नक्षत्र : सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हणण्याची रूढी होती. परंतु, आकाशातील अशा ८८ मांडण्यांना आता जागतिक स्तरावर ‘तारकासमूह’ (Constellations) म्हणून ओळखले जाते. सूर्याच्या आकाशातील वार्षिक भासमान मार्गावरील, म्हणजे आयनिकवृत्तावरील (ecliptic ) १२ तारकासमूहांना ‘राशी’ (Zodiacal constellations) असे ओळखले जाते. पण राशी ही संकल्पना भारतीय नाही. ती मूळ खाल्डियन, बॅबिलोनियन संस्कृतीतून आलेली आहे. नक्षत्र ही संकल्पना मात्र प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्रातून आलेली आहे. ती चंद्राच्या आकाशातील मासिक चलनावरून योजलेली आहे. चंद्र पृथ्वीभोवती २७.३ दिवसात एक फेरी मारतो. त्यामुळे रोज तो आकाशात वेगवेगळ्या ताऱ्यांच्या मांडणीसमोरून जाताना दिसतो. हेच आयनिकवृत्ताचे २७ भाग चंद्राची घरे किंवा नक्षत्र म्हणून कल्पिलेले आहेत. आयनिकवृत्ताच्या महावर्तुळाचे ३६० अंश ÷ २७ = १३.३ अंश, अर्थात एक नक्षत्र = १३.३ अंश. चंद्र ज्या ताऱ्यांच्या मांडणीसमोरून पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करत जातो, त्या ताऱ्यांच्या मांडणीला किंवा त्याच्या आसपासच्या एखाद्या ठळक ताऱ्यालाही नक्षत्र असे म्हणण्याची पद्धत आहे. अशा वेळी त्या ताऱ्याला त्या नक्षत्राचा ‘योग तारा’ असे म्हटले जाते.
एकूण २७ नक्षत्रे : १. अश्विनी, २. भरणी ३. कृत्रिका ४. रोहिणी ५. मृग ६. आर्द्रा ७. पुनर्वसू ८. पुष्य ९. आश्लेषा १०. मघा ११. पूर्वा फाल्गुनी १२. उत्तरा फाल्गुनी १३. हस्त १४. चित्रा १५. स्वाती १६. विशाखा १७. अनुराधा १८. ज्येष्ठा १९. मूळ २०. पूर्वाषाढा २१. उत्तराषाढा २२. श्रवण २३. धनिष्ठा २४. शततारका २५. पूर्वा भाद्रपदा २६. उत्तरा भाद्रपदा आणि २७. रेवती. ही सगळी नक्षत्रे चंद्राच्या आकाशातील मार्गावरच अचूकपणे येतात असे नाही. काही नक्षत्रे या मार्गापासून प्रत्यक्षात बरीच दूर आहेत. उदाहरणार्थ हस्त, स्वाती, श्रवण, धनिष्ठा. तसेच प्राचीन ज्योतिषशास्त्रानुसार अभिजित (Vega) ताऱ्यालाही अठ्ठाविसावे नक्षत्र समजत असत.
चंद्राचे पृथ्वीभोवती फिरण्याचे कक्षाप्रतल आयनिकवृत्ताला सुमारे ५ अंशांनी तिरपे आहे. त्यामुळे चंद्राची कक्षा आयनिकवृत्ताला सुमारे ५ अंशांमध्ये छेदते. अर्थात चंद्र त्याच्या एका परिभ्रमणात (एका महिन्याच्या कालावधीत) अर्धा वेळ आयनिकवृत्ताच्या उत्तर दिशेला तर अर्धा वेळ दक्षिण दिशेला असतो. त्यामुळे चंद्राच्या आकाशमार्गाचा, म्हणजेच आयनिकवृत्ताच्या उत्तरेस ५ अंश आणि दक्षिणेस ५ अंशाच्या क्षेत्राचा, एकूण १० अंशाच्या क्षेत्राचा एक पट्टा तयार होतो. चंद्र साधारणत: दर दिवशी एका नक्षत्रातून प्रवास करतो. प्रत्येक नक्षत्र १३ अंश २० मिनिटांचे (१ अंश कोनाचा साठावा भाग म्हणजे १ मिनिट, याला कोनीय मिनिट असेही म्हणतात) असते. एका नक्षत्राचे अजून ४ भाग पाडून त्याला ‘पाद’ किंवा ‘चरण’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे नक्षत्राचा एक चरण म्हणजे ३ अंश आणि २० मिनिटे होतात. आयनिकवृत्तावरील १२ राशी (३६०÷ १२=३०) या हिशेबाने प्रत्येक राशी ३० अंशाची होते. त्यामुळे एका राशीत सुमारे सव्वा दोन नक्षत्रे येतात. अर्थात एका राशीत सुमारे ९ चरण येतात. बारा राशी आणि २७ नक्षत्रे (एकूण १०८ चरण) यांचा एक तक्ता खालील प्रमाणे तयार होतो.
राशी | पाश्चात्य नाव | नक्षत्रे आणि चरण |
मेष | एरिस (Aries) | अश्विनी ४, भरणी ४, कृत्तिका १ |
वृषभ | टॉरस (Taurus) | कृत्तिका ३, रोहिणी ४, मृग २ |
मिथुन | जेमिनी (Gemini) | मृग २, आर्द्रा ४, पुनर्वसू ३ |
कर्क | कॅन्सर (Cancer) | पुनर्वसू १, पुष्य ४, आश्लेषा ४ |
सिंह | लिओ (Leo) | मघा ४, पूर्वा फाल्गुनी ४, उत्तरा फाल्गुनी १ |
कन्या | व्हर्गो (Virgo) | उत्तरा फाल्गुनी ३, हस्त ४, चित्रा २ |
तूळ | लिब्रा (Libra) | चित्रा २, स्वाती ४, विशाखा ३ |
वृश्चिक | स्कॉर्पिअस (Scorpius) | विशाखा १, अनुराधा ४, ज्येष्ठा ४ |
धनु | सॅगिटेरीअस (Sagittarius) | मूळ ४, पूर्वाषाढा ४, उत्तराषाढा १ |
मकर | कॅप्रीकॉर्नस (Capricornus) | उत्तराषाढा ३, श्रवण ४, धनिष्ठा २ |
कुंभ | ॲक्वेरिअस (Aquarius) | धनिष्ठा २, शततारका ४, पूर्वा भाद्रपदा ३ |
मीन | पायसेस (Pisces) | पूर्वा भाद्रपदा १, उत्तरा भाद्रपदा ४, रेवती ४ |
वैषुविकवृत्ताशी आयनिकवृत्त हे २३.५ अंशाच्या कोनात तिरपे जाते. ही दोन महावर्तुळे एकमेकांना दोन बिंदूत छेदतात, त्या छेदनबिंदूंना ‘संपात बिंदू’ म्हणतात. सूर्य आयनिकवृत्तावरून जाताना २० किंवा २१ मार्च रोजी ज्या छेदनबिंदूशी येतो, त्याला वसंत संपात बिंदू (Vernal Equinox; व्हर्नल इक्विनॉक्स) म्हणतात. तर दुसऱ्या छेदनबिंदूवर सूर्य २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी येतो. त्याला शरद संपात बिंदू (Autumnal Equinox; ऑटमनल इक्विनॉक्स) म्हणतात. मात्र संपात दिनी सूर्य सतत एकाच नक्षत्रात येत नाही. याला कारण संपात बिंदू हळू हळू पश्चिमेकडे सरकत असतो. संपात बिंदूच्या या चलनाला पृथ्वीची परांचन गती कारणीभूत असते. या परांचन गतीमुळे संपात बिंदू एकेका नक्षत्रातून मागे (पश्चिमेकडे) सरकत जातो. मेष राशीतील अश्विनी हा योग तारा एकेकाळी (इ.स. पूर्व ११३ च्या सुमारास) वसंत संपाताजवळ होता. त्यावरून त्याला ‘मेषातील प्रारंभबिंदू’ (First point in Aries) असा शब्दप्रयोग रूढ झाला. आज वसंत संपात बिंदू मीन राशीतील उत्तरा भाद्रपदा या नक्षत्राजवळ सरकला आहे. परंतु तरीही मेषेलाच प्रथम रास आणि अश्विनीला पहिले नक्षत्र असे अजून म्हटले जाते. आता हे ‘आरंभस्थान’ आकाशातील प्रत्यक्ष स्थितीनुसार बदलायला हवे. तसा प्रयत्न कालगणनेबाबत आपण ‘भारतीय राष्ट्रीय सौर कॅलेंडर’ द्वारे केलेलाही आहे. ज्यामध्ये भारतीय सौर १ हा वर्षारंभ रूढ अश्विनीत न होता, वसंत संपात बिंदूशी केला गेला आहे. ही ‘राष्ट्रीय दिनदर्शिका’ शासनमान्य आहे. यात दर्शविलेले दिनांक शासकीय स्तरावर सर्वत्र वापरलेही जातात. (आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रातून हे दररोज सांगितलेही जातात.) परंतु, आपण सामान्य जनांनी ती कालगणना पद्धत अजून रोजच्या वापरात आणलेली नाही, ही खंत आहे.
समीक्षक : आनंद घैसास.