संत बर्नार्ड : (? १०९० — २० ऑगस्ट ११५३). क्लेअरव्हो या ख्रिस्ती मठाचे संस्थापक आणि पाश्चात्त्य मठवासीय पद्धतींत चैतन्य आणणाऱ्यांपैकी एक श्रेष्ठ व्यक्ती. त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत क्लेअरव्हो मठाचे माठाधिपती म्हणून काम पाहिले. त्यांचा जन्म फ्रान्समधील दिजॉन शहरी (पॅरिसपासून दक्षिणेकडील दोनशे किमी. अंतरावर वसलेले) एका उमराव घराण्यात झाला. त्यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा प्रभाव प्रखरतेने असून संत बर्नार्ड यांचे खरे धार्मिक परिवर्तन त्यांच्या आईच्या मृत्यूनंतरच झाले.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने समृद्ध असलेले संत बर्नार्ड यांनी ‘परमेश्वराच्या प्रेमाची महती गोड जिभेने सांगितली’ म्हणून त्यांना ‘गोड जिभेचा धर्मपंडित’ असे मानले जाते. ‘क्रूसेड्स’ या धर्मसुधारणा चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. नम्रतेविषयी अमाप लिहिले, तरी त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार व पवित्र जीवनाचा आदर्श म्हणून संत बर्नार्ड यांनी त्या काळच्या पाच पोपमहोदयांना सल्ला दिला. चर्चवर पडलेली त्यांची छाप अद्याप सामर्थ्यशाली आहे.

नव्याने स्थापन झालेल्या ‘सिस्टरशन’ मठवासियांच्या जीवनात संत बर्नार्ड यांनी प्रवेश घेतला. संत बेनेडिक्ट या संस्थापकांनी प्रचलित मठवासी संस्था सुरू केली होती. त्यातून फुटलेला हा मठवासियांचा वर्ग १०९८ साली सुरू झाला होता. संत बेनेडिक्ट यांनी स्थापन केलेले मठ (Benedictines) व त्यांमधील शिथिल होत असलेले जीवन पाहून ते परत खडतर, उग्र व कडक तपश्चर्येत जगले जावे म्हणून ही ‘सिस्टरशन सुधारणावादी चळवळ’ मठवासियांमध्ये सुरू झाली होती. संत बर्नार्ड यांना हे जीवन इतके आवडले की, त्यांनी आपल्या २५ मित्रांना या जीवनाचे महत्त्व पटवून देऊन आपणाबरोबर या मठात १११२ साली आणले. त्यात त्यांच्या स्वत:चे बंधूही होते.

कडक तपश्चर्येचे परिणाम संत बर्नार्ड यांच्या शरीरावर थोड्याच अवधित दिसू लागले; ते दुर्बल आणि कमजोर बनले. तरीसुद्धा अवघ्या तीन वर्षांत ते मठाचे मठाधिपती (ॲबट) बनले. मठ हा चर्चच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग समजला जातो व मठाधिपतींचे अधिकार जवळजवळ बिशपांच्या तोडीचे असतात. एका मठात ३०–४० मठवासी झाल्यावर दुसऱ्या ठिकाणी नवीन मठ स्थापण्यात येतो. एक मठ दुसऱ्या मठावर अवलंबून नसतो. प्रत्येक मठाचा कारभार स्वयंभू असतो. संत बर्नार्ड हे नव्याने स्थापन झालेल्या ‘सिस्टरशन सुधारणावादी चळवळी’च्या क्लेअरव्हो येथील तिसऱ्या मठाचे मठाधिपती बनले. तेथे काही मठवासियांना शिथिलता हवी होती; पण संत बर्नार्ड यांनी त्यांची ती मागणी धुडकावून लावली.

संत बर्नार्ड हे अध्यात्मात जलद रीत्या प्रगती करीत होते. त्यांनी शहाणपणाने घेतलेले निर्णय सर्वांना पटत होते. परमेश्वराचा अनुभव न घेता दिखाऊपणाची अध्यात्मता जीवनाला किती घातक ठरते हे पटवून देताना ते म्हणाले, ‘‘काही मठवासियांना फक्त लांब झगे घालून गर्वाने डोके उंचावून फक्त दिखाऊपणा हवा आहे’’. संत बर्नार्ड यांच्या हाती सोपविलेल्या मठाचा जलदगतीने उत्कर्ष होत होता. काही अवधीतच त्यांच्या मठातून दुसरा मठ स्थापन झाला. तेथून पुढे ७० व ७० पासून १०० मठ ते जिवंत असतानाच स्थापन झाले. मठांची संख्या जशी वाढत होती, तशीच संत बर्नार्ड यांची जबाबदारी व त्याबरोबर त्यांचा प्रभावही वाढत होता. त्यांना एकांत हवा होता [काही काळ त्यांनी ‘हर्मिट’ (पर्णकुटी) मध्ये एकाकी जीवनाचा अनुभव घेतला होता]. परंतु त्यांच्या अंगभूत शहाणपणामुळे जगाच्या निरनिराळ्या भागांतून अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर जणू लादल्या जात होत्या.

संत बर्नार्ड यांच्या काळात मठवासियांच्या इतर सुधारणावादी पद्धती असलेल्या मठवासियांकडून (उदा., कार्तूसियन्स, प्रीमॉस्ट्राटेसियन्स) त्यांच्याकडे आदराने पाहिले जात असे. पाखंडी मताच्या काही ख्रिस्ती विचारवंतांना खोडून पोपमहोदयांना पुष्टी देण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू लागले. त्यांचा एक विद्यार्थी जेव्हा पोप म्हणून निवडला गेला (तिसre युजेनिअस), तेव्हा त्यांचा प्रभाव खूपच उंचावला गेला. “तुला फक्त चर्चची देखभाल करण्यासाठीच, तुला चर्चचा मालक बनविण्यासाठी तुझ्या हातांत सत्ता दिली गेली नाही” अशा परखड शब्दांतही संत बर्नार्ड पोपमहोदयांना सल्ला देत असे. त्यांचा प्रभाव इतका वाढला की, ‘संत बर्नार्ड हेच खरे पोप आहेत’ असा सूर बऱ्याच लोकांकडून निघू लागला.

संत बर्नार्ड हे खरे अजरामर त्यांच्या अंगी जन्मजात असलेल्या गूढवादी अध्यात्मामुळे (Mystical Writings) झाले आहेत. आपण परमेश्वरावर अस्सल प्रेम कसे करावे, हे पटवून देण्यात ते तरबेज ठरले. परमेश्वरच सर्वांच्या प्रेमाचे खरे कारण आहे. बायबलमधील गीतरत्न या पुस्तकावर त्यांनी लिहिलेले भाष्य (८६ दीर्घ प्रवचने) हे त्या पुस्तकावर आजपर्यंत दुसऱ्या कोणी लिहिलेली नाही अशी अत्युत्तम कृती (Master piece) म्हणून गणली जाते. त्यांनी ख्रिस्ती अध्यात्माचा पाया रचला. देवाला जाणून घेणे (ब्रह्मजिज्ञासा) हीच खरी अध्यात्माची सुरुवात व कळस आहे, असे ते सांगतात. ‘‘फक्त जाणण्यासाठी काही जणांना जाणून घ्यायची इच्छा होते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे; कारण ते फक्त कुतूहलापोटीच जाणून घेतात. इतर काहीजण इतरांना स्वत:ची जाणीव व्हावी म्हणून पुढे येतात. जणू मला खूप माहिती आहे म्हणून मी महान! असेच त्यांना वाटते. हा निव्वळ दिखाऊपणा (Vanity) आहे. इतरही काही जाणून घेण्यासाठी हपापलेले आहेत; कशासाठी? जाणून घेतलेले विकून त्यावर धनसंपत्ती कमाविण्यासाठी, मान-प्रतिष्ठा संपादन करण्यासाठी. ही गोष्ट लाजिरवाणी नफा-तोट्याची आहे! थोडे लोक सेवा करण्यात पारंगत बनण्यासाठी जाणून घेतात. हा खरा उदारपणा, करुणा आणि बंधूभाव. शेवटी, स्वत: शिकत राहून ‘मी कोण? कशासाठी जन्मलो? कुठे पोचलो? काय साध्य करीत आहे?’ असे प्रश्न विचारून, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी जाणून घेतात; ते स्वत:ला जाणून घेतात. ही व्यक्ती खरी शहाणी, धोरणी, दूरदृष्टी व समजूतदारपणा (Prudence) असलेली दिसते’’.

गूढवादी अध्यात्म (Mysticism) धर्माचा अत्युच्च आविर्भाव व्यक्त करते. सर्व धर्मांत हे दर्शित झाले आहे. गूढवादी अध्यात्मात रमलेली व्यक्ती ‘या घडीला येथेच शाश्वत जीवन’ जगते (Eternal Now). हा अनुभव फारच थोड्या व्यक्ती शब्दांत व्यक्त करू शकतात. त्यांपैकी संत बर्नार्ड हे खूप प्रसिद्ध ठरले आहेत. गूढवादी अध्यात्मात शिरून ते मांगल्याचे जीवन जगले. त्यांच्या जीवनाचा फायदा जगाला निश्चित झाला. यालाच म्हणतात, जीवन सार्थकी लागले.

संत बर्नार्ड यांचे गुढवादी अध्यात्म म्हणजे माणसाने परमेश्वराशी साधलेले तादात्म्य होय. जेव्हा भक्त व परमेश्वर दोन अलग व्यक्ती राहात नाहीत, त्याचप्रमाणे दोघांचे एकाच व्यक्तीत घट होऊन रूपांतर होत नसते, तेव्हा मिळालेला हा अनुभव म्हणजे माणसाने परमेश्वराशी आणि परमेश्वराने माणसाशी साधलेले तादात्म्य. ख्रिस्ती धर्मपरंपरेनुसार माणसाच्या आत्म्याला ‘परमेश्वराची प्रतिमा’ (Imago Dei) म्हणून ओळखले जाते; माणसाचा आत्मा ‘पवित्र आत्म्या’चा (Holy Spirit) निवासमंडप आहे, त्यात त्रैक्य-परमेश्वर वस्ती करतो. परमेश्वर ‘सत्यस्य सत्यम्’ आहे; परंतु तो एकलकोंडा (Monism) नाही. परमेश्वर मनुष्य-संबंधति वास्तव आहे (Theism) असे ख्रिस्ती परंपरा मानते. परमेश्वर साक्षात प्रेमाचा झरा आणि ओलावा आहे, असे बायबल ठासून शिकविते. प्रेमाविना मनुष्याला माणुसकीने जगताच येत नाही. म्हणजेच परमेश्वराविना माणूस स्वत:ला हरविलेला असतो. ‘आपण ज्यावर प्रेम करतो, तसे आपण पुढे सदृश्य होतो (बनतो). म्हणून जे परमेश्वराला शोधण्याऐवजी त्या परमेश्वराने निर्माण केलेल्या वस्तू प्रथम शोधतात, ते अविरतपणे जीवनात निरर्थक भटकतात आणि नैराश्येने गोंधळून जीवन जगतात.अस्सल प्रेम हे प्रेमाशिवाय दुसरे काही कारण किंवा फळ शोधत नसते. प्रेम केल्याचे फळ प्रेमच आहे, प्रेम करण्यातच अस्सल प्रेमाचा आनंद मिळतो. मी प्रेम करतो याला कारण मी प्रेम करतो; मी प्रेम करावे म्हणून मी प्रेम करतो’ असे संत बर्नार्ड शिकवितात.

परमेश्वर-भक्त यांमधील हा तादात्म्याचा अनुभव संत बर्नार्ड हे बायबलमधील गीतरत्न या पुस्तकावर चिंतन करून समजावून देतात. प्रियकर-प्रेयसीची उपमा गीतरत्न पुस्तक देऊन भक्ताने परमेश्वराशी कसे तादात्म्य साधायचे हे मानवी अनुभवातून शिकविते. हे अधिक स्पष्ट करताना संत बर्नार्ड पुढील उदाहरण देतात : ओठांवरील चुंबनासाठी जो प्रियकर प्रेयसीला बोलावितो, तो साक्षात माणसाचे शरीर धारण केलेले प्रभू येशू ख्रिस्तच असतात. प्रेयसी ज्या चुंबनाची प्रतीक्षा करते ते चर्च (ख्रिस्तमंडळी) व ती शरीरधारी प्रियकराला आमंत्रित करते. चुंबन म्हणजे पवित्र आत्म्याचा वर्षाव, ज्यामुळे भक्त परमेश्वराशी ‘मीलन’ होण्याची वाट पाहतो.

येशू ख्रिस्त यांनी मानवी शरीर धारण करणे, ही गौण गोष्ट नव्हे. ख्रिस्तभक्तांना हा अमूल्य ठेवा अद्याप कळलाच नाही, म्हणून ख्रिस्तशरीराविषयी भक्तांच्या जीवनात प्रेम प्रेरित करण्यासाठी संत बर्नार्ड खूप प्रयत्न करतात. ममता, प्रेमाचा ओलावा भक्तांमध्ये निर्माण व्हावा व माता मरिया यांच्या पोटी गव्हाणीत माणूस म्हणून जन्माला आलेले, सर्वांचे भले होण्यासाठी झिजलेले, अमाप चेष्टा, अपमान, असह्य फटके, क्लेश भोगलेले व क्रूसावर अमानुष हाल करून खिळून मारलेले ते येशू ख्रिस्त यांचे शरीर भक्तांनी प्रेमाने पूजावे, या हेतूने संत बर्नार्ड सर्वांना प्रेरित करतात. येशू ख्रिस्त यांनी केवळ भक्तांवरील प्रेमापोटी मानवी शरीर स्वीकारले. येशू ख्रिस्त म्हणजे साक्षात प्रेम. त्या प्रेमाच्या उगमापाशी भक्ताने झेप घ्यावी, त्या उगमातूनच प्रेम प्राशन करीत जगावे, पुन:पुन्हा टवटवीत बनत राहावे, नेहमी सतेज जीवनाचा आस्वाद घ्यावा, याच प्रखर इच्छेने संत बर्नार्ड बोलत होते. प्रभू येशूच्या क्लेशभोगावरील चिंतन प्रियकर-प्रेयसी यांमधील मीलनाच्या संदर्भात व्हायला हवे, असे त्यांना ठासून सांगायचे आहे. येशू ख्रिस्त यांच्या क्लेशभोगावरील चिंतन (Passion) निष्क्रिय बघ्याच्या भूमिकेतून कधीच होऊ नये, यासाठी संत बर्नार्ड ‘गूढ अध्यात्माचा’ मार्ग शिकवितात.

संत बर्नार्ड आपल्या ६३ वर्षांच्या आयुष्यापैकी ३८ वर्षे मठाधिपती या नात्याने मठाची धुरा सांभाळत होते. ११७४ मध्ये ख्रिस्तसभेने त्यांना ‘संत’ म्हणून जाहीर केले.

संदर्भ :

  • Evans, G. R., The Mind of Saint Bernard of Clairvaux, New York, 1983.
  • Fink, John F., The Doctors of  the Church, Vol. 1, London, 2000.
  • James, Bruno Scott, St. Bernard of Clairvaux : An Essay in Biography, London, 1957.
  • Luddy, Ailbe J., The Life of St. Bernard, Dublin, 1963.
  • Mausolfe, A. J. M.; Mausolfe, J. K.; D’Souza, Ladislaus L., Saint Companions, Mumbai, 2004.
  • Mayer, Hans Eberhard, The Crusades, New York, 1988.
  • https://www.encyclopedia.com/history/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/bernard-clairvaux-0

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया