गोव्यातील जहाजबुडीच्या घटनेचा पहिला अभिलेखीय उल्लेख अकराव्या शतकातील आहे. कदंब राजा पहिला जयकेशी याच्या इ. स. १०५२ मधील कोरीव लेखात पहिला गुहल्लदेव (इ. स. ९८० ते १००५) या राजाचे जहाज भरकटून फुटल्यावर त्याने जीव वाचण्यासाठी गोव्यात आश्रय घेतला होता. त्याचप्रमाणे आणखी एका कदंब राजाचे जहाज झुआरी नदीच्या मुखापाशी सेंट जोआव (Saint Juao) बेटाजवळ बुडले असल्याची माहिती आहे; परंतु या दोन्ही प्रसंगांचे आणखी तपशील उपलब्ध नाहीत.

सुंची रीफ (गोवा) येथील हिप्पोपोटॅमसचे दात.

गोव्यात यूरोपीय जहाजे बुडण्याच्या नोंदी यूरोपीय अभिलेखागारांमध्ये मिळत असल्याने तेथे काही प्रमाणात जहाजबुडीच्या पुरातत्त्वाला वाव आहे. भारत आणि पोर्तुगाल यांच्यात ये-जा करणारी जहाजे सर्वसाधारणपणे ४०० ते ५०० टन वजनाची असत. सुरुवातीला जहाजांचे नौस (Naus) आणि गॅलीस (Gales) असे दोन प्रकार होते; परंतु पंधराव्या शतकानंतर कारावेलास (Caravelas) या जहाजांच्या बांधणीत प्रगती झाली. इ. स. १६४८ मध्ये कलकत्त्याकडे (कोलकाता) निघालेली बारा पोर्तुगीज जहाजे भयंकर वादळामुळे अग्वाद बे या भागात बुडाली. १६५१ मध्ये पोर्तुगालहून आलेली दोन जहाजे गोव्यात वादळात सापडून फुटली. गोव्याहून चौल व वसईकडे निघालेले ’सांता टेरेझा डी जीझस’ हे गलबत वाळूच्या दांड्यावर आपटून बुडले. गोव्यात अशा प्रकारे अनेक जहाजे बुडल्याचे उल्लेख उपलब्ध आहेत.

गोव्यातील जहाजबुडीच्या पुरातत्त्वाची सुरुवात सुंची रीफ (Sunchi Reef) येथे पाण्यात बुडलेल्या जहाजांच्या सर्वेक्षणाने (१९८९) झाली असली, तरी या विषयात पद्धतशीर संशोधनाला गती १९९७ नंतर आली. गोव्यातील या उथळ भागात ३ ते ६ मी. खोलीवर मोठ्या क्षेत्रात जहाजांचे विखुरलेले अवशेष राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानामधील पुरातत्त्वज्ञांना आढळले. सुंची रीफ येथे सागरतळ सपाट नसून त्यात अनेक ठिकाणी जांभा दगडाचे उंचवटे (Shoals) आहेत. तीन मीटर जाडीचे हे सडे थेट दोना पावलांपर्यंत पसरलेले आहेत. सागरतळाच्या सर्वेक्षणात चार तोफा, बंदुकीची मूठ, हिप्पोपोटॅमसचे नऊ दात, ’आयसीएम’ अक्षरे कोरलेले हत्तीचे आठ सुळे, मर्तबान (Martaban ceramics) प्रकारची व निळी नक्षी असणारी चिनी मातीची भांडी, दोन लोखंडी नांगर आणि काचेच्या बाटल्यांचे तळ अशा वस्तू मिळाल्या. तप्तदीपन कालमापन पद्धतीने चिनी मातीच्या भांड्यांचा काळ इ. स. १५९० (अधिकउणे ४०) असा निश्चित झाला. या सर्व अवशेषांवरून तेथे पंधराव्या-सोळाव्या शतकात कोणतेतरी जहाज बुडले असावे; परंतु त्याचा शोध लागला नाही.

सेंट जॉर्जेस (गोवा) येथील जहाजबुडीचे अवशेष.

सेंट जॉर्जेस रीफ हा भाग मार्मागेावा बंदराच्या दक्षिणेस व ग्रांडे आयलंडच्या (Grande Island) पूर्वेस असून येथील सागरतळ घट्ट नाही. तेथे गाळाची मऊ माती भरलेली आहे. तसेच त्याला एका बाजूला उतार असल्याने पुरातत्त्वीय अवशेष निरनिराळ्या खोलीवर आढळले. या ठिकाणी मातीच्या विटा, जमिनीवर लावायच्या मातीच्या टाइल्स, कौले, लाकडी खांब, सांडपाण्याचा नळ (पाइप) आणि कोरिंथियन शैलीशी साम्य असणारी उत्तम प्रतीच्या मातीपासून बनवलेले स्तंभशीर्ष (Corinthian style capital) यांचा समावेश होता. टाइल्स, कौले वगैरे यांवर ’बसेल मिशन टाइल्स वर्क्स’ असा शिक्का आहे. साहित्यावर लाकडी खांब हे ’बेंटीक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लेगरस्ट्रेमिया मायक्रोकार्पा (Lagerstroemia microcarpa) या बांधकामासाठी उपयुक्त झाडाचे आहेत. स्वित्झर्लंडमधील बसेल मिशन या ख्रिश्चन मिशनरी संस्थेचे कालिकत अथवा मंगलोर येथून बांधकाम सामान घेऊन येणारे हे जहाज असावे व रेडिओकार्बन कालमापनानुसार ते सेंट जॉर्जेस रीफ येथे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बुडले असावे, असे दिसते.

एमी शोल्स (Amee Shoals) हा भाग सुंची रीफच्या दक्षिणेस आहे. या ठिकाणी सर्वेक्षणात सहा ते नऊ मी. खोलीवर मोठ्या क्षेत्रात विखरून पडलेले वाफेवर चालणाऱ्या एका जहाजाचे अवशेष मिळाले; तथापि त्या जहाजाची ओळख पटू शकली नाही. ग्रांडे आयलंडच्या जवळ असलेल्या सेल रॉक (Sail Rock) येथे १४ मी. खोलीवर अशाच एका वाफेवर चालणाऱ्या जहाजाचा फक्त पुढील भाग फुटलेल्या अवस्थेत आढळला आहे. तसेच  मोठा लोखंडी नांगर व लोखंडाचा ९.२ किग्रॅ. वजनाचा तोफगोळा सागरतळापाशी मिळाला. या जहाजाचे उत्खनन झालेले नाही. ग्रांडे आयलंड या ठिकाणी वाळूत गाडलेल्या अवस्थेत एका मालवाहू जहाजाचे अवशेष आहेत. तथापि ओळख पटवता येईल असे त्यात काहीच न आढळल्याने या जहाजाचा माग लागत नाही. बॉयलर व जहाजांची यंत्रसामग्री यावरून एमी शोल्स व सेल रॉक येथील बुडलेल्या जहाजांचे अवशेष हे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीसचे असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संदर्भ :

  • Gudigar, P. & Sundaresh, ‘Some important shipwrecks on Goa Coastʼ, Journal of Marine Archaeology, 3: 48-53, 1992.
  • Tripati, Sila;  Gaur, A. S. & Sundaresh, Maritime Archaeology and Shipwrecks off Goa, Kaveri Books, New Delhi, 2014.
  • Tripati, Sila; Gaur, A. S.; Sundaresh & Vora, K. H. ‘Shipwreck archaeology of Goa: Evidence of maritime contacts with other countriesʼ, Current Science, 86(9) : 1238-1245, 2004.
  • छायाचित्रे सौजन्य : डॉ. शिल त्रिपती, गोवा.

                                                                                                                                                                                      समीक्षक : भास्कर देवतारे