ज्येष्ठा नक्षत्र : नक्षत्र चक्रातील ज्येष्ठा हे 18 वे नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्राच्या खाली वृश्चिक राशीच्या विंचवाच्या धडामध्ये असलेले 3 तारे हे ज्येष्ठा नक्षत्राचे तारे आहेत. हे तीनही तारे एका वक्र रेषेत दिसतात. मृगाच्या पोटातील त्रिकांड बाणासारखेच हे तीन तारेही पटकन डोळ्यात भरणारे आहेत. या तीन ताऱ्यातला मधला तारा म्हणजे ज्येष्ठा (Antares; Alpha Scorpii) हा एक लाल महाराक्षसी तारा आहे. तो इतका लाल दिसतो, की पाश्चात्य लोकांमध्ये त्याला ‘Rival of Ares’, किंवा ‘Opponent to Mars’ म्हणजे मंगळाशी स्पर्धा करू शकेल इतका लाल असणारा तारा असे म्हणतात. हाच तारा ज्येष्ठा नक्षत्राचा योग तारा आहे. त्याच्या दोन बाजूचे तारे आहेत उत्तरेचा ‘सिग्मा स्कॉर्पि’ (Sigma Scorpii) आणि दक्षिणेचा ‘टाउ स्कॉर्पि’ (Tau Scorpii). पूर्वी सिग्मा स्कॉर्पि आणि टाउ स्कॉर्पि या दोन्ही ताऱ्यांना ‘अल्नियत’ म्हणजे अरेबिकमध्ये ‘रक्तवाहिन्या’ असे ओळखले जात होते, कारण ज्येष्ठा तारा हा वृश्चिकाचे हृदय मानला जायचा. दोन तारे एकाच नावाने असू नयेत या विचारातून टाउ स्कॉर्पि या ताऱ्याला ‘पैकौहल’ (Paikauhale) असे हवाई भाषेतले ‘घरांना भेट देत हिंडणारा भटक्या’ या अर्थाचे नाव नुकतेच १० ऑगस्ट २०१८ ला आयएयू च्या (WGSN : Working Group for Star Names) या ताऱ्यांची नावे ठरवणाऱ्या समितीने जाहीर केले आहे, त्याचवेळी सिग्मा ताऱ्यालाही ‘अल्नियत’ हेच नाव आता अधिकृतरित्या मिळालेले आहे.
ज्येष्ठा तारा साध्या डोळ्यांना दिसणाऱ्या ताऱ्यांमधील एक प्रचंड मोठ्या आकाराचा तारा आहे. समजा जर हा तारा आपल्या सूर्याच्या जागी ठेवला तर त्याचा पृष्ठभाग मंगळ आणि गुरुच्या मधल्या कक्षेपर्यंत पोहोचेल. त्याचे वस्तुमान सूर्याच्या 12 पट आहे, तर दृश्यप्रत 0.6 ते -1.6 आहे. वर्णपटीय वर्गीकरणात ज्येष्ठा तारा M1.5 lab–Ib या लाल महाकाय ताऱ्यांच्या प्रकारात मोडतो. साध्या डोळ्यांना जरी हा तारा एक दिसत असला, तरी त्याला एक साथीदार आहे. त्यामुळे हा एक द्वैती आणि रूपविकारी तारा आहे. आपल्यापासून हा तारा सुमारे 550 प्रकाशवर्षे दूर आहे.
ज्येष्ठा नक्षत्राजवळ जेव्हा पौर्णिमेचा चंद्र असतो, त्या चांद्रमासाला, भारतीय पारंपरिक कालगणनेत ‘ज्येष्ठ महिना’ असे नाव दिले गेले आहे.
समीक्षक : आनंद घैसास