संस्कृती म्हणजे समाजाच्या सर्वंकष जीवनाच्या विविध बाजूंचे दर्शन घडविणारा आलेख. त्या आलेखात भाषा, चालीरिती, परंपरा, साहित्य, धर्म इत्यादी बाबी येतात. संस्कृती ही एक अशी छत्री आहे की, ती सामाजिक वागणूक आणि मानवी समाजजीवनाचे नियम तसेच ज्ञान, कला, कायदे, चालीरिती, क्षमता आणि व्यक्तींच्या सवयी ह्यांना समाविष्ट करते.

धर्म नि संस्कृती ह्यांचा परस्परसंबंध : धर्म म्हणजे समाजाची श्रद्धा, उपासनापद्धती व नैतिक शिकवण. ‘विशिष्ट ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्यावर आधारित असणारी तत्त्वप्रणाली, धर्मश्रद्धा व उपासना. साहजिकच धर्म हा संस्कृतीचा एक भाग ठरून तो इतर सर्व बाबींशी निगडित असतो. धर्मात संस्कृतीच्या इतर बाबी प्रतिबिंबित होतात. तसेच संस्कृतीच्या इतर बाबींत धर्म दिसून येतो. उदा., भाषेत धर्माची शिकवण दाखवणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार सापडतात. जसे, मराठीत ‘देव तारी त्याला कोण मारी’, ‘असेल माझा हरि, तर देईल खाटल्यावरी’… इत्यादी. तसेच बायबलची वचने इंग्रजीत वाक्प्रचार म्हणून सापडतात. जसे, ‘Writings on the wall’, ‘Good Samaritan’… इत्यादी. अशा पद्धतीने धर्माचे संस्कृतीकरण आवश्यक आहे. म्हणून धर्म हा मूळ संस्कृतीसकट स्थलांतरित होतो व ‘जेथे जेथे तो जातो, तेथल्या संस्कृतीशी तो संवाद साधतो. अशा संवादात दोन्ही संस्कृतींची पडझड होते. त्यालाच म्हणतात ‘संस्कृतीकरण’.

ख्रिस्ती धर्माचे संस्कृतीकरण : ख्रिस्ती धर्म स्वभावाने जात्याच मिशनरी आहे. ‘मला जो मुक्तीचा मार्ग सापडला आहे, तो मला जाऊन दुसऱ्याला दिला पाहिजे’ अशा परोपकारी भूमिकेतून ख्रिस्ती अनुयायी हा मिशनरी बनतो. ख्रिस्ताचे शुभवर्तमान (‘नवा करार’) हे इसवीसनाच्या आरंभीस इझ्राएलच्या हिब्रू संस्कृतीत निर्माण झाले. निर्मितीतच त्याने मूळची अनेक सांस्कृतिक रूपे व चालीरिती सोडल्या व नव्या घेतल्या. येशूने विवेकाची भूमिका घेऊन ज्यू शब्बाथाची कल्पनाच उलटी फिरवून म्हटले, ‘‘शब्बाथ कायदा माणसाच्या सोयीसाठी आहे; माणूस शब्बाथच्या पालनासाठी नव्हे’’. जेव्हा बऱ्याच ज्यू चालीरिती बदलण्याचा प्रसंग आला, तेव्हा येशू म्हणतो ‘‘आता नवा द्राक्षारस नव्या बुधल्यातच घातला पाहिजे’’ (बायबल, मत्तय ९:१६-१७). म्हणजे नवा धर्म–ख्रिस्ती धर्मच–स्थापन केला पाहिजे. आपली सुवार्ता जगात पसरविण्याची खुद्द ख्रिस्ताची इच्छा होती. एकदा काही ग्रीक लोक येशूला भेटण्यासाठी येतात, तेव्हा तो उद्गारतो “आता देवपुत्राचा सन्मान होण्याची वेळ आली आहे!” आणि तो आनंदी होतो (बायबल, योहान १२:२०-२२). येशूचे शुभवर्तमान हे चार संहितांमधून (मत्तय, मार्क, लूक व योहान) आपल्यापर्यंत येते. त्या संहिता सुरुवातीच्या इझ्राएलच्या चार वेगवेगळ्या परिवारांत झालेल्या प्रक्रियांमधून तयार झाल्या. सुवार्तिक लूक हा ग्रीक होता. त्याने ग्रीक संस्कृतीशी जुळवून ख्रिस्त संदेश मांडला; तर मत्तय ज्यू जमातीतील ख्रिस्ती जनपरिवारातला असल्यामुळे तो आपल्या शुभवर्तमानात पदोपदी ख्रिस्ताची शिकवण ज्यू परंपरांशी जोडून दाखवतो. येशूचा जन्म कुमारीच्या पोटी होणार होता, हे भाकीत ‘जुन्या करारा’त लिहून ठेवलेले तो दाखवून देतो (बायबल–मत्तय १:२२-२३, २:५-६).

संत पॉल ह्यांनी अनेक देशांत मिशनरी दौरे करून विविध संस्कृतींत धर्मप्रचार केला. ख्रिस्ती धर्मावर चढलेला इझ्राएली संस्कृतीचा रंग कमी करून त्याला त्यांनी, विशेषत: ग्रीक, सिरियन, पॅलेस्टिनी आदी संस्कृतींचा साज चढवला. सुंतेची परंपरा त्यांनी मोडून काढली (बायबल, कृत्ये २१:२१, कलस्सै. २:११) पॉल कबुली देऊन म्हणतात की, ‘‘सुवार्ता प्रसारासाठी मी ‘जसा देश तसा वेश’ परिधान केला… लोकांच्या जीवनाशी मी एक झालो… ‘मी सर्वांसाठी सर्व बनलो’; इझ्राएलींसाठी इझ्राएली, ग्रीकांसाठी ग्रीक…’’ (बायबल, १ करिंथ ९:१९-२३). म्हणजेच त्यांनी संस्कृतीकरण अवलंबिले.

आजतागायत शुभवर्तमान विविध देशांत पसरले ते संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेमधून. प्रत्येक देशात ख्रिस्तसभेने स्थानिक जनसमूहाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये (Cultural individuality) जपली. त्यांची अस्मिता सांभाळली, त्यांची विद्वत्ता मान्य केली आणि आपली सुवार्ता त्यांच्याच विचारपद्धतीने, प्रतिकांमधून आणि प्रसारपद्धतीने त्यांना दिली. हे सारे करताना यजमान संस्कृतीचा वारसा जपला, मूल्यपद्धती पुढे नेली नि जनतेचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. आयर्लंडमध्ये ते काम संत पॅट्रिक ह्यांनी केले, तर पोप बॉनिफेस ह्यांनी जर्मनीमध्ये. संत सिरिल व मिथोडिअस ह्या बंधूंनी ग्रीसमधील स्लाव्ह लोकांत, तर संत जॉन डिब्रिटो ह्यांनी तामिळनाडूत केले. आज जगातील वेगवेगळ्या २४ स्थानिक संस्कृतींत ख्रिस्ती उपासना साजऱ्या होतात. आर्मेनियन, कॉप्टिक, ग्रीक, सिरियन आदी उपासनापद्धती (Rites) प्रचलित आहेत, हे त्याच संस्कृतीकरणाचे द्योतक आहे. त्यामुळेच ख्रिस्ती धर्म जगात पसरला नि काळाला पुरून उरला आहे. प्रत्येक वेळी शुभवर्तमानाचा अन्य संस्कृतीबरोबर झालेला मिलाफ ही वास्तविक आंतर-सांस्कृतिक प्रक्रिया आहे. अर्थात, शुभवर्तमान घेऊन जाणाऱ्या मिशनरींनी स्वत:ला कितीही अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी स्थानिक भाषेत नि संस्कृतीत ते स्थलांतरित करताना मूळच्या संस्कृतीमधले थोडे गुणविशेष नव्यात उतरलेच! वास्तविक शुभवर्तमानाशी संपर्क होताच तेथे दोन लोकसमूहांची अशी प्रक्रिया सुरू होते.

ख्रिस्ती धर्म महाराष्ट्रात १५ व्या शतकांत यूरोपियन संस्कृतीमार्गे आला. तो महाराष्ट्राच्या संस्कृतीत रुजला तरच तो लोकांच्या जीवनात प्रवेश करू शकेल, हे मिशनरींनी ओळखले नि ख्रिस्ती धर्माचे ‘भारतीयीकरण’ करण्याचे प्रयत्न केले. फादर स्टीफन्स ह्यांनी मराठी भाषेवर मोगरी पुष्पासारखे प्रेम केले, तीवर प्रभुत्व मिळविले नि तुकारामांच्या अभंगाच्या तोडीच्या ११ हजार ओव्यांचे क्रिस्तपुराण रचले! रेव्ह. टिळक, पंडिता रमाबाई आदींनी आपल्या आचरणाने ‘धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे’, हे दाखवून दिले. अर्थात, मिशनरींचे भारतीय संस्कृतीशी वाद-विवाद-संवाद घडणे अटळ होते.

ख्रिस्ती कट्टरवाद : संस्कृतीकरणाला खरा अडथळा येतो तो कट्टरवादाचा. ख्रिस्ती धर्म रोममार्गे म्हणजे सम्राट कॉन्स्टंटाइनच्या आशीर्वादाने यूरोपात पसरला. यूरोपात त्याचे एवढे संस्कृतीकरण झाले की, आज तो जगाला यूरोपियनच वाटतो! इतकेच नव्हे, तर भारतातही तो अजून काही अंशी कट्टर यूरोपियन राहिला आहे. कधी कधी तो यूरोपियन साज टाकून द्यायला भारतीय ख्रिस्तीच तयार नाहीत! भारतीयीकरणाने मूळ ख्रिस्ती धर्म बुडेल, अशी त्यांना भीती वाटते. अर्थात, त्याला कारण ख्रिस्ती धर्माची कट्टरवादी भूमिका. ‘माझाच धर्म खरा, दुसरे खोटे वा अपूर्ण आहेत’; ‘येशू हाच देव पित्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही’; ‘मुक्ती मिळवायची असेल, तर बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती परिवारात आले पाहिजे’ इत्यादी तत्त्वे बायबलनेच शिकवली आहेत. ख्रिस्ती धर्मच फक्त ईश्वरदत्त आहे. ईश्वरानेच प्रथम इझ्राएली समाजाची निवड केली. पण त्यांनी येशूचा अव्हेर केला; तरी ते अजून देवाला सर्वाधिक जवळचे आहेत. बायबलचे भविष्य आहे की, अखेर सारे विश्व ख्रिस्ताठायी एकत्रित होईल (बायबल, ईफिस २:१४-१६). येशू म्हणतो, ‘‘सत्य, मार्ग, जीवन मीच आहे’’ (बायबल, योहान १४:६). येशूच देवाचा एकमेव अवतार आहे (बायबल, कलस्सै २:६-१०). येशू आज्ञा देऊन म्हणतो, ‘‘जा, सर्व सृष्टीला माझा संदेश द्या, त्यांना बापाच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे बाप्तिस्मा स्वीकारतील त्यांना मुक्ती मिळेल. नाकारणाऱ्यांना शिक्षा होईल’’ (बायबल, मार्क १६:१५-१८, मत्तय २८:१६-२०, गलती १:७-८). ह्याचा शब्दश: अर्थ घेणारा कट्टरवादाच्या संस्कृतीकरणाच्या आड येतो.

दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेचा विशाल दृष्टिकोन : अखेर १९६५ साली दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेने कॅथलिक जगाचे लक्ष संस्कृतीकरणाकडे वळविले. कट्टरवाद थोड्या वेगळ्या मार्गाने समजून दिला. येशू व ख्रिस्तसभा जरी तारणाचे एकमेव मार्ग असले, तरी ते तसे माझ्यासाठी आहेत, सर्वांनी तसे मान्य करण्याची गरज नाही. ‘नॉस्त्रा एताते’ ह्या परिपत्रकात सर्व धर्माप्रती आदर दाखवायला चालना दिली आहे. इतिहासात जो कर्मठपणा दाखवला आहे नि धर्मप्रसार करताना इतर धर्मांप्रती जी असहिष्णुता बाळगली आहे, त्याबद्दल पोप जॉन पॉल द्वितीय ह्यांनी अनेकदा जगाची क्षमा मागितली आहे. परिषदेने चर्चमधील आधीची संकुचित वृत्ती (Exclusivism) सोडून दिली. दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेचे जनक पोप जॉन तेविसावे म्हणाले, ‘‘चला, आपण ख्रिस्तसभेची खिडकी उघउू या; जगातून थोडी ताजी हवा आत येऊ द्या!’’ त्यानुसार आता सर्व धर्मांप्रती नवा दृष्टिकोन (Inclusivism) जोपासला जात आहे. पण अजूनही अनेक समूह कर्मठ राहिले आहेत.

कोणताच धर्म एका देशातून दुसऱ्या देशात संक्रमित होताना निखळ तत्त्वे घेऊन जाऊ शकत नाही. ती तत्त्वे तिथल्या संस्कृतीच्या अंगामांसात भिनलेली असतात. तेव्हा दोन संस्कृतींची देवाण-घेवाण होतेच. व्हॅटिकन परिषदेचे परिपत्रक ‘आधुनिक युगात ख्रिस्तसभा’ (Nostra aetate) ख्रिस्तसभेला संस्कृतीकरणाची आज्ञा करते.

‘नॉस्रा एताते’ ह्या व्हॅटिकन परिषदेच्या दस्ताऐवजात (क्र. २) विविध संस्कृतींमधील धर्मांनी एकमेकांशी सुसंवाद का करावा, ह्याची पुढील कारणे दिली आहेत : अखिल मानवजात हा एक परिवार आहे; मानवजातीचा उगम एका स्रोतापासून झाला आहे; आणि अखेर अखिल मानवजात एका ईश्वराठायी परतणार आहे. अशा अवस्थेत वेगळे जिणे जगणे मुळीच योग्य नाही. वेगवेगळे धर्म तरी कसे निर्माण झाले? तेच परिपत्रक पुढे म्हणते, प्रत्येक समाजाने आपापल्या संस्कृतीमधून विचारधन घेऊन मनुष्याच्या जटील प्रश्नांची उकल करून घेण्याचा प्रयत्न केला. जसे, मी कुठून आलो? कुठे जाणार? जीवनात दु:ख का येतात? आणि मी शेवटी मरणार तरी का? आदी प्रश्नांची उत्तर म्हणजेच विविध धर्मसंस्थांची उत्पत्ती आहे. एकत्र येऊन जर ह्या उत्तरांची देवाण-घेवाण केली, तर सर्वांनाच आपले अंतिम ध्येय गाठण्यासाठी उपयोग होईल.

संस्कृतीकरण ख्रिस्तसभेचे मूलभूत कर्तव्य ठरते, त्याची तीन ईशज्ञानीय कारणे होतात : अ) अखिल विश्व हे ईश्वराने निर्माण केले आणि ते त्याला ‘बरे’ वाटले, ह्याची कबुली देवानेच दिली आहे (बायबल, उत्पत्ती १). तर मग सर्व संस्कृतीत चांगूलपणा असणारच! तो एकमेकांशी सुसंवाद करून एकमेकांनी स्वीकारला पाहिजे. ब) मानवाच्या पापामुळे हे विश्व दूषित झाले. ते तारण्यासाठी देव माणूस झाला. ख्रिस्ताचा मानवी अवतार हेच मोठे संस्कृतीकरण झाले. त्याच्या दु:ख-मरण-संजीवन (पास्काचे रहस्य) याद्वारे मानव देव बनला. देव माणूस झाला आणि देवाने मानवाची संस्कती जणू आपलीशी केली. केवळ पाप सोडून तो सर्व बाबतींत मनुष्य बनला (बायबल, २ करिंथ ५:२१); तसा येशूचा धर्म सर्व संस्कृतींशी एकरूप झाला पाहिजे. अशा प्रक्रियेत दोन्ही संस्कृतींचे शुद्धीकरण झाले पाहिजे. देवपुत्राने मानव बनून देवबापाचा मानवाशी तुटलेला संबंध सांधून टाकला. आता ख्रिस्ताठायी सर्व मानवजात पुन्हा ‘नवीन’ बनविली आहे. तेव्हा कोणतीच संस्कृती वाईट नाही. सर्व धर्मांत चांगले गुण आहेत. त्यांना ख्रिस्ती धर्माने देवाजवळ आणले पाहिजे आणि त्यासाठी सुसंवाद आणि संस्कृतीकरण झाले पाहिजे. क) संस्कृतीकरण हे आता ख्रिस्तसभेचा स्वभाव झाला आहे. वास्तविक ते देवाचेच ‘मिशन’ पुढे चालू ठेवण्यासारखे आहे. देवाने मानवाशी जो प्रेमळ संवाद साधला; तोच वैश्विक प्रेमाचा संदेश ख्रिस्तसभेने पूर्णत्वास न्यायचा आहे.

हिंदू मंदिराच्या वळणावर बांधलेले ख्रिस्ती चर्च, एनबीसीएलसी, बंगरूळू.

संस्कृतीकरणाला भरती आणि ओहोटी : दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेच्या प्रभावाने १९६५ ते १९७५ ह्या काळात भारतीय कॅथलिक चर्चमध्ये ही संस्कृतीकरणाच्या उपक्रमाला बहर आला होता. त्या मोहिमेचे अनेक प्रवर्तक होते. ते अधिक उत्साहाने नि सर्वशक्तिनिशी काम करत होते. अखिल भारतीय कॅथलिक केंद्राचे संचालक फादर आमलोरपावदास ह्यांनी बंगलोरचे राष्ट्रीय केंद्र (NBCLC) संस्कृतीकरणाचे स्फूर्तिस्थान बनविले. केंद्राच्या प्रांगणात त्यांनी एक ख्रिस्ती चर्च अगदी हिंदू मंदिराच्या वळणावर बांधले. त्या वास्तूतून त्यांनी ख्रिस्ती तत्त्वज्ञान भारतीय प्रतिकांतून शब्दसमूहांतून (Tarms) देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केंद्रात संस्कृतीकरणावर विविध शोधनिबंध लिहिले. व्याख्याने, चर्चासत्रे, अभ्यास-शिबिरे इत्यादी आयोजित करून त्यांत देशातील नामांकित ईशज्ञानी व बिशप एकत्र केले आणि देशात संस्कृतीकरणाची एक लाट निर्माण केली. रोमन कॅथलिक चर्चने तर आपल्या अधिकृत उपासनेत (Roman missal) दिवाळी व गणपती उत्सव ह्या भारतीय सणांसाठी खास ‘मिस्साबली’ तयार करून त्या उपासना सामावून घेतल्या. याच लाटेत सामील होऊन आर्चबिशप फेलिक्स मच्याडो ह्यांनी ज्ञानेश्वरीवर आपली डॉक्टरेट केली, तर बिशप थॉमस डाबरे ह्यांनी संत तुकारामांच्या अभंगांतील अन्न-प्रतिकांचा समन्वय थेट ख्रिस्तयागाशी जोडून दाखवला. महाराष्ट्रात पुण्याचे जेज्वीट धर्मगुरू कार्डिनल पिमेंटा व वसईत फादर हिलरी फर्नांडिस ह्यांसारख्या व्यक्तींनी संस्कृतीकरणाच्या कोरलेल्या काही खुणा आजही दृष्टीस पडतात. कार्डिनल पिमेंटा ह्यांनी मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनार्थ मराठी माध्यमाच्या शाळांचा आग्रह धरला. पेपल सेमिनरीमध्ये एक पुतळा बांधला आहे. ‘ओम पूर्णमद:/पूर्णमिदम् /…’ ह्या श्लोकाचे प्रात्यक्षिक दाखविणारे ते शिल्प आहे. अर्थात् ‘पूर्णम’चा ख्रिस्ती तत्त्वांत बसणारा अर्थ विषद केला आहे.

२०१०च्या सुमारास मात्र आपल्या देशातील संस्कृतीकरणाची चळवळ थंडावली. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत झाल्या. अनेकांनी दाखवून दिले की, भारतात विविध संस्कृती नांदत असता राष्ट्रीय केंद्राने फक्त ब्राह्मणी (संस्कृत) संस्कृतीचाच अवलंब केला आणि दलित व आदिवासी ख्रिस्ती समूहांकडे दुर्लक्ष केले. अर्थात, पुढे प्रत्येक प्रादेशिक भागात आपापल्या संस्कृतीनुसार संस्कृतीकरण करावे, असे ठरले. पण प्रादेशिक पातळीवर तसे विशेष प्रयत्न झाले नाहीत. संस्कृतीकरण थंडावण्याचे दुसरे कारण झाले ते म्हणजे चर्चमध्ये नव्याने आलेली ‘पवित्र आत्म्याठायी नवजीवन’ ही चळवळ. त्यानी पुन्हा धार्मिक असहिष्णुता आणली व इतर धर्म तसेच संस्कृती यांच्याशी फारकत घेतली.

संदर्भ :

  • Aamaladoss, Michae, Beyond Inculturation : Can the Many Be One?, Delhi, 1998.
  • Amalorpavadass, D. S. Theological reflections on inculturation, Rome, 1997.
  • Dhavamony, M. Christian Theology of Inculturation, Rome, 1997.
  • Phan, P. C.; Cenkner, W. Ed. Contemporary Theology and Inculturation in the United States, in The Multicultural Church : A New Landscape in U. S. Theologies, New York, 1996.
  • Sagay, John, Ed. Inculturation in Liturgy, NBCLC, Bangalore, 2016.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया