स्विजिक, योव्हान (Cvijic, Jovan) : (१२ ऑक्टोबर १८६५ – १६ जानेवारी १९२७). सर्बियन भूगोलज्ञ, भूवैज्ञानिक आणि मानवजातिविज्ञान तज्ज्ञ. त्यांचा जन्म लोझनिका (सर्बीया) शहरात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर लोझनिका येथे दोन वर्षे व्याकरण शाळेमध्ये शिक्षण, फर्स्ट बेलग्रेड जिम्नॅशियमच्या निसर्गविज्ञान आणि गणित विभागातून पदवी (१८८४), ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठामध्ये प्राकृतिक भूगोल व भूविज्ञान विषयांचा अभ्यास आणि त्यानंतर व्हिएन्ना विद्यापीठातूनच विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी (१८९३) असा स्विजिक यांचा शैक्षणिक प्रवास होता. पूर्व सर्बियातील कुकॅज पर्वताची संरचना आणि प्रेकोनोस्का गुहा हा त्यांचा पीएच. डी.चा विषय होता. त्यांना भूविज्ञान व भू-आकृतिविज्ञानाविषयी विशेष आवड होती. त्यांनी इंग्रजी, जर्मन व फ्रेंच भाषांचे ज्ञान अवगत केले होते. त्यांनी आपले संशोधनकार्य या तीन भाषांतूनही प्रकाशित केले आहे.
स्विजिक हे मार्च १८९३ मध्ये व्हिएन्नावरून परतल्यानंतर बेलग्रेड येथील वेलिका स्कोला या शैक्षणिक संस्थेतील तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे भूगोल, प्राकृतिक भूगोल आणि मानवजातिवर्णन या विषयांचे ते अध्यापन करीत होते. इ. स. १९०५ मध्ये वेलिका स्कोला या संस्थेचे बेलग्रेड विद्यापीठात रूपांतर झाले. या विद्यापीठातील ते नामवंत प्राध्यापक होते. या विद्यापीठात मानवजातिवर्णन, वैद्यक, कृषी, धर्मशास्त्र हे विभाग सुरू करण्यात, तसेच स्कॉप्ये येथे तत्त्वज्ञान आणि सूबतीत्सा येथे विधीशाळा अशा नवीन पाच विद्याशाखा निर्माण करण्यामध्ये स्विजिक यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. इ. स. १८९४ मध्ये त्यांनी बेलग्रेड भूगोल या संस्थेची स्थापना केली. बाल्कन द्वीपकल्पातील भूदृश्ये आणि लोकसंख्या यांबरोबरच त्या प्रदेशातील कार्स्ट भूमिस्वरूपे आणि चतुर्थक हिमयुगातील भू-आकृतिविज्ञान आणि भूविज्ञान हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. चुनखडीतील कार्स्ट भूमिस्वरूपे याविषयीची त्यांची प्रबंधिका यूरोपीय वैज्ञानिक जगतात खूपच प्रसिद्धीस आली होती. स्विजिक यांना सर्बियातील भू-आकृतिविज्ञानाचे जनक मानले जाते. सर्बियन आणि यूगोस्लाव्ह मानवजातिविज्ञान अभ्यासामधील स्विजिक ही महत्त्वाची व्यक्ती होती. भूगोलज्ञ आणि जीववैज्ञानिक गटांच्या सहकार्याने स्विजिक यांनी बेलग्रेड येथे ‘सर्बियन जिऑग्राफिक सोसायटी’ची स्थापना केली (१९१०). त्या संस्थेचे ते अध्यक्ष होते. इ. स. १९१२ मध्ये त्यांनी सर्बियन जिऑग्राफिक सोसायटी हेरल्ड हे नियतकालिक सुरू केले. तसेच इ. स. १९२३ मध्ये ‘फॅकल्टी ऑफ फिलॉसॉफीज जिऑग्राफिकल इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. बाल्कनमधील ही अशा प्रकारची पहिलीच संघटना होती. विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी साप्ताहिक चर्चासत्रे सुरू केली होती. त्यासाठी बेलग्रेडमधील ग्रामर स्कूलमधील शिक्षकही सहभागी होत असत. इ. स. १९२१ पासून सर्बियन अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि आर्ट्सचे ते अध्यक्ष होते. आपल्या बाल्कन द्वीपकल्प १९१८, जिऑमॉर्फॉलॉजीचे दोन खंड या व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांनी बाल्कन द्वीपकल्पावरील संशोधनकार्य, तेथील मानव-भौगोलिक सर्वेक्षण, लोकांचे व्यक्तिगत मानवजातिवैज्ञानिक वर्गीकरण, त्यांच्या वर्तनातील तफावती इत्यादींचे वर्णन सारांशित केलेले आहे.
