आर्द्रा नक्षत्र :

आर्द्रा हे नक्षत्र चक्रातील सहावे नक्षत्र आहे. आर्द्रा आणि पुनर्वसू या दोन नक्षत्रांचा मिथुन (Gemini) राशीत अंतर्भाव होतो. आर्द्रा नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला म्हणजे पावसाळा सुरू व्हायला हवा अशी एकेकाळी समजूत होती, म्हणजे साधारण इ.स. 600 च्या सुमारास.  परंतु हल्ली पावसाळा मृगशीर्ष (A part of Orion Constellation) नक्षत्रावर सुरू होतो. संपात चलनाच्या नियमानुसार वसंत संपात स्थान सरकलेले असल्याने हा बदल झाला आहे.

मृग नक्षत्राच्या उत्तरपूर्वेला मिथुन राशीचा तारकासमूह आहे.  मिथुन राशीतील अल्हेना (Alhena; Gamma Geminorum) हा तारा म्हणजेच आर्द्रा नक्षत्र.  मिथुन राशीच्या काल्पनिक चित्रातील जुळ्या भावांचे पाय आकाशगंगेच्या काठाशी दाखवतात. जणू काही ते दोघे आकाशगंगेत पाय बुडवून मजेत बसले आहेत. त्या जुळ्यांची मस्तके उत्तरपूर्वेला गवय (Lynx Constellation) तारकासमूहाजवळ दिसतात.  ग्रीक पुराणात ते जुळे म्हणजे कक्ष (Castor; Alpha Geminorum) आणि प्लक्ष (Pollux; Beta Geminorum) नावाचे जुळे भाऊ. त्यातील प्लक्षचा उजवा पाय म्हणजे अल्हेना हा तारा, म्हणजेच भारतीय आर्द्रा नक्षत्र. परंतु कित्येकदा दोघांचेही पाय मिळून होणारा परिसर हा आर्द्रा नक्षत्र म्हणून दाखवला जातो.

आर्द्रा किंवा अल्हेना हा ताऱ्यांच्या वर्गीकरणातील A या गटातला, निळ्या पांढऱ्या रंगाचा तारा असून, त्याची दृश्यप्रत 1.9 आहे. तो आपल्या पासून सुमारे 109 प्रकाशवर्षे दूर आहे. हा तारा वर्णपटीय द्वैती (Spectroscopic Binary) तारा असून त्यातले दोन तारे एकमेकांभोवती सुमारे 12.6 वर्षात एक फेरी मारतात असे दिसून आले आहे.

समीक्षक : आनंद घैसास