ख्रिस्ती धर्मीयांच्या ‘उपासनामंदिरा’ला सर्वसाधारणपणे ‘चर्च’ असे म्हटले जाते. उपासनामंदिराची इमारत व विश्वव्यापी चर्च या दोन्ही संकल्पनांसाठी वापरलेला एकच शब्द कधी कधी मनाची गल्लत करू शकतो. चर्चचे अनुयायी प्रार्थनेसाठी जेथे एकत्र जमतात, त्या संकुलाला ‘चर्च’ ही उपाधी मिळाली असली, तरी केवळ प्रार्थनामंदिराची इमारत म्हणजे ‘चर्च’ नव्हे.

चर्च गेली दोन सहस्रके अस्तित्वात असूनही त्याची अधिकृत ‘व्याख्या’ अद्यापही सर्वसंमत होऊ शकलेली नाही. ‘People of God’ (बायबल, संत पॉल–रोमकरांस पत्र ९:२५-२६) म्हणजे चर्च हा नवा शब्दप्रयोग अलीकडे प्रचलित झाला आहे. याचाच अर्थ : चर्च म्हणजे देवप्रजा. ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून जे चालतात, ते ख्रिस्ती व त्यातून जगभर जे समाज निर्माण झाले आहेत, त्यांचा विश्वव्यापी समूह म्हणजे चर्च. मराठीमध्ये त्याला ‘ख्रिस्तसभा’ असे म्हटले जाते.

ह्या चर्चचे काही निकष आहेत. ख्रिस्ती लोक जेव्हा उपासनेसाठी ख्रिस्तमंदिरात एकत्र येतात, तेव्हा ते सामूहिक रीत्या ‘आपली धर्मश्रद्धा’ एका आवाजात मोठ्याने प्रकट करतात. त्यांच्या या ‘श्रद्धा प्रकटीकरणा’त संत पॉल यांनी स्पष्ट केलेल्या चर्चच्या चार प्रमुख अंगांचा समावेश ते अध्याहृत धरतात. ‘आय बिलिव्ह इन वन, होली, कॅथलिक अँड अपॉस्टॉलिक चर्च’ म्हणजे ते चर्चच्या चार आधारस्तंभांचा उल्लेख करतात. चर्च हे १) ‘एकच’ आहे, ते २) ‘पवित्र’ आहे, ते ३) ‘विश्वव्यापी’ आहे आणि ते ४) ‘प्रेषितीय’ आहे, अशा पोलादी चौकटीत आपली धर्मश्रद्धा ते अधोरेखित करतात.

१) येशूने एकच चर्च स्थापन केले. कालांतराने त्याचे विभाजन झाले असले, तरीसुद्धा ख्रिस्ताचे चर्च हे एकच आहे, अशी ख्रिस्ती भाविकांची मूलभूत श्रद्धा आहे. २) या चर्चमध्ये संत आहेत, तसे पापीजनही आहेत, तरीही ख्रिस्ताचा आत्मा तिच्यामध्ये कायमस्वरूपी वसती करून राहतो. म्हणून प्रभू ख्रिस्ताने स्थापन केलेले चर्च हे ‘पवित्र’ आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. ३) या चर्चची शकले झाली असली, तरी ख्रिस्ताचे चर्च हे विश्वव्यापी आहे, असे श्रद्धावंत मान्य करतात. ४) कालानुरूप या चर्चमध्ये जरी वैचारिक वादंग माजले असले, वेगवेगळी मते प्रतिपादन करणारे विचारवंत असले, तरी येशूने प्रेषितांना शिकवलेली मूळ शिकवण सर्व ख्रिस्ती मंडळी शिरोधार्य मानते. म्हणून प्रेषितांच्या माध्यमातून आलेल्या या ख्रिस्ताच्या चर्चला ‘प्रेषितीय’ असे म्हटले जाते.

या चर्चने वेगवेगळ्या कालखंडांत, वेगवेगळ्या देशांत, स्थलकालपरत्वे वरकरणी वेगवेगळे रूप धारण केले असले, तरी वरील चार गुणधर्म हे तिच्या अंतर्यामी जाज्वल्याने हजर असलेच पाहिजेत. त्यांतला एक गुणधर्म जरी गळून पडला, तरी त्याला ‘चर्च’ म्हणता येत नाही.

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रेटो