जगातील कोणत्याही दोन व्यक्ती पूर्णत: समान नसून त्यांच्या मानसिक योग्यतेमध्ये व्यक्तिगत फरक असतो. मानसशास्त्रज्ञांनी या मानसिक क्षमतेस अभियोग्यता असे म्हटले आहे. मनोवैज्ञानीकांमध्ये अभीयोग्यतेविषयी मतभिन्नता आहे. काहींच्या मते, ही जन्मजात किंवा अर्जित स्वरूपात असते; तर काहींच्या मते, ती अनेक गुणांच्या प्रभावाने बनलेली असते. जन्मजात योग्यता असली, तरीही तिचे पोषण होण्यासाठी अनुकूल वातावरणाची गरज असते. म्हणून कोणत्याही व्यक्तीची कोणत्याही विशेष उपक्रमात प्राप्तांकाची क्षमता किंवा त्याच्या पातळीसंबंधी भावी कथन म्हणजे अभियोग्यता होय.

तत्त्वे :

  • अभियोग्यता ही वर्तमान स्थितीत असते आणि ती व्यक्तीच्या भविष्याच्या क्षमतेकडे संकेत दर्शविते.
  • अभियोग्यतेमुळे कोणत्याही क्षेत्रांत ज्ञान व कौशल्य हस्तगत करण्याची क्षमता प्राप्त होते.
  • प्रयत्न सुरू ठेवणे, यश मिळविण्यासाठी तत्पर असणे, आपल्या व्यवसायात समाधानी असणे इत्यादी गोष्टी अभियोग्यतेमुळे शक्य होते.

वैशिष्टे : बिंग हॅम यांनी अभियोग्यतेची पाच वैशिष्टे सांगितली आहे.

(१) तो वर्तमान गुणांचा साठा असतो.

(२) व्यक्तीच्या जन्मजात योग्यतेबरोबरच कोणतेही कार्य सफल करण्यास त्याच्या धडधाकडपणाचा भाव व्यक्त करीत असते.

(३) अभियोग्यता ही क्षमतेचे प्रतिक म्हणून कार्य करते आणि भविष्याकडे संकेत करीत असते.

(४) अभियोग्यता व्यक्तीच्या गरजांच्या संबंधित असते. त्याच प्रमाणे ती व्यक्तीची अभिरुची, योग्यता आणि संतुष्टी यांत निकटचा संबंध प्रस्थापित करते.

(५) अभियोग्यता ही अमूर्तपणे व्यक्तीचे गुण व त्याच्या वैशिष्ट्यांचे निर्देश करते.

प्रकार : अभियोग्यता चाचणीचे प्रमुख चार प्रकार आहेत.

(१) सर्वसामान्य अभियोग्यता चाचणी : सर्वसामान्य अभियोग्यता चाचणीमुळे एखाद्या व्यक्तीचा कोणत्या विभागाकडे अधिक ओढा किंवा कल आहे, याची माहिती मिळते. उदा., यांत्रिक क्षमता, लिपिक क्षमता, संगणक क्षमता इत्यादी.

(२) विशेष अभियोग्यता कल : एखाद्या व्यक्तीचा कल कोणत्या विषयाकडे अधिक आहे, हे विशेष अभियोग्यता या प्रकारावरून ओळखता येतो. उदा., विज्ञान, भाषा, संगीत इत्यादी विषय.

(३) विशेष अभियोग्यता क्षेत्र : एखाद्या व्यक्तीमध्ये अनेक अंगभूत कला असतात. या विविध कलांपैकी व्यक्ती कोणत्या कलेच्या क्षेत्रात अधिक निपूण होऊ शकेल व यश प्राप्त करू शकेल, याचा अंदाज विशेष अभियोग्यता क्षेत्र या प्रकारातून काढता येतो. उदा., चित्रकला, नाट्य, संगीत इत्यादी क्षेत्र.

(४) व्यावसायिक अभियोग्यतेकडे कल : काही व्यक्ती विशिष्ट व्यवसायात रुची घेतात. त्यात यश मिळेल काय, हे या चाचणीवरून दिसून येते किंवा समजून येते.

उपयोग :

  • अभियोग्यता चाचणीचा उपयोग शिक्षणात सजातीय समुदायांची निर्मिती करण्यासाठी होतो.
  • विशिष्ट शैक्षणिक कार्यासाठी, मुलांची निवड करण्यासाठी या चाचणीचा वापर केला जातो.
  • दिशा निर्देशनासाठी वापर होतो.
  • विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठीसुद्धा या चाचणीचा वापर केला जातो.
  • शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर विशेष व्यवसायाकडे आकृष्ट होण्यासाठी या चाचणीची मदत होते.
  • पालक व विद्यार्थी यांच्याशी मार्गदर्शकास चर्चेची संधी देण्यासाठी अभियोग्यता चाचणीचा उपयोग केला जातो.
  • महाविद्यालयांमध्ये अथवा तांत्रिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना या कसोट्यांच्या मदतीने निवड केल्याने चांगल्या प्रतीचे विद्यार्थी अथवा उमेदवारांची निवड होते.
  • अभियोग्यता चाचणी या कसोटीमुळे व्यवसायात असफल ठरणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

निष्कर्ष : अभियोग्यता चाचणीवरून निष्कर्ष काढताना काळजी घ्यावी लागते.

  • अभियोग्यता निश्चित प्रकारचे निष्कर्ष काढण्याचा मोह टाळणे.
  • अभियोग्यता निश्चितपणे सांगता न येणे.
  • (३) एखाद्या अभियोग्यता कसोटीवरून निष्कर्ष न काढणे.
  • विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर भर देणे आणि बुद्धीमापन व प्राविण्य चाचण्या सोबत वापरून विविध चाचण्यांच्या आधारे मार्गदर्शन करणे इत्यादी.

मर्यादा : क्षेत्रनिहाय प्राविण्य तपासण्यासाठी योग्य अभियोग्यता चाचणीचा वापर न केल्यास अचूक क्षमतांचे निदान करता येत नाही. अभियोग्यता चाचणीच्या गुणांकावरून योग्य मार्गदर्शन न केल्यास व्यवसाय निवडण्यात अडचणी येतात.

आजच्या तांत्रिक साधनांमुळे कोणीही आपली अभियोग्यता चाचणी संगणकामार्फत घेऊन ती तपासू शकतात आणि योग्य व त्वरित निकाल प्राप्त करू शकतात.

संदर्भ :

  • घोरमडे, के. यु.; घोरमडे, क., शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन, नागपूर, २०१०.
  • रसनीस, न. रा., प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र, पुणे, २००८-०९.

समीक्षक : ह. ना. जगताप