मऊ किंवा ओबडधोबड (खडबडीत), लांबट वा गोलाकार संग्रंथनी (Concretionary), नलिका व ग्रंथिल-गुठळ्या (Nodular) सारख्या आकाराचे आणि अनियमित पातळ पापुद्रे ते जाड थरांच्या चुनखडीच्या राशीस कंकर म्हणतात. अवसादशास्त्रातील हिंदी भाषेमधून कंकर हे नाव सर्वप्रथम भारतात आणि त्यानंतर सर्वत्र प्रचलित झाले. पाण्यात विरघळलेल्या कॅल्शियम कार्बोनेट घटकांचे अवक्षेपण (Precipitation) होऊन तयार होणारा कंकर हा अशुद्ध चुनखडीचा (impure limestone) एक प्रकार आहे.
कंकरचे निक्षेपण उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात होत असते. कारण या ठिकाणी पर्जन्यमानाचा काळ कमी महिन्यांचा असतो. पर्जन्यकाळात जमिनीखाली मुरलेल्या पाण्यात, आजूबाजूला, परिसरातील माती – खडकांतून, रासायनिक अपक्षय आणि विलयनाने (Chemical decomposition & Solution) तयार होणारे कॅल्शियम कॉर्बोनेट विरघळत असते. पर्जन्यकाळानंतर दीर्घकाळ असणाऱ्या कोरड्या ऋतूमध्ये हे कॅल्शियम कॉर्बोनेटयुक्त संपृक्त पाणी उथळ खोलीवर सरकत असताना, मातीमधून केशाकर्षणाने जमिनीच्या पृष्ठभागाकडे येऊ लागते. उष्ण हवामानामुळे पाण्याचे जलद बाष्पीभवन होऊन हे लवण मृदेच्या तळाशी निक्षेपित होते. अशा प्रकारे कॅल्शियम कॉर्बोनेट पोकळ्या व भेगांतून साचून कंकरचे अनियमित थर किंवा गुठळ्या उथळ भागातून तयार होतात.
कंकर ग्रंथिल-गुठळ्या या जमिनीलगत वा जमिनीवर मुख्यत: कठिण पाषाणावरील आणि खोलगट भागातील काळ्या मातीच्या नाला, ओढा किंवा नदीच्या चिबड क्षेत्रात आणि पूरप्रवण भागांतून आढळतात. तर कंकर खडकांच्या सलग अथवा तुटक राशी, माती आणि भेगांमधून ऋतूकाळाप्रमाणे बदलणार्या भूजलीय पातळ्यांमधील अनियमिततेनुसार जमिनीखाली उथळ खोलीपर्यंत अवक्षेपणाने निक्षेपित (Precipitation deposition) होतात. संग्रंथनी गुठळ्यांचा आकार १० मिमी. ते १०० मिमी. व्यासापर्यंत बदलत असतो. यांची चुनखड शुद्ध गुणवत्ता कंकर खडकांच्या राशीपेक्षा अधिक असते. परंतु त्या विपुल प्रमाणात निक्षेपित होत नाहीत. काही भागांतून अपक्षरणामुळे नदीक्षेत्रातील पुरातन काळात तयार झालेले, परंतु नंतर गाळाने झाकले गेलेले जमिनीखालील कंकरस्तर आजच्या काळात जमिनीवर उघडे पडलेले आढळतात.
कंकर प्रामुख्याने कॅल्शियम कॉर्बोनेटने बनलेले असते, पण लोहाची खनिजे, सिलिका, माती आणि क्वचित कुजलेले जैव पदार्थ कमी अधिक प्रमाणात यामध्ये मिसळलेले असतात. कंकर गुठळ्यांचा आकार, आकारमान आणि गुळगुळीतपणा काही प्रमाणात मातीतल्या संरचनेवर अवलंबून असतो. भारतातील कंकरांमध्ये ५ ते २५ टक्के पर्यंत मातीचे प्रमाण आढळते. त्यामुळे त्यांच्यापासून द्राविक/जलीय चूना (Hydraulic lime) तयार करता येतो, ज्याचा पर्यायी सिमेंट म्हणून भारतामधील खेड्यांतून मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. कंकर हे साधारण पांढरा ते (मातीच्या प्रमाणात) काळपट रंगाचे असतात. काही ठिकाणी कंकरातील विविध रंगछटा या त्यांच्या रासायनिक घटकांतील हेमाटाइट आणि लिमोनाइट या लोहाची खनिजेद्वारे आणि इतर अपद्रव्यांद्वारे नियंत्रित केले जातात. कंकरचा थर हा कठिण व टणक असल्याने पाणी मुरण्यास अपार्य असतो. जगातील इतर भागांत कॅलिशी (Caliche), कॅलक्रीट (Calcrits), हार्ड पॅन (Hard pan), ड्यूरी क्रस्ट (Duri crust) अशी समानअर्थी नावे कंकर ऐवजी वापरली जातात.
भारतामधे अनेक नदीच्या खोऱ्यात कंकर निक्षेपित होते. प्रामुख्याने उत्तर भारतातील गंगा-सिंधु नद्यांमुळे तयार झालेल्या पुरातन जलोढीय (गाळाच्या) विस्तारित मैदानात (Alluvial plains), परंतु सध्याच्या नदी पूरपात्रापासून लांब आणि उंचावर असलेल्या भागरवर्गीय मातीच्या थरात आणि नर्मदेच्या खोऱ्यामधे कंकर आढळते. पंजाब व उत्तर प्रदेशातील बिचवा कंकरची गुणवत्ता सर्वांत अधिक आहे. महाराष्ट्रातील नदी/तलावांच्या काठी माती/खडकांमधून मिळणारी चुनखडीही कंकरचाच एक प्रकार आहे. भारतामध्ये कंकरचा उपयोग स्थानिक पातळीवर बांधकामाचा चुना तयार करण्यासाठी फार पूर्वीच्या काळापासूनच होताना दिसतो.
जगभरामध्ये कमी पाऊस आणि उष्ण हवामान असणार्या प्रदेशातील विविध नद्यांच्या पूर मैदानातील जलोढ (Alluvium) आणि जलोढीय मृदांच्या (Alluvial soil) थरांमधून कंकरांचे पातळ पापुद्रे, सलग किंवा विलग अनियमित थर आणि गुठळ्या यांचे निक्षेपण पाहावयास मिळते. इ. स. २००० मधे द. ऑस्ट्रेलियातील हुकिना नदीच्या पूरतलावर कंकरची पत्रित स्तर (Sheet layers) आढळले आहेत.
समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर