क्रिया हाच योग किंवा मोक्षप्राप्तीचा उपाय म्हणजे क्रियायोग. जेव्हा क्रिया किंवा कर्म हे स्वत:च योगसाधना आहे अशा भावनेने केले जाते, तेव्हा त्या योगाभ्यासाला क्रियायोग असे म्हणतात. दैनंदिन व्यवहारामध्ये आसन, प्राणायाम आदि विशिष्ट योगसाधना जरी केली गेली नाही तरी जे काही कर्म केले जाते ते तप, स्वाध्याय (अध्यात्मविद्येचे अध्ययन) आणि ईश्वरप्रणिधान (ईश्वरभक्ती) यांच्या साहाय्याने केले गेले तर त्याला क्रियायोग असे म्हणतात. देवप्रतिमा निर्माण करणे, देवाची आराधना करणे इत्यादी क्रियांना अग्निपुराणात क्रियायोग म्हटले आहे. हा एक धर्म असून तो धर्म आचरणारा साक्षात नारायणस्वरूप होता, असे वैष्णवांचे मत आहे. ज्यांचे चित्त सहजपणे एकाग्र होऊ शकत नाही अशा व्युत्थित चित्त असणाऱ्या साधकांसाठी महर्षी पतंजलींनी साधनपादात क्रियायोग वर्णिला आहे. एकाग्र होऊ शकत नसणाऱ्यांचे चित्त अविद्यादि क्लेशांनी युक्त असल्याने त्यात राजस व तामस वृत्ती उत्पन्न होत असतात; त्यामुळे उत्तम योग्यांसाठी वर्णिलेली अभ्यास आणि वैराग्य ही साधने मध्यम अधिकारींसाठी उपयुक्त ठरत नाहीत. त्यांना चित्ताच्या शुद्धीसाठी क्रियायोगापासून आरंभ करणे उपयुक्त ठरते.

क्रियायोग हा शारीरिक, मानसिक आणि वाचिक असा तीन प्रकारचा आहे. यांपैकी तप हा शारीरिक, स्वाध्याय हा वाचिक आणि ईश्वरप्रणिधान हा मानसिक आहे असे विवेचन आचार्य हिरहरानन्द आरण्यक यांनी केले आहे. परंतु, अन्य आचार्यांच्या मते तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे तीनही शारीरिक, वाचिक आणि मानसिक क्रियायोगाशी संबंधित आहेत.

(१) तप : युक्ताहाराला (योग्य आहार) तप म्हणतात. तपाचा अर्थ शरीर व इंद्रियांना क्षीण करणे असा नाही, कारण त्यामुळे शरीरात धातुवैषम्य निर्माण होऊन शरीर योगसाधनेसाठी समर्थ राहू शकणार नाही. त्यामुळे योगामध्ये तेवढेच तप संमत आहे, ज्यामुळे शरीरात धातुवैषम्य उत्पन्न होणार नाही. पातंजल-योगदर्शनाच्या जवळपास सर्व व्याख्याकारांनी तपाचे उपर्युक्त लक्षण मान्य केले आहे. मात्र, योगसिद्धांतचन्द्रिकाकर्ते नारायणतीर्थ यांनी उपवास इत्यादीद्वारे होणारे शरीरशोषण म्हणजे तप असे तपाचे लक्षण केले आहे. योगसाधनेसाठी चित्ताला समर्थ बनविण्याची शक्ती तपात आहे. ज्याप्रमाणे अग्निद्वारे सुवर्णाची मलशुद्धी केली जाते, त्याप्रमाणे अनादिकाळापासून चित्तातील रज-तम गुणांद्वारे उपार्जित कर्म, क्लेश व वासनांमुळे झालेली चित्ताची मलिनता शुद्ध करण्यासाठी तपाची आवश्यकता आहे. तपाशिवाय साधकाला योग सिद्धी होत नाही.

(२) स्वाध्याय : प्रणवादि पवित्र मंत्रांचा जप करणे किंवा मोक्षविषयक शास्त्रांचे अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय होय. चित्ताची सांसारिक क्रियांकडे होणारी प्रवृत्ती थांबवून त्यास मोक्षमार्गाकडे प्रवृत्त करणाऱ्या वेद, उपनिषद, पुराण इ. शास्त्रांचे अध्ययन तथा पुरुषसूक्त, रूद्रमण्डल इ. तसेच पौराणिक देवांच्या नामाचा जप वाचिक व मानसिक स्तरावर वारंवार करणे म्हणजे स्वाध्याय होय.

(३) ईश्वरप्रणिधान : योगदर्शनाप्रमाणे ईश्वरप्रणिधान या संज्ञेचे दोन अर्थ आहेत. समाधिपादातील ‘ईश्वरप्रणिधानाद्वा’ या सूत्राद्वारे सांगितलेले प्रणिधान म्हणजे ईश्वराविषयी असणारी सर्वोच्च भक्ती व साधनपादातील क्रियायोग आणि अष्टांगयोगातील नियमांमध्ये वर्णिलेले प्रणिधान म्हणजे निष्काम कर्म करणे किंवा सर्व कर्मांचे फळ ईश्वराला समर्पित करणे या अर्थांचे बोधन करते. विहित आणि अविहित अर्थात वैदिक व लौकिक सर्व प्रकारच्या कर्मफळाची आकांक्षा न ठेवता ईश्वराला समर्पित करणे म्हणजे ईश्वरप्रणिधान होय.

क्रियायोगाची दोन प्रयोजने आहेत. चित्ताला समाधीकडे अभिमुख करणे आणि उदार अवस्थेतील पंचक्लेशांना तनु अवस्थेत आणणे किंवा क्षीण करणे. क्रियायोगाद्वारे क्लेश क्षीण होऊन समाधी व पर्यायाने कैवल्यप्राप्ती (मोक्षप्राप्ती) होते.

पहा : कर्म, कर्मयोग, चित्त, जप, तप, भक्ति.

संदर्भ :

  • कर्नाटक विमला (व्याख्या), पातंजलयोगदर्शनम्, बनारस हिंदु विश्वविद्यालय, वाराणसी,  प्रथम आवृत्ती, १९९२.
  • कोल्हटकर, केशव कृष्णाजी, भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, आदित्य प्रतिष्ठान, पुणे, २००८.
  • पं. धुण्डिराजशास्त्री (संपा.), योगसूत्रम् (षट्टीकोपेतम्) , वाराणसी, तृतीय आवृत्ती, २००१.
  • स्वामी हरिहरान्द आरण्य ; बनारसीदास मोतीलाल, पातंजलयोगदर्शनं व्यासभाष्य, दिल्ली, १९८०.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर