पारदर्शक रंगहीन हिरे सर्वांत मूल्यवान असतात, परंतु त्याचबरोबर विविध रंगाच्या हिऱ्यांचेसुद्धा आपणास आकर्षण असते. अशा विविध रंगातील सर्वोत्तम हिरा म्हणजेच हिरव्या रंगाचा हिरा. पोलंडचा राजा स्टॅनिस्लॉ ऑगस्ट (१७२१) याच्या ड्रेझ्डेन पॅलेसमधील ग्रीन वॉल्ट या संग्रहालयात सर्वांत मौल्यवान हिरव्या रंगाचा हिरा ड्रेझ्डेन ग्रीन डायमंड या नावाने ओळखला जातो. या हिऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हिरव्या रंगाची छटा सर्व पृष्ठभागावर सारख्याच तीव्रतेची असून याचे वजन ४१ कॅरट इतके आहे. आंध्र प्रदेशातील कोल्लुर येथील खाणीतून ह्या हिऱ्याची उत्पत्ती झाली असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.

हिरव्या रंगाची तीव्रता सर्व पृष्ठभागावर समप्रमाणात असेल तर नैसर्गिक हिरवा हिरा (ड्रेझ्डेन ग्रीन डायमंड), परंतु हिरव्या रंगाची संपृक्तता ठिकठिकाणी बदलताना दिसत असेल तर् हुबेहुब हिरवा हिरा असे विश्लेषण अमेरिकेतील जेमॉलॉजिकल इन्स्टिटयुट या संस्थेने केले आहे.

हिरवा रंग धारण करण्याची कारणे : पृथ्वीच्या पोटात खोलवर असणारे हिरे युरेनियम आणि थोरियम यासारख्या किरणोत्सर्गी घटकांनी जेव्हा वेढले गेलेले असतात, तेव्हा या किरणोत्सर्गी घटकांचा नाश होतांना होणार्‍या उत्सर्जन क्रियेमुळे ते आजूबाजूला असलेल्या हिऱ्यांचा स्फटिक जालकात शिरून त्यातील कार्बन अणूंवर प्रहार करतात. ह्या प्रहारामुळे हिऱ्यातील कार्बन अणू विस्थापित होतात आणि स्फटिक जालकात विकृती निर्माण करतात. यामुळे हिऱ्यांचा स्फटिकातून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा मार्ग बदलतो. परिणामत: हिऱ्याचे स्फटिक प्रकाश किरणे शोषून घेतात आणि निवडकपणे वर्णपटात तरंगाद्वारे फक्त हिरवा रंग प्रसारित करतात. हिऱ्यांच्या बाह्य थरावर याचा प्रभाव पडल्यामुळे, परिणामी बाह्यथर हिरवा रंग धारण करतो. ह्या हिरव्या रंगाने निरीक्षकांच्या डोळ्यापर्यंत मार्गक्रमण केल्याने आपणास हिऱ्याचे स्फटिक हिऱव्या रंगात दिसतात.

अशा प्रकारे किरणोत्सर्गाने हिऱ्यांचे स्फटिक नैसर्गिकरित्या हिरवा रंग धारण करतात. परंतु काही वेळा हिऱ्यांच्या स्फटिक जालकात नायट्रोजन, हायड्रोजन व निकेल यांच्या उपस्थितीने वा संरचनेतील दोषांमुळेसुद्धा हिऱ्याला हिरवा रंग प्राप्त होतो. त्यामुळे नैसर्गिकरीत्या हिरव्या रंगाचा हिरा ओळखण्यासाठी रत्नपारख्यांची खरी कसोटी लागते. हिरव्या रंगाचा हिरा अत्यंत दुर्मिळ असून याबाबत फारसे शास्त्रीय संशोधन झालेले नाही. बहुतांश हिऱ्यांमध्ये फक्त पृष्ठभागावरच हिरवा रंग असून पॉलिश केल्यावर वा पैलू पाडल्यावर हिरवा रंग नष्ट होतो म्हणूनच ड्रेझ्डेन हिरा अत्यंत दुर्मिळ प्रकारातील समजला जातो.

संदर्भ :

  • Balfour, I.  Famous Diamonds Collins, London, 1987.
  • Boss art, G. The Dresden Green Journal of Gemology Vol. 21/6, 1989.
  • Bruton, E. Diamonds Chilton Book Company, Radnor, 1978.
  • Collins, A.T. Color centers in diamonds Journal of Gemology Vol.18/1, 1982.

समीक्षक : पी. एस.  कुलकर्णी