सांख्य-योग दर्शनांनी सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण मानले आहेत. हे त्रिगुण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या गुणांसारखे इंद्रियांनी ग्रहण करता येऊ शकत नाहीत तर त्यांचे ज्ञान बुद्धीद्वारेच होऊ शकते. सांख्य आचार्यांनी विश्वातील सर्व पदार्थ, त्यांचे गुणधर्म आणि क्रिया यांच्यातील साधर्म्य आणि वैधर्म्य ओळखून त्यानुसार निश्चित केलेले हे तीन स्वभावविशेष आहेत. त्यामुळे एखाद्या पदार्थाचे ज्ञान इंद्रियांनी होऊ शकते, परंतु त्यामध्ये असणाऱ्या गुणांचे ज्ञान इंद्रियांनी होऊ शकत नाही. या तीन गुणांचे स्वरूप व कार्य सांख्यदर्शनात पुढीलप्रमाणे वर्णिलेले आहे – सत्त्वं लघु प्रकाशकमिष्टमुपष्टम्भकं चलं च रज: । गुरु वरणकमेव तम: प्रदीपवच्चार्थतो वृत्ति: ॥ (सांख्यकारिका १३).
सत्त्वगुण हा स्वभावाने लघु (हलका) व प्रकाशक (ज्ञान करवून देणारा), रजोगुण हा चल (क्रियाशील) व उपष्टम्भक (प्रेरक) आणि तमोगुण हा गुरु (जड) व वरणक (आवरण उत्पन्न करणारा) आहे. तीन गुणांचा स्वभाव आणि त्यांचे कार्य परस्परविरोधी असले तरीही ते कायम एकत्र राहतात व क्रिया निष्पन्न करतात. ज्याप्रमाणे दिव्यामध्ये वात, तेल आणि ज्योती हे तीन घटक असतात, त्यांचे स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध आहेत तरीही प्रकाश देणे या एका प्रयोजनासाठी ते एकत्र राहतात, त्याप्रमाणे सत्त्व (ज्ञान), रज (क्रिया) व तम (या दोन्हीवर आवरण) हे तीन धर्म विरोधी असले तरीही एका विशिष्ट प्रयोजनासाठी हे त्रिगुण एकत्र राहतात. पुरुषाला (जीवाला) भोग आणि अपवर्ग प्रदान करणे हे त्यांचे प्रयोजन आहे. या श्लोकामध्ये वर्णिलेले गुणांचे स्वरूप हे त्यांचे मूलभूत आणि वैश्विक स्वरूप आहे. परंतु, त्याचबरोबर गुणांचे एक सापेक्ष स्वरूप आहे, ज्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला वेगळा येऊ शकतो. उदा., ग्रंथालय पाहिल्यावर ज्या व्यक्तीला पुस्तकांची आवड आहे, त्या व्यक्तीला आनंद होतो; ज्याला पुस्तकांविषयी व अभ्यासाविषयी घृणा आहे, अशा व्यक्तीला दु:ख होते व एखाद्या अशिक्षित व्यक्तीला ग्रंथालय म्हणजे काय, तिथे काय असते याची कल्पनाही नसते, अशा व्यक्तीच्या मनात मोह (यथायोग्य ज्ञान न होणे) उत्पन्न होतो. ग्रंथालय या एकाच विषयाशी संबंधित सुख, दु:ख आणि मोह अशा तीन प्रकारचे सापेक्ष ज्ञान तीन वेगवेगळ्या लोकांना होते. या सापेक्ष रूपाचे वर्णन पुढील कारिकेमध्ये केले आहे – प्रीत्यप्रीतिविषादात्मका: प्रकाशप्रवृत्तिनियमार्था: । अन्योन्याभिभवाश्रयजननमिथुनवृत्तयश्च गुणा: ॥ (सांख्यकारिका १२)
सत्त्वगुणाचा अनुभव सुखाच्या (प्रीती) रूपात, रजोगुणाचा अनुभव दु:खाच्या (अप्रीती) रूपात आणि तमोगुणाचा अनुभव विषाद म्हणजे यथायोग्य ज्ञान नसणे या स्वरूपात येतो. सत्त्वगुणाची क्रिया प्रकाश म्हणजे ज्ञान करवून देण्यासाठी, रजोगुणाची क्रिया प्रवृत्ती उत्पन्न करण्यासाठी व तमोगुणाची क्रिया नियमन म्हणजे आवरण तसेच नियंत्रण करण्यासाठी असते. हे तीन गुण एकमेकांना वरचढ होतात (अभिभव), एकमेकांना साहाय्य करतात (आश्रय), एकमेकांना उत्पन्न करतात (जनन) आणि एकमेकांच्या जोडीने राहतात (मिथुन) असे या गुणांचे स्वरूप आहे.
