संगीतशास्त्राचे शिक्षण देणारी एक ख्यातनाम संस्था. या संस्थेची स्थापना संगीतज्ञ बी. आर. देवधर यांनी १ जुलै १९२५ रोजी मुंबईत केली. हिचे कार्य प्रारंभी प्रार्थना समाज या संस्थेच्या जागेत सुरू झाले. गुरुवर्य विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतून स्थापन केलेल्या या संस्थेने संगीत क्षेत्रात विधायक कार्य केले. सुरुवातीला संस्थेत अभंग आणि गीते शिकवली जात असत. ती ऐकण्यासाठीच गर्दी होऊ लागली. यातूनच देवधर यांना आपले कार्य पुढे चालविण्यासाठी दिशा मिळाली. राम मोहन शाळा सुटल्यानंतर हे संगीत वर्ग तिथे भरत असत. सरोजिनी नायडू यांनी या विद्यालयाला ‘स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक’ हे नाव सुचविले आणि ते कायम करण्यात आले. प्रार्थना समाजासारख्या नामवंत संस्थेत हे वर्ग सुरू झाल्याने अभिजन वर्गातील मुलीदेखील संगीत शिक्षणाकरिता येऊ लागल्या. पलुस्कर मुंबईला आले असताना त्यांच्या हस्ते विद्यालयाचा औपचारिक उद्घाटन समारंभ १३ नोव्हेंबर १९२५ रोजी झाला. सुनियोजन, शिस्तबद्धता, आधुनिक विचारसारणी व टापटीप राहणी आदींमुळे देवधरांचे नाव आदर्श गुरू म्हणून घेतले जाऊ लागले. ज्या मुलांची फी भरायची ऐपत नाही, अशासाठी त्यांनी रविवारी संगीताचे मोफत वर्ग सुरू केल्याने संगीत प्रसाराचे कार्य जोमात सुरू झाले. विद्यालयाच्या वार्षिक समारंभांना अध्यक्ष म्हणून सर गोविंदराव प्रधान, न. चिं. केळकर, भुलाभाई देसाई, न्यायमूर्ती पाटकर, विल्सन महाविद्यालयाचे प्राचार्य मेकँझी, मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज लाईड इत्यादी प्रतिष्ठित व्यक्ती लाभल्या. त्यामुळे आणि रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे, मुरादखाँ, विलायत हुसेनखाँ, फैयाजखाँ, मास्तर कृष्णराव इत्यादी नामवंत कलाकारांचे जलसे सुरू झाल्यामुळे विद्यालयाचा नावलौकिक वाढला. १९३६ च्या सुमारास बालवयातील कुमार गंधर्व या संस्थेत संगीत शिक्षणाकरिता दाखल झाले. त्यांच्यामुळे देवधरांचे गुरूपण अधिक झळाळून निघाले. १९३९ साली मोदी चेम्बर्समध्ये विद्यालयाचे स्थलांतर झाले. यथावकाश विद्यालयाचे ‘देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक’ असे नामांतर झाले (१९५८). जागतिक महायुद्धाच्या काळात थांबलेले सांगीतिक जलसे पुन्हा सुरू झाले. गाण्याच्या मैफिलीचे ध्येय देवधर यांनी ठेवलेले नव्हते; पण मोठ्या सांगीतिक प्रवासातील संगीतकार, गुरू, आदर्श संस्थाचालक, बंदिश संग्राहक आणि आवाज संस्कार शास्त्राचे अभ्यासक या नात्याने त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. त्यामुळे ख्यातनाम कलाकार हौसेने आणि आपुलकीने येऊन आपली कला सादर करत. येथील सादरीकरण प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले. संस्थेत गरजू, होतकरू विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास आदींची सोय करून संगीत शिक्षणाची सोय केल्यामुळे विद्यार्थ्यांना चरितार्थाचे साधन मिळाले शिवाय त्यातून संगीत शिक्षकही निर्माण झाले.
बी. आर. देवधरांनी लावलेल्या या रोपट्याचे अल्पावधीत मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झाले, आज ९२ वर्षांनंतरही हे कार्य नेटाने सुरू आहे. या संस्थेमध्ये गायन, वादन – तबला, हार्मोनियम, सतार इत्यादी वाद्ये व नृत्य या विषयांचा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या मान्यतेनुसार प्रारंभिक ते विशारद परीक्षा यासाठीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. देवधरांनंतर त्यांचे भाचे शाम गोगटे यांनी आणि नंतर गिरीश आणि संगीता गोगटे यांनी ही धुरा सांभाळली आहे. कालानुरूप कार्यपद्धतीत बदलही केले जात आहेत.