लक्षद्वीपमधील प्रसिद्ध प्रिन्सेस रॉयल जहाज. लक्षद्वीप बेटसमूहातील बंगारम हे एक वस्ती नसलेले छोटे प्रवाळ बेट अगाट्टी बेटापासून आठ किमी. अंतरावर आहे. सन १९९० मध्ये काही हौशी पाणबुड्यांना येथील पाण्यात जहाजाचे अवशेष दिसले. त्यातले काही अवशेष त्यांनी बाहेर काढल्याचे कळल्यानंतर लक्षद्वीप प्रशासनाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेशी संपर्क साधला. १९९१ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेने प्राथमिक संशोधन केल्यावर हे महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ असल्याचे लक्षात आले. मुंबईच्या एका क्लबने १९९२ मध्ये बुड्या मारून ‘प्रिन्सेस रॉयल १७९२ʼ हे नाव कोरलेली ब्राँझची एक घंटा बाहेर काढली. सन १९९५ मध्ये भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सुजाताʼ या नौकेने जहाज बुडल्याची जागा निश्चित केली. बुडलेल्या जहाजाचे अवशेष ६० मी. खोलीपर्यंत ५००० चौमी. क्षेत्रफळात विखुरल्याचे दिसून आले.

‘प्रिन्सेस रॉयल १७९२ʼ असे कोरलेली ब्राँझची घंटा.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने अधोजल पुरातत्त्वीय संशोधनासाठी विशेष विभाग सुरू केल्यानंतर या विभागाने भारतीय नौदलाच्या मदतीने उत्खननाचा प्रकल्प हाती घेतला (२००१). सर्वप्रथम ‘आयएनएस जमुनाʼ या नौकेने सर्वेक्षण करून उत्खननाचा आराखडा तयार केला. त्यानंतर भारतीय नौदलाने ‘आयएनएस निरीक्षकʼ ही नौका उत्खननासाठी पाठवली (२००२). ही नौका पाण्यात ५४ मी. खोलीपर्यंत अभ्यास करण्यास सक्षम असल्याने पाण्यात बुड्या मारून ३६ ते ५१ मी. या खोलीपर्यंतच्या तळाचे संशोधन करण्यात आले. या संशोधनात सुमारे २.२ मी. लांबीच्या चार तोफा, जहाजाचा नांगर, गंजलेल्या अवस्थेतील लोखंडाच्या वस्तू, तांब्याच्या १३५ सेंमी. लांब कांबी, तांब्याचे पत्रे, तांब्याची भांडी, जहाजावरील भट्टीच्या विटा, जहाजाच्या विविध लाकडी भागांचे तुकडे, हिरव्या काचेच्या बाटल्या आणि मातीची भांडी मिळाली. मातीच्या भांड्यांमध्ये झिलईदार तपकिरी, पांढऱ्या रंगावर निळी सजावट असणारी मिंग राजवटीतील (Ming Dynasty) चिनी मातीची भांडी व हिरवी झिलईदार भांडी यांचा समावेश होता. उत्खननात मिळालेल्या तांब्याच्या पत्र्यांवर अनेक ठिकाणी ‘पीएमसीओʼ (PMCo) असे चिन्ह कोरलेले आढळले. हे चिन्ह इंग्लंडमधील पॅरीज माइन कंपनीचे (Parys Mine Co.) असल्याचे सिद्ध झाले.

प्रिन्सेस रॉयल जहाजाचे उत्खनन.

उत्खननाअगोदर मिळालेल्या ब्राँझच्या घंटेवर ‘प्रिन्सेस रॉयल १७९२ʼ हे नाव कोरलेले असले, तरी केवळ त्यामुळे बुडलेल्या जहाजाची ओळख पटत नव्हती. कारण ब्रिटिश बनावटीची ‘प्रिन्सेस रॉयलʼ या नावाची अनेक जहाजे असल्याचे माहीत होते. सन १७६३ ते १७९१ या काळात या नावाची पंधरा जहाजे बांधली होती. इतकेच नाही तर १७६८ मध्ये मुंबईच्या गोदीत ईस्ट इंडिया कंपनीसाठी याच नावाची एक नौका बांधण्यात आली होती; तथापि सन १७९२ मध्ये बांधलेल्या अशा जहाजाचा उल्लेख नव्हता. सफरीवर हरवलेल्या ब्रिटिश जहाजांच्या यादीमध्ये सन १७९२ ते १७९५ दरम्यानच्या एका ८०५ टन वजनाच्या ‘प्रिन्सेस रॉयलʼ (बांधणी १७८६, लंडन) जहाजाचा उल्लेख आढळल्यानंतर बहुधा बंगारमजवळ बुडालेले जहाज हेच असावे, असे लक्षात आले. सन १७९२ मध्ये या जहाजाचे नूतनीकरण करताना ब्राँझची घंटा बसवण्यात आली असावी व चीनकडे जात असताना हे जहाज १७९५-९६ या दरम्यान बुडाले असावे, असा निष्कर्ष आहे.

 

संदर्भ :

  • Tripathi, Alok, Marine Archaeology : Recent Advances, Agam Kala Prakashan, Delhi, 2005.
  • Tripati, Sila, ‘An Overview of Shipwreck Explorations in Indian Watersʼ, Shipwrecks around the World (Ed., Tripati, Sila), pp. 783-810, Delta Bookworld, Delhi, 2015.

                                                                                                                                                                                        समीक्षक : भास्कर देवतारे