कर्वे, इरावती दिनकर : (१५ डिसेंबर १९०५–११ ऑगस्ट १९७०). विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लेखिका. मानवशास्त्राबरोबरच त्यांनी पुरातत्त्वविद्या आणि इतर सामाजिक शास्त्रांमध्ये उल्लेखनीय संशोधनकार्य केले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्नुषा व फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर धोंडो कर्वे यांच्या त्या पत्नी होत. इरावती कर्वे यांचा जन्म ब्रह्मदेशातील (आताचा म्यानमार)इरावती नदीच्या काठी वसलेल्या मिंगयानमध्ये (म्यिंज्यान) एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहान वयातच त्या शिक्षणासाठी पुण्यात आल्या. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना विख्यात गणिती व तेव्हाचे प्राचार्य रँग्लर परांजपे यांच्यामुळे त्या प्रभावित झाल्या. त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदवी संपादन केली (१९२६). पुढे त्यांना प्रतिष्ठित असलेली मुंबई विद्यापीठाची दक्षिणा शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी प्रा. घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक ‘द चितपावन ब्राह्मिन्स – ॲन एथ्निक स्टडीʼ असे होते. त्यानंतर त्यांनी जर्मनीतील कैसर विल्यम इन्स्टिट्यूटमध्ये मानवशास्त्रात डॉक्टरेटची पदवी मिळवली. ‘द नॉर्मल आसिमेट्री ऑफ ह्यूमन स्कलʼ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांना तेथे त्या काळात गाजलेल्या सुप्रजननशास्त्र (Eugenics) विषयाचे प्रा. युजेन फिशर यांचे मार्गदर्शन लाभले.

इरावती कर्वे यांनी काही वर्षे मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून काम पाहिले. नंतर पुणे येथे डेक्कन कॉलेजमध्ये इतिहासविषयाच्या प्रपाठक या पदावर त्या रुजू झाल्या. त्यांना प्राध्यापकपदावर बढती मिळाली (१९४९). डेक्कन कॉलेजमध्ये इरावती कर्वे व ह. धी. सांकलिया यांनी पुरातत्त्वविद्येमधील आजच्या मानवशास्त्रीय संशोधनाचा पाया घातला व प्रारंभापासूनच हे संशोधन जागतिक पातळीच्या दर्जाचे व्हावे म्हणून प्रयत्न केले.

इरावती कर्वे व सांकलिया यांनी गुजरातमधील लांघणज या मध्याश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले (१९४९). या ठिकाणी मानवी अवशेषही मिळाले असल्याने हे संशोधन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया (१९५३) या ग्रंथात त्यांनी भारतीय समाजरचनेच्या संदर्भात अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दल स्पष्ट आणि नेमकी मांडणी केली. वांशिक व भाषिक गटांच्या दरम्यानचे फरक त्यांच्या बाह्य शरीररचनेच्या व आनुवंशिक संरचनेच्या आधारे अभ्यासता येतील का, हा त्यांच्या संशोधनाचा मूळ गाभा होता. त्याला अनुसरून कर्वे यांनी हिंदू सोसायटी :ॲन इंटरप्रिटेशन (१९६१) या आपल्या ग्रंथात महाराष्ट्रातील समाजरचनेचे प्रारूप एका आकृतीत दिले आहे. याशिवाय लॅन्ड अँड पीपल ऑफ महाराष्ट्र हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ. कर्वे यांच्या वंश या संदर्भातल्या सर्व संकल्पना सध्या जरी मान्य होण्याजोग्या नसल्या, तरी त्या काळात त्यांनी केलेले संशोधन आजही महत्त्वपूर्ण आहे.

आज ज्ञानाचे स्वरूप विविधांगी झालेले आहे. मानवी जीवनाच्या अभ्यासासाठी पुरातत्त्व व मानवशास्त्र या सामाजिक शास्त्रांप्रमाणेच गणित, संख्याशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्रांच्या अनेक शाखा एकत्र येत आहेत. ही गरज इरावती कर्वे यांनी अर्धशतकापूर्वीच ओळखली होती. समाजशास्त्रात मूलभूत बदल घडवणाऱ्या स्त्रीवाद व उत्तर-आधुनिकतावाद या संकल्पना त्यांच्या मानवशास्त्रावरील संशोधनपर आणि ललित लेखनांत जाणवतात. प्राचीन भारतीय समाजजीवनाच्या अभ्यासासाठी कर्वे यांनी निवडलेला प्राचीन भारतीय साहित्याच्या विश्लेषणाचा मार्ग तेव्हा सर्वस्वी नवीन होता. कारण कोणत्याही संस्कृतीचा अभ्यास तिचा इतिहास जाणून घेतल्याखेरीज करता येणार नाही व कोणत्याही समाजाची रचना परंपरा समजून घेतल्या नाहीत तर कळणार नाही, ही त्यांची सैद्धांतिक भूमिका अतिशय महत्त्वाची होती.

मानवांमधील सांस्कृतिक-जैविक विविधतेचा अभ्यास करण्यासाठी संख्याशास्त्रातील ‘मल्टी-व्हेरीएट’ पद्धतींचा वापर करण्यात इरावती कर्वे अग्रणी होत्या. मानवांमधील जैविक विविधतेचा अभ्यास करताना कोणते एकक वापरावे, याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. या संदर्भात कर्वे यांनी जातीची व सामाजिक एककाची केलेली व्याख्या आजही समर्पक आहे. विविध जाती-भाषासमूहांच्या संख्याशास्त्रीय अभ्यासाचा त्यांचा हेतू वंशावर आधारित वर्गीकरण करणे हा नसून, जातींच्या उगमाची निरनिराळी गृहीतके तपासणे हा होता. म्हणूनच एक समाजशास्त्रज्ञ असूनही प्रसंगी सहकाऱ्यांची कडवट टीका स्वीकारून त्यांनी समाजशास्त्रात जीवशास्त्रामधल्या आनुवंशिकतेच्या अभ्यासाचा आग्रह धरला होता.

त्यांच्या युगांत (१९६७) व इतर लेखनातून त्यांनी  वर्णव्यवस्था, जातिसंस्थेचा उगम आणि प्राचीन काळापासून भारतीय समाजात असलेले स्त्रीचे स्थान यांबद्दलचे मूलभूत विचार मांडले. भारतीय समाजाची आजची रचना अशी का आहे, हा कर्वे यांच्या सर्व संशोधनाचा गाभा होता. त्या स्वतःला स्त्रीवादी म्हणत नव्हत्या; पण स्त्री-अभ्यास हे एक स्वतंत्र ज्ञानक्षेत्र म्हणून उदयास येण्याअगोदरच्या काळात कर्वे यांच्या संशोधनातून निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीत व त्यावर आधारित लेखनात स्त्रीवादी भूमिका आढळते. त्या केवळ प्राचीन नव्हे, तर तत्कालीन सामाजिक प्रश्नांचाही विचार करत असत, हे त्यांच्या लेखनातून स्पष्ट जाणवते. कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांवरील त्यांच्या लेखात त्यांच्यामधील सामाजिक संवेदनशीलतेचा पैलू दिसतो.

इरावती कर्वे यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांनी दिल्ली येथील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मानवशास्त्र विभागाचे अध्यक्षपद भूषवले (१९४७). तसेच त्यांनी  लंडन विद्यापीठ आणि बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ येथे विशेष व्याख्याने दिली (१९५५; १९५९-६०). त्यांच्या महाभारतावरील युगांत या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला (१९६८).

पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Sundar, Nandini, ‘In the Cause of Anthropology:The Life and Work of Irawati Karve – Anthropology in the East:The founders of Indian Sociology and Anthropologyʼ (Uberoi,Patricia; Sundar, Nandini & Deshpande, Satish), pp. 267-381, New Delhi, 2007.
  • Walimbe, S. R.; Joglekar, P. P. & Basa, Kishor K. Eds. Anthropology for Archaeology, Proceedings of the Professor Irawati Karve Birth Centenary Seminar, Deccan College, Pune, 2007.

समीक्षक – शरद राजगुरू