जगातील सर्वांत मूल्यवान हिरा – होप. तो निळ्या रंगामुळे प्रसिद्ध आहे. फ्रेंच व्यापारी झां बातीस्त ताव्हेर्न्ये (Jean Baptiste Tavernier) यांच्या मते होप डायमंडची उत्पत्ती १७ व्या शतकात आंध्र प्रदेशातील कोल्लूर या खाणीतून झाली आहे. १९५८ मध्ये हॅरी किन्स्टन यांनी होप डायमंडला अमेरिकेतील स्मिथसोनियन संस्थेस दान केले.

पृथ्वीवर आढळणारे सर्व नैसर्गिक हिरे फक्त उष्णता वाहक असून विद्युत वाहक नसतात. परंतु नैसर्गिक निळे हिरे मात्र उष्णता व विद्युत या दोन्हीचे वाहक असतात. होप व तसाच महत्त्वाचा विट्टेलस्बॅक ग्राफ हिरा (Wittelsbach – Graff Diamond) हे लाल रंगाची स्फुरदीप्ति (Phosphorescence) दर्शवितात. (अति नील किरणांचा झोत काढून घेतल्यावर दिसणाऱ्या दीप्तिला स्फुरदीप्ति म्हणतात.)

पृथ्वीवरील खडकांवर नियमितपणे होणाऱ्या भूपट्ट हालचालीद्वारे निळ्या रंगाच्या हिऱ्यांची उत्पत्ती.

हिऱ्याच्या स्फटिक जालकात कार्बनची जागा नायट्रोजन व बोरॉन या दोन मूलद्रव्यांनी घेतली असल्याचे आढळले आहे. नायट्रोजन सामान्यपणे सुटे अणू वा अणूंच्या जोडीच्या रूपात कार्बनची जागा घेऊ शकतो. स्फटिक जालकात नायट्रोजन मूलद्रव्याच्या आधारे हिऱ्यांचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करतात. Type I यामध्ये हिऱ्यांच्या स्फटिक जालकात नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते. तर Type II ह्या प्रकारामध्ये नायट्रोजनचे प्रमाण अति अल्प (10 ppm पेक्षा कमी) असते. Type II प्रकारात पुन्हा Type II a व b असे उपप्रकार आहेत. Type II a मधील हिरे बहुतेक पांढऱ्या रंगाचे असतात. या प्रकारात प्रसिद्ध कोहिनूर व कुलिनन हिऱ्यांचा समावेश आहे. तर Type II b पूर्णपणे नायट्रोजन विरहित असतो, परंतु स्फटिक जालकातील बोरॉनच्या उपस्थितीमुळे हिऱ्यांचा रंग निळा होतो. हे खरे निळे हिरे मानले जातात.

निळा रंग धारण करण्याची कारणे : अमेरिकेतील जेमॉलॉजिकल इन्स्टिटयूट या संस्थेतील इव्हान स्मिथ यांनी भूपट्ट विवर्तनाचा (Plate tectonic) अभ्यास करून हिरे निळा रंग धारण करण्यासंबंधी संशोधन केले. पृथ्वीवरील शिलावरणात भूखंडपट्टा व सागरपट्टा यामध्ये हालचाली होत असतात. या हालचालींमध्ये कधीकधी भूखंडपट्टा व सागरपट्टा अभिसरण प्रक्रियेद्वारे एकमेकांजवळ येतात. अशा वेळी सागरपट्याचे नमवणी क्षेत्रात (Subduction zone) स्थित्यंतर होते. परिणामत: सागरपट्यातील खडक खोलवर गेल्यामुळे यातील खडकांचा काही भाग वितळतो. समुद्राच्या पाण्यात विपुल असलेले बोरॉन अणू जिथे हिरे तयार होण्यास अनुकूल वातावरण असते तिथपर्यंत सजल खनिजांद्वारे जातात. त्यामुळे हिरे निर्मितीच्या अनुकूल काळात या वितळलेल्या भागामध्ये स्फटिकीकरण प्रक्रियेत बोरॉन घटक त्यात मिसळला गेल्यास कार्बन अणूंची जागा बोरॉन अणूंनी घेतल्यावर निळा रंग संक्रमित करतात.

नैसर्गिक निळे हिरे दुर्मिळ असतात आणि कृत्रिम निळ्या रंगाचे हिरे मात्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. अशा हिर्‍यांना त्यांच्या सत्यतेसाठी प्रयोगशाळेच्या चाचणीची आवश्यकता असते. निळा रंग नैसर्गिक आहे वा कृत्रिम आहे, याबाबतची तपासणी करण्यासाठी त्यांच्यातील विद्युत वाहकता आणि काही प्रकरणांमध्ये स्फुरदीप्ति तपासणे आवश्यक असते.

संदर्भ :

  • Balfour, I. Famous Diamonds Collins, London, 1987.
  • Bruton, E. Diamonds Chilton Book Company, Radnor, 1978.
  • Fowler, M. HOPE Adventures of a Diamond Simon & Schuster, 2002.
  • Gems & Gemology Quarterly Journal of Gemological Institute of America, 2018.

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी