पुनर्वसु नक्षत्र : नक्षत्र चक्रातील पुनर्वसु हे सातवे नक्षत्र आहे. आर्द्रा आणि पुनर्वसु या दोन नक्षत्रांचा मिथुन राशीत अंतर्भाव होतो. मिथुन राशीतील दोन ठळक तारे म्हणजे कॅस्टर (कक्ष) आणि पोलक्स (प्लक्ष). यांनाच पुनर्वसु म्हणतात. कॅस्टर हा तारा हिरवट पांढऱ्या रंगाचा असून पोलक्स तारा नारिंगी रंगाचा आहे. मिथुन राशीच्या पश्चिमेला वृषभ तर पूर्वेला कर्क राशी दिसते. मिथुन च्या उत्तरेला सारथी आणि गवय हे तारकासमूह दिसतात, तर दक्षिणेला शृंगाश्व आणि लघुलुब्धक म्हणजे कॅनिस मायनर हे तारकासमूह दिसतात. पुनर्वसुचा योगतारा पोलक्स (प्लक्ष) आहे. पोलॅक्स हा नारिंगी रंगाचा राक्षसी तारा आहे. पृथ्वी पासून तो ३४ प्रकाशवर्षे दूर आहे. त्याची दृश्यप्रत +१.१४ आहे. पोलक्स भोवती फिरणाऱ्या एका परग्रहाचा शोध लागला आहे.
इजिप्त देशातील प्राचीन वाङ्मयात कॅस्टर आणि पोलक्स यांच्या बद्दलची एक मिथक-कथा आहे. तसेच ग्रीक वाङ्मयात हे दोघे स्पार्टाची राणी लेडा हिचे पुत्र आणि प्रसिद्ध हेलेन हिचे भाऊ असून त्यांच्या संबंधीची दंतकथा प्रसिद्ध आहे. भारतीय प्राचीन वाङ्मयात असुरांच्या चयनात मांडलेली चित्रा नावाची विट काढून घेऊन इंद्र आकाशात पळाला आणि त्याच्या मागे जे दोन असुर लागले, तेच पुनर्वसू अशी एक कथा आहे. तैत्तिरीय ब्राह्मणात विश्वाची पालनकर्ती अदिती आणि पुनर्वसूच्या जुळ्यांची कथा येते. पुनर्वसु शब्दाचा अर्थ ‘जे पुन्हा संपत्ती देतात ते’ असा होतो.
समीक्षक : आनंद घैसास