स्विजिक यांनी आपल्या मानव-भौगोलिक व इतर सर्वेक्षणात आणि संशोधनात हवामान आणि भौगोलिक परिस्थितीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, मानवी वसाहतींचे थर, वस्त्यांचे वर्गीकरण आणि संरचना, खेडी आणि नगरांमधील निवासक्षेत्रे, घरांचे प्रकार, लोकविद्या, पेहराव, संस्कृती, द्वीपकल्पाचे ऐतिहासिक आणि मानवजातिवैज्ञानिक प्रदेश, भौगोलिक, ऐतिहसिक घटकांचा प्रभाव, द्वितीयक मानवी स्थलांतर, अशा स्थलांतरांचा संस्कृतीवर होणारा परिणाम, लोकसंख्येच्या मानसशास्त्रीय प्रकारांचे वर्गीकरण, चुनखडीच्या प्रदेशातील कार्स्ट भूमिस्वरूपे, बाल्कन पर्वतातील मिडझॉर शिखर आणि रीला पर्वतरांग यांचा अभ्यास, त्या पर्वतीय प्रदेशात हिमानी क्रीयेतून निर्माण झालेली १०२ सरोवरे अशा अनेक विषयांमध्ये संशोधन केले. आपल्या ३८ वर्षांच्या संशोधन काळात त्यांनी बाल्कन प्रदेश, दक्षिण कार्पेथियन पर्वत आणि अॅनातोलिया प्रदेशातून अनेक संशोधन मोहिमा करून त्यांचे वृत्तांत लेखस्वरूपात तयार केले.
स्विजिक यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भूगोलज्ञ आणि भूशास्त्रज्ञ म्हणून केली. नंतर मानवी भूगोलज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ म्हणूनही त्यांनी कारकीर्द सुरू ठेवली. आपल्या आयुष्यात एक विद्यार्थी आणि प्राध्यापक म्हणून बाल्कन प्रदेशातून त्यांनी खूप प्रवास केला. त्या वेळी त्यांना लोकविद्या, संस्कृती आणि मानवजातिवर्णन या विषयांत आवड निर्माण झाली. शैक्षणिक, भौगोलिक आणि निसर्गविज्ञान यांसारख्या जवळजवळ ३० विज्ञानविषयक संस्थांशी ते निगडित होते.
स्विजिक यांच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी वेगवेगळ्या नामवंत संस्थांनी त्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव केला. उदा., न्यूयॉर्क जिऑग्राफिकल सोसायटीचे सुवर्णपदक (१९२४), जिऑग्राफिकल सोसायटी ऑफ पॅरिसचा पुरस्कार (१९१७), चार्ल्स विद्यापीठ, प्रागचा पुरस्कार (१९१८), रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीकडून पॅट्रन्स सुवर्णपदक (१९२०), अमेरिकन जिऑग्राफिकल सोसायटीचे कुलुम जिऑग्राफिकल मेडल (१९२४), पॅरिस-सॉरबॉन विद्यापीठाचे पदक (१९२४), तसेच इंग्लंड व फ्रान्स यांच्याकडून पदके मिळालेली आहेत. स्विजिक यांचे बेलग्रेड येथे निधन झाले.
भूगोलाचे विज्ञान या विषयाच्या प्रगत अभ्यासासाठी इ. स. १९४७ मध्ये ‘सर्बियन अकॅडमी ऑफ सायन्सेस अॅन्ड आर्ट्स’ या संस्थेने बेलग्रेडमध्ये ‘योव्हान स्विजिक जिऑग्राफिकल इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. स्विजिक यांचे बेलग्रेडमध्ये इ. स. १९०५ मध्ये बांधण्यात आलेले घर शासनाने १९९६ मध्ये ‘सांस्कृतिक स्मारक’ म्हणून घोषित केले. त्यातील वस्तुसंग्रहालयात हस्तलिखिते, पत्रे, टिपणी, पुस्तके, चित्रे, भौगोलिक रेखातक्ते (चार्ट), नकाशासंग्रह आणि स्विजिक यांच्या वैयक्तिक वस्तू जतन करून ठेवल्या असून तेथे प्रासंगिक व्याख्यानांचेही दर्शन घडविले जाते. सर्बियातील अनेक विद्यालयांना आणि रस्त्यांना स्विजिक यांचे नाव देण्यात आलेले आहे. स्विजिक यांचे कार्य त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी तसेच चालू ठेवले आहे.
समीक्षक : वसंत चौधरी