(१) अनोन्य-अभिभव : ज्यावेळी सत्त्वगुणाचा प्रादुर्भाव होऊन ज्ञान प्राप्त होते, त्याचवेळी तमोगुण त्या ज्ञानावर आवरण उत्पन्न करू शकत नाही. ज्यावेळी निद्रेमध्ये तमोगुणाचा प्रादुर्भाव होऊन ज्ञानावर आवरण उत्पन्न होते, त्याचवेळी सत्त्वगुण ज्ञान उत्पन्न करू शकत नाही. हीच परिस्थिती रजोगुणाच्या बाबतीतही आहे. एकाच वेळी क्रिया (रज) आणि क्रियेवर आवरण (तम) असू शकत नाही. तसेच ज्यावेळी ज्ञान होते (सत्त्व), त्याच वेळी क्रिया होऊ शकत नाही (रज) व ज्यावेळी क्रिया होते त्याचवेळी ज्ञान होऊ शकत नाही. त्यामुळे तीन वेगवेगळे स्वभाव असणाऱ्या गुणांपैकी एका वेळी केवळ एक गुण प्रबळ राहतो व अन्य गुण दुर्बल होतात. एक गुण स्वत:ची क्रिया निष्पन्न करण्यासाठी अन्य दोन गुणांना दाबतो व स्वत: वरचढ ठरतो.
(२) अनोन्य-आश्रय : एक गुण प्रबळ झाल्यावर अन्य दोन गुण दुर्बल होतात; परंतु, ते प्रबळ झालेल्या गुणाला एकप्रकारे साहाय्य करतात. सत्त्वगुणाच्या प्रकर्षाने ज्ञान उत्पन्न होते; परंतु, ज्ञान उत्पन्न होण्यासाठी रजोगुणाद्वारे आधी काही क्रिया होऊन त्याचे सहकार्य व्हावे लागते. उदा., जिभेचा अन्नाशी संयोग झाल्यावर चवीचे ज्ञान (सत्त्व) होते. परंतु, ते ज्ञान होण्यासाठी हाताने घास उचलून तो तोंडापर्यंत नेण्याची क्रिया (रज) व्हावी लागते. त्याचप्रमाणे हाताने घास उचलण्याची क्रिया (रज) करण्याआधी डोळ्यांनी ताटातील अन्न पाहावे लागते (सत्त्व). याप्रमाणे गुण एकमेकांना साहाय्य करतात.
(३) अनोन्य-जनन : एका वेळी एक गुण प्रबळ असला तरी तो दीर्घकालपर्यंत प्रबळ राहू शकत नाही. एका गुणाने काही काळ क्रिया केल्यानंतर आपोआप तो दुसऱ्या गुणाला उत्पन्न करतो. उदा., खूप वेळ अभ्यास केल्यानंतर (सत्त्व) किंवा खूप वेळ काम केल्यानंतर (रज) आपोआप झोप येते (तम). म्हणजे एका गुणाचे काही वेळ प्राबल्य राहिल्यानंतर कालांतराने तो दुसऱ्या गुणाला उत्पन्न करतो.
(४) अनोन्य-मिथुन : सत्त्व, रज, तम हे तीन गुण नेहमी एकत्र राहतात. कोणत्याही वस्तूमध्ये केवळ सत्त्व किंवा रज किंवा तम असू शकत नाही. सामान्यपणे मिथुन हा शब्द दोघांच्या जोडीसाठी वापरला जातो; परंतु, येथे हा शब्द तीन गुणांसाठी वापरला आहे.
सांख्यदर्शनात स्वीकारलेल्या २५ तत्त्वांपैकी पुरुष वगळता बाकी सर्व तत्त्वांमध्ये तीन गुण आहेत. विश्वाची उत्पत्ती होण्याआधी व प्रलय झाल्यानंतरअसणाऱ्या अवस्थेमध्ये ज्यावेळी हे तीन गुण समान अवस्थेमध्ये निष्क्रिय रूपाने असतात, त्या अवस्थेलाच ‘प्रकृति’ असे म्हटले आहे. ज्यावेळी गुण क्रियाशील होतात, त्यावेळी त्यांमध्ये विषमता उत्पन्न होऊन सृष्टीची अर्थात २३ तत्त्वांची उत्पती होते. महत् (बुद्धी), अहंकार, मन, ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, ५ तन्मात्र व ५ महाभूते ही ती २३ तत्त्वे होत. प्रकृतिरूप कारणामध्ये त्रिगुण असल्यामुळे या २३ तत्त्वांमध्येही त्रिगुण असतात, परंतु ते साम्यावस्थेत नसतात. बुद्धीमध्ये सत्त्वगुणाचा उत्कर्ष झाल्यावर धर्म, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य हे भाव प्रकट होतात व तमोगुणाचा उत्कर्ष झाल्यावर अधर्म, अज्ञान, राग व अनैश्वर्य हे भाव प्रकट होतात. अहंकारामध्ये सत्त्वगुणाचा उत्कर्ष झाल्यावर मन, ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये उत्पन्न होतात व तमोगुणाचा उत्कर्ष झाल्यावर तन्मात्र उत्पन्न होतात. याचप्रमाणे मन, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, तन्मात्र व महाभूते यांमध्ये सत्त्व, रज, तम यांच्या वेगवेगळ्या प्रमाणानुसार वेगवेगळे भाव उत्पन्न होतात.
सांख्य व योग या दोन दर्शनांच्या सिद्धांतांच्या जडणघडणीमध्ये तसेच भगवद्गीतेमध्ये त्रिगुण संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे. सामान्यपणे गुण शब्दाचा अर्थ ‘एखाद्या व्यक्तीमध्ये असणारी विशेष प्रकारची योग्यता’ असा समजला जातो. परंतु, गुण या शब्दाचा मूळ संस्कृत अर्थ गौण, दुय्यम असा आहे. सत्त्व, रज, तम या तिघांना गुण (गौण) म्हणण्याचे कारण असे की, यापैकी कोणताही गुण इतरांपेक्षा श्रेष्ठ नाही; तिघांचे महत्त्व एकसारखेच आहे. हे तीन गुण ज्या प्रकृतीमध्ये राहतात, ती तीनही गुणांची साम्यावस्था म्हणजे ‘प्रधान’ होय व तिच्या तुलनेने हे तीन गुण म्हणजेच दुय्यम होत.
जरी सांख्यदर्शनामध्ये त्रिगुणांचे विशेषत्वाने विवेचन केलेले असले तरीही या संकल्पनेचे मूळ उपनिषदामध्ये आहे. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये संकेतरूपाने त्रिगुणांचे वर्णन आढळते. ‘अजामेकां लोहितशुक्लकृष्णां बह्वी: प्रजा: सृजमानां सरूपा: । (श्वेताश्वतरउपनिषद् ४.५) या मंत्रामध्ये अजा (उत्पन्न न होणारी) शब्दाद्वारे प्रकृतीचा निर्देश केला आहे. लोहित (लाल), शुक्ल (शुद्ध, सफेद) व कृष्ण (काळा) या तीन विशेषणांद्वारे क्रमश: रज, सत्त्व व तम या तीन गुणांचा निर्देश केला आहे. आयुर्वेदशास्त्रातही त्रिगुणांच्या सिद्धांतावर आधारित वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे वर्णन केले आहे. त्यानुसार सत्त्वाचा संबंध पित्ताशी, रजाचा संबंध वाताशी आणि तमाचा संबंध कफाशी आहे. याप्रमाणे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये त्रिगुण ही संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
समीक्षक : कला आचार्य