रंगीत हिऱ्यांमध्ये गुलाबी हिऱ्यांचे सौंदर्य उच्चस्थानी आहे. हे दुर्मिळ असून संग्रहकांमध्ये लोकप्रिय आहेत. पूर्वी भारत गुलाबी हिऱ्यांच्या निर्मितीत अग्रेसर मानला जात होता. सर्वांत विशाल व प्रसिद्ध गुलाबी हिरा – दर्या-ए-नूर ह्याचे वजन सुमारे १९० कॅरेट इतके आहे. नूर-उल-ऐन (६० कॅरेट), शाह-जहान (५० कॅरेट), आग्रा (३० कॅरेट) अशा सर्व गुलाबी हिऱ्यांची निर्मिती दक्षिण भारतातील पूर्वीच्या हैद्राबाद संस्थानातील गोलकोंडा प्रदेशातील कोल्लूर खाणीमधून (सध्या गुंटुर जिल्हा, आंध्र प्रदेश) झाली. अलीकडच्या काळात मात्र ऑस्ट्रेलिया हा देश गुलाबी हिऱ्यांच्या उत्पादनात अग्रेसर आहे. येथील ऑर्गिले या भूप्रदेशात अंदाजे ३० ते ३५ द. ल. कॅरेट हिऱ्यांच्या साठ्यापैकी फक्त १०,००० कॅरेट हिऱ्यांचे उत्पादन केले गेले आहे.

गुलाबी रंग धारण करण्याची कारणेनिळ्या रंगाच्या हिऱ्यांप्रमाणे गुलाबी रंग हिऱ्यांच्या स्फटिक जालकात नायट्रोजन व बोरॉन यांच्या अस्तित्वामुळे तयार होत नाही, तर गुलाबी रंग केंद्रकांद्वारे तयार होतो. हिऱ्यांच्या स्फटिक जालकात अणू स्तरांमध्ये विकृती निर्माण झाल्यामुळे स्फटिक जालकात रंगीत केंद्रके वर्णपटावरील दृश्यमान भागात प्रकाश किरणे निवडून गुलाबी रंग धारण करतात.

भारत व श्रीलंका भूपट्ट सरकण्याचे भूशास्त्रीय कालखंडातील विविध टप्पे.

या हिऱ्यांमध्ये गुलाबी आणि तपकिरी समतलावरील रंगद्रव्ये बहुधा स्फटिकाच्या समांतर घसरतलावर रंगीत कणांद्वारे केंद्रित असतात. बर्‍याचदा रंगहीन हिऱ्यांमध्ये असे रंगीत कण रंगपट्ट्यांद्वारे केंद्रित केले जातात. हे समांतर रंगपट्टे अष्टफलक स्फटिक रचनेवर आधारित आहेत. पृथ्वीच्या भूविवर्तनी हालचालींमुळे आकार्य विरुपण (Plastic deformation) होऊन याद्वारे हिरे अष्टफलक स्फटिक धारण करतात. त्यामुळे समानपणे गुलाबी रंग पसरलेल्या गुलाबी हिऱ्यांची निर्मिती होणे दुर्मिळ आहे.

गुलाबी हिऱ्यांच्या निर्मितीची कारणे : पृथ्वीवरील भूविवर्तनी हालचालींमुळे सु. २५० द. ल. वर्षांपूर्वी एकसंघ असलेला गोंडवना भूखंड तुटून आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया असे भूखंड तयार झाले. पृथ्वीतील अंतर्गत विवर्तनीय हालचालींमुळे हे भूखंड एकमेकांपासून दूर गेले आहेत. सु. ७१ द. ल. वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धात असलेला भारत आणि श्रीलंका हे देश अशा हालचालींमुळे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धाकडे सरकले. या वेळी तयार होणाऱ्या अति दाब व उष्णता यामुळे पृथ्वीच्या अंतरंगात रत्नांची निर्मिती झाली असावी असे शास्त्रज्ञांना वाटते. याच कारणामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये गुलाबी हिरे आढळतात.

जेव्हा हिरे पांढरे किंवा फिकट पिवळे रंग सोडून इतर कोणताही  रंग धारण  करतात, तेव्हा ते फॅन्सी कलर डायमंड्स या प्रकारात मोडतात. गुलाबी हिरे फॅन्सी कलर डायमंड या प्रकारातील आहेत. पांढऱ्या हिऱ्यांप्रमाणे अंतर्गत स्पष्टतेसह अनेक निर्दोष गुलाबी हिरे आढळले आहेत. परंतु पूर्णपणे निर्दोष असलेला केवळ ‘पिंक स्टार’ हा गुलाबी हिराच आहे. फॅन्सी रंगीत हिऱ्यांमधील गुलाबी हिऱ्यांचे मूल्यांकन रंगछटा, संपृक्तता व टोननुसार केले जाते. रंगछटा प्राथमिक आणि दुय्यम रंगांचा संदर्भ देते, तर संपृक्तता वितरणाचा व टोन रंगाच्या तीव्रतेचा संदर्भ देते.

हिऱ्यांवर एक समान गुलाबी रंगाचे वितरण आकार्य विरुपण या क्रियेमुळे झाल्याचे मत किंग्ज महाविद्यालय, लंडन येथील प्रोफेसर कॉलिन्स यांनी मांडले आहे. उदबलाच्या (Stress) दिशेने समांतर रचनेत असणारे कार्बन अणूंचे थर विरुपण प्रक्रियेदरम्यान काही प्रमाणात एकमेकास समांतर असणाऱ्या घसरतलांवर विस्थापित होतात. अशा परिस्थितीत घसरतलांवर अज्ञात रचना दर्शविणारी केंद्रके तयार होऊन त्यांनी गुलाबी रंग वितरित करणारे वैशिष्ट्यपूर्ण वर्णक्रमी तयार केल्यामुळे हिऱ्यांनी गुलाबी रंग धारण केला आहे असे ते म्हणतात.

संदर्भ :

  • Balfour, I. Famous Diamonds Collins, London, 1987.
  • Bruton, E. Diamonds Chilton Book Company, Radnor, 1978.
  • Collins, A.T. Color centers in diamonds Journal of Gemology Vol. 18, 1982.
  • Gems & Gemology “Characterization and Grading of Natural-Color Pink Diamonds”, 2017.

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी