पाटील, शरद् : (१७ सप्टेंबर १९२५ – १२ एप्रिल २०१४). महाराष्ट्रातील एक विख्यात प्राच्यविद्यापंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत. जन्म धुळे येथे सत्यशोधक कुटुंबात. त्यांचे वडील तानाजी तुकाराम पाटील (भामरे) धुळे जिल्ह्यामध्ये पहिल्या पिढीतले सत्यशोधक होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धुळे येथेच झाले (१९४२). शाळेत अभ्यासू व शिस्तप्रिय शिक्षक लाभल्यामुळे बालवयातच त्यांना सामाजिक बांधिलकी व ध्येयवादाच्या प्रेरणा मिळाल्या. चित्रकलेच्या आवडीबरोबरच त्यांना अवांतर वाचनाचाही व्यासंग जडला. चित्रकलेची आवड असल्यामुळे एक वर्ष बडोद्याच्या कलाभवनात पेंटिंग कोर्सला (१९४३) व त्यानंतर मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेथे तिसर्या वर्षाला असताना राज्यव्यापी विद्यार्थी संपामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. धुळ्याला परतल्यावर त्यांचा परिचय कम्युनिस्ट कार्यकर्ते व प्रचारकांशी झाला. गव्हाणकर, अमरशेख व अण्णाभाऊ साठे या शाहिरांच्या संपर्कातून ते कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले (१९४६). चित्रकलेची आवड पाहून त्यांना प्रथम पक्षाच्या मुंबई कार्यालयात स्टाफ आर्टिस्ट म्हणून काम दिले गेले. वर्षभरानंतर धुळ्यात आल्यावर ते गिरणी कामगार चळवळीचे काम करू लागले. १९४८ साली जहाल कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेला, त्या वेळी त्यांना खानदेश भागातून हद्दपार व्हावे लागले. हद्दपारी संपल्यानंतर ते शेतकरी आघाडीवर काम करू लागले (१९५४). तेथे असताना त्यांनी गोवामुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांत सक्रिय सहभाग दिला.
सन १९५६ ते ६० च्या दरम्यान त्यांनी उकाई धरण प्रतिबंधात्मक चळवळ उभारली; परंतु त्यांना पक्षाचा पाठिंबा मिळाला नाही. आचार्य अत्रे यांनी मात्र त्यांच्या या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. भारत – चीन युद्धाच्या वेळेस कम्युनिस्ट भारतविरोधी आहेत असा आरोप होऊन सर्वत्र कम्युनिस्टांची धरपकड सुरू झाली, त्या वेळी त्यांना औरंगाबाद व नाशिक कारागृहात स्थानबद्ध व्हावे लागले (१९६३ – ६५). तीन वर्षाच्या या स्थानबद्धतेत त्यांनी कार्ल मार्क्सचा भांडवल (दास कॅपिटल) हा ग्रंथ समजून घेतला. भारतीय समाज व इतिहास हा मार्क्सच्या तोकड्या लिखाणावरून समजून घेता येणार नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी या विषयावर स्वतंत्र लेखन करावे या हेतूने स्थानबद्धतेतून सूटताच संशोधनासाठी बडोदे गाठले (१९६६). तेथील वास्तव्यात त्यांनी पंडित विद्याभास्कर मणिशंकर उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत (पाणिनी) व्याकरणाचे अध्ययन केले.
बडोद्याहून परतल्यावर त्यांनी आदिवासी भागामध्ये काम सुरू केले. पक्षाने जातिव्यवस्थेविरोधात लढा उभारायला नकार दिल्यामुळे पक्षातील संघर्ष वाढत गेला. अखेर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा देऊन आपल्या सहकार्यांसमवेत मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद (माफुआं) ह्या विचारसरणीवर अधिष्ठित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची (सकप) स्थापना केली (१९७८). स.क.प.ची चळवळ वैचारिक भूमिका घेऊन लढत होती, अशा परिस्थितीत माफुआंवादी दृष्टीकोन विविध विषयांवर मांडला जावा म्हणून त्यांनी सत्यशोधक मार्क्सवादी नावाचे मासिक सुरू केले (१९८२). त्यांनी १९८२ ते ९२ या काळात विविध आंदोलने उभारून आदिवासींच्या वनअतिक्रमणाचा लढा अखंडपणे चालू ठेवला. यासाठी त्यांना एसआरपीच्या दडपशाहीशी संघर्ष करावा लागला, यातूनच पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी (जनस्थान) राज्याची मागणी पुढे आली.
महाराष्ट्राच्या साहित्य व संस्कृतीच्या चळवळीमध्येही पाटलांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. त्यांनी इतिहास, संस्कृती, समाजकारण व अर्थशास्त्र या क्षेत्रात लेखन केले. शेकडो लेख लिहिले, विविध विचारमंचावर जाऊन वादळी व्याख्याने दिली. त्यांची साहित्य संपदा पुढीलप्रमाणे – दासशूद्रांची गुलामगिरी (खंड १, भाग १ व २, १९८२ व १९८७), जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व (खंड २, १९९६), जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती (खंड ३, २००३), प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद (खंड ४, २०१२) या खंडांमधून त्यांनी सौत्रान्तिक मार्क्सवादी तत्त्वज्ञान, बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषणपद्धत, समाजवादी सौत्रान्तिक सौंदर्यशास्त्र व जाणीव – नेणिवान्वेषी तर्कशास्त्र यांची मांडणी केली आहे. या व्यतिरिक्त बुद्ध, भिक्खू आनंद, विशाखा (१९८३), भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत (१९८४), रामायण – महाभारतातील वर्णसंघर्ष (१९८६), अब्राह्मणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र (१९८८), पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका (१९८९), शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण : महंमदी की ब्राह्मणी (१९९२), मार्क्सवाद – फुले – आंबेडकरवाद (१९९३), स्त्री – शूद्रांचा राजा (नाटक, १९९८), नामांतर औरंगाबाद व पुण्याचे (२०११) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
भारतातील जातिव्यवस्था ही शोषण – शासनाची पायाभूत व्यवस्था आहे, हे त्यांचे आग्रही प्रतिपादन राहिले आहे. या प्रतिपादनाच्या समर्थनार्थ त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून मूलगामी लेखन केले. अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राची मांडणी करून त्यांनी दलित-आदिवासी – ग्रामीण साहित्याची नाळ प्राचीन अब्राह्मणी परंपरेशी जोडली. ‘भारतात सौंदर्यशास्त्र नव्हते, केवळ साहित्यशास्त्र वा अलंकारशास्त्र होते. पश्चिमेत भांडवलदारी लोकशाही क्रांत्यांनंतर सौंदर्यशास्त्र जन्माला आले. भारतात सरंजामदारी जातिव्यवस्था नष्ट झालेली नसल्यामुळे सौंदर्यशास्त्र जन्माला येणे शक्य नव्हते, पण बुद्धाने केलेल्या वर्णदासअंतक समाजक्रांतीनंतर उदयोन्मुख भांडवलदार व कारागीर यांच्यात समता आल्यामुळे दिग्नागने सौंदर्यशास्त्राचे प्रवर्तन करून जाहीर वादसभेमध्ये कालिदासाचा पराभव केल्याचे मेघदूतात कालिदास मान्य करतो. पण सातव्या शतकानंतर जातिव्यवस्था कर्मठ होत गेल्यामुळे तत्त्वज्ञान व सौंदर्यशास्त्र हे अस्ताला गेले. ब्रिटिश अमदानीमध्ये भारतात समाजशास्त्रे, तत्त्वज्ञान व विज्ञाने आली; परंतु महायानाच्या दार्शनिक आकाशगंगेकडे ती जात्यंताने प्रेरित झालेली होती, या बाबीकडे दुर्लक्ष झाले’. याप्रमाणे त्यांनी त्यांची सौंदर्यशास्त्रविषयक भूमिका प्रकट केली आहे. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या खंडामध्ये दिग्नाग स्कूलच्या या अनन्य योगदानावर प्रकाश टाकला आहे. पश्चिमेत सिग्मंड फ्राइडच्या द्वैती मनाचे संशोधन तत्त्वज्ञान व सौंदर्यशास्त्रामध्ये अद्यापही आलेले नाही. पाटलांनी त्यांच्या सामाजिक सर्वहारांच्या बाजूच्या सौंदर्यशास्त्रामध्ये द्वैती मनाचा व त्याच्या प्रमाणशास्त्राचा विकास केला. त्यांच्या लेखनात एकाच वेळी भारतीय तत्त्वज्ञान, प्राच्यविद्या व मार्क्सवादी तत्त्वज्ञान यांचा प्रत्यय येत असल्याने त्यांच्या लिखानाबद्दल नेहमीच दुर्बोधतेचा आरोप होतो. त्यांच्या लिखानातील संवाद हा डