विशिष्ट पाठ्यक्रमावर आधारलेली एक शैक्षणिक कसोटी. संपादन कसोटीद्वारे एका विद्यार्थ्याने अथवा विद्यार्थ्यांच्या एका वर्गाने/गटाने एखाद्या पाठ्यक्रमाची उद्दिष्टे कितपत यशस्वीपणे संपादित केलेली आहे, याची तपासणी वा मोजमाप केली जाते. संपादणूक कसोटीशी शिक्षकांचा नेहमी संबंध येतो. एखादा आशय शिकविल्यानंतर त्या आशयाचे विद्यार्थ्यांना कितपत आकलन झाले आहे, याचा पडताळा घेऊन आपल्या अध्यापन पद्धतीत बदल करण्यासाठी शिक्षकांना ती उपयुक्त ठरते. Test या इंग्रजी शब्दासाठी मराठीमध्ये काही ठिकाणी चाचणी हा शब्दसुद्धा वापरण्यात आलेला आहे.

प्रकार : संपादन कसोटीचे सामान्यत: दोन प्रकार आहेत. (१) घटक संपादन चाचणी (क्लासरूम अचिव्हमेंट टेस्ट) : घटक चाचणीला संस्कारश्रम संपादन कसोटी असेही म्हणतात. शिक्षकाने ही चाचणी विद्यार्थांना वैयक्तिक रीत्या देत असतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती, अनुदेशन, नियोजन आणि शिक्षकाने स्वतः दिलेल्या सूचनांचे मूल्यमापन करता येते. ही कसोटी कमी अभ्यासक्रमावर आधारित आणि शिक्षकनिर्मित असते. या चाचणीचा उपयोग नवीन ज्ञान देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना त्यासंदर्भात पूर्वज्ञान किती आहे, हे जाणून घेण्यासाठी होतो. त्याच प्रमाणे संबंधित आशय आकलनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणत्या कमतरता आहेत, याचाही शोध या चाचणीद्वारे घेता येतो. ही चाचणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद माध्यमांचे कार्य करते. यातून शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचे निदान करता येते. ती विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठीही उपयुक्त ठरते.

(२) प्रमाणित संपादन कसोटी (स्टँडर्डाइज्ड अचिव्हमेंट टेस्ट) : प्रमाणित संपादन कसोटीला समावेशक संपादन कसोटी असेही म्हटले जाते. ही कसोटी अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतली जाते. ती शिक्षण मंडळ किंवा बाह्य संस्थांमार्फत घेतली जाते. यात विद्यार्थ्याने प्राप्त केलेले अंतिम संपादन तपासले जाते. प्रमाणित संपादन कसोटी विकसनाच्या प्रक्रियेत पुढील टप्प्यांचा वापर केला जातो :

  • या कसोटीत संपूर्ण उद्दिष्टांवर आणि पाठ्याशयावरील प्रश्नांचा समावेश केला जातो.
  • चाचणीतून साध्य करायची उद्दिष्टे निश्चित झाल्यानंतर आशयाची निवड करून त्याचे विश्लेषण केले जाते आणि गुणदान योजना निश्चित केली जाते.
  • चाचणीच्या आवश्यकतेनुसार सुरुवातीला किंवा प्रश्नांच्या गरजेनुसार विशेष सूचना संक्षिप्त, अर्थपूर्ण व मर्यादित शब्दांत मांडल्या जातात.
  • चाचणी तयार झाल्यानंतर ज्या व्यक्तींसाठी ती तयार केली आहे, त्या छोट्या गटाला सोडविण्यास दिली जाते.
  • प्रतिसादकाला आलेल्या अडचणींबाबत (स‌ूचना, प्रश्नांचे स्वरूप, भाषा) तज्ज्ञांशी चर्चा करून आवश्यक ते बदल केले जातात.
  • ही चाचणी पुन्हा एका छोट्या गटाला सोडविण्यासाठी दिली जाते.
  • चाचणी सोडविल्यानंतर तिचे मूल्यमापन करून त्यामध्ये प्रतिसादकाला मिळालेले प्राप्तांक काढले जातात.
  • या प्राप्तांकावरून चाचणीमधील समाविष्ट प्रश्नांचे विश्लेषण केले जाते.
  • प्रश्न विश्लेषणातून प्रश्नांची काठीण्यपातळी, भेदभावक्षमता आणि प्रश्नाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल माहिती मिळते. या माहितीमुळे प्रश्नांतील चुका लक्षात येतात. त्यामुळे त्या दुरुस्त करता येणे शक्य होते.
  • चाचणीसाठी योग्य प्रश्नांची निवड करून काठीण्यपातळीनुसार त्यांचा क्रम लावण्यात येतो.

प्रश्नविश्लेषणामुळे कसोटीची सप्रमाणता आणि विश्वसनीयता वाढते. गटातील जास्त क्षमता असणारे विद्यार्थी आणि कमी क्षमता असणारे विद्यार्थी यांच्यामध्ये एखादा प्रश्न किती चांगल्या प्रकारे फरक किंवा भेद करतो, त्या क्षमतेला त्या प्रश्नाचा भेदभाव क्षमता निर्देशांक (डिसक्रिमिनेशन इंडेक्स) असे म्हणतात. एखादा प्रश्न विद्यार्थ्याच्या दृष्टीने किती सोपा आहे, याचे प्रमाण ठरविण्यासाठी सुकरता मूल्य (फॅसिलिटी व्हॅल्यू) काढले जाते. सुकरता मूल्याची किंमत जास्त असल्यास, तो प्रश्न अधिक सोपा असतो आणि किंमत कमी असेल, तर तो प्रश्न कठीण असतो. चाचणीतील प्रश्नांची भेदभावक्षमता आणि काठीण्यपातळी ठरविल्यानंतर योग्य प्रश्नांची निवड करून चाचणीतील प्रश्नसंख्या निश्चित केली जाते आणि चाचणीचा अंतिम मसुदा तयार केला जातो. अंतिम मसुद्यात चाचणीचे शीर्षक, लागणारा वेळ, सुधारित सूचना, सरावासाठी काही प्रश्न देऊन उत्तर देण्याच्या पद्धतीचे वर्णन इत्यादी घटकांचा समावेश केला जातो. हेच टप्पे प्रमाणित चाचणी विकसनासाठी वापरले जातात.

संपादन कसोटीची निर्मिती करताना प्रश्नप्रकार, प्रश्नांची काठीण्यपातळी, उत्तरसूचि, गुणदान योजना, वेळ इत्यादी घटकांचाही विचार करणे महत्त्वाचे असते. पेपर, पेन्सील या पद्धतीने कसोटीची निर्मिती केलेली असल्यास ही कसोटी तयार करण्यासाठी संविधान तक्ता तयार करावा लागतो. त्याला ब्ल्यू प्रिंट असेही म्हणतात. हा तक्ता त्रिमितीय असतो. बोधात्मक क्षेत्रातील घटक (ज्ञान, आकलन, उपयोजन) हे उभ्या स्तंभात घेऊन ओळींमध्ये घटकांची नोंद केली जाते. या प्रत्येक क्षेत्रात वस्तूनिष्ठ, लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नसंख्या आणि गुणदानाची नोंद केली जाते. हाच तक्ता द्विमितीयही करता येतो. त्यात फक्त उद्दिष्टांची क्षेत्र आणि पाठ्यघटकांच्या नोंदी असतात. त्यात वस्तूनिष्ठ प्रश्न, बहुत्तरी प्रश्न, एका वाक्यात उत्तरे, लघुत्तरी, दिर्घोत्तरी आणि निबंधवजा प्रश्नांचे एकत्रीकरण करून विकसित केली जाते. लिखित चाचणीतून सर्व प्रकारच्या उद्दिष्टांचे मापन केले जात नाही; परंतु अपेक्षित अध्यापन निष्पत्तीचे मापन केले जाते.

संपादन कसोटी ही शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी, अनुदेशन पातळी निश्चितीसाठी महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी या चाचणीत मिळविलेल्या गुणांवरून त्यांचे वर्गीकरण केले जाते. विद्यार्थ्याने उच्च संपादन गुण मिळविले असल्यास त्याने आशयावर प्रभुत्व मिळविलेले आहे आणि तो उच्च अनुदेशन घेण्यास तयार आहे असे समजले जाते. संपादन गुण कमी असल्यास त्याला उपचाराची किंवा पुनरअध्यापनाची गरज आहे, हे ठरविता येते.

क्षमता म्हणजे विद्यार्थ्यांनी त्या त्या इयत्तेत अपेक्षित ज्ञान व कौशल्य प्राप्त केलेले आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणप्रक्रियेत मागे राहू न देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतांचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी संपादन चाचणी महत्त्वाची भूमिका बजावते. संपादन चाचणीसाठी विधाने ठरविताना शासनाने निर्धारित केलेले वय, इयत्तानिहाय, आशय हे प्रमाण मानले जाते. विद्यार्थ्याने त्या त्या इयत्तेत नेमके काय शिकावे, हे निश्चितपणे ठरविलेले असते. संपादन चाचणीसाठी विधान/प्रश्न तयार करणाऱ्या व्यक्तीने त्या त्या इयत्तेसाठी अपेक्षित असलेले ज्ञान व कौशल्य तपासले जाते का, याचा विचार करून प्रश्न तयार करावे लागतात. अंतिम चाचणीमध्ये आशय सप्रमाणता ठरविण्यासाठी सर्व घटकांवर प्रश्न आलेले आहेत का, याची तपासणी केली जाते. त्यासाठी संविधान तक्त्याचा आधार घेतला जातो.

संपादन कसोटीचा उपयोग प्रामुख्याने शालेय पातळीवर पुढच्या वर्गात बढती देण्यासाठी, शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनासाठी, अध्ययन–अध्यापन प्रक्रिया प्रभावीपणे घडवून आणण्यासाठी होतो. म्हणजेच शिक्षण, उद्योग, सार्वजनिक सेवा, मार्गदर्शन व समुपदेशन यांसाठी संपादन चाचणीचा उपयोग केला जातो.  संपादन कसोटीची पाठ्यक्रमाशी संबंधित, विद्यार्थ्यांच्या सर्वसामान्य ज्ञानाची चाचणी, अध्ययन अनुभवावर आधारित आणि अध्यापनावर प्रभाव अशी वैशिष्टे आहेत.

आशयानुरूप ज्ञान कौशल्यांवर आधारित असते; विद्यार्थ्यांचे प्रामुख्याने बोधात्मक क्षेत्रातील क्षमतांचे मापन केले जाते; प्रश्न निर्मितीत त्रुटी राहिल्यास विद्यार्थ्यांचे अचूक मूल्यमापन करता येत नाही अशा संपादन  चाचणीच्या मर्यादा असल्या, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन करण्यासाठी आणि अध्ययनात योग्य बदल करण्यासाठी संपादन कसोटी महत्त्वपूर्ण आहे.

संदर्भ :

  • घोरमडे, के. यु., शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन, नागपूर, २०१०.
  • मुळे, सं., शैक्षणिक संशोधनाची ओळख, नाशिक, २०११.
  • Dandekar, W. N.; Rajguru, M. S., An Introduction to Psychological Testing and Statistics, Mumbai, 1988.
  • Haretel, G. D.; Walberg, H. J., The International Encyclopedia of Educational Evaluation, New York.

समीक्षक : एच. एन. जगताप