२१ मध्ये ‘कल्याणकारी योग’ (Yoga for well-being) या रूपरेखा निश्चित करण्यात आल्या होत्या.

संदर्भ :

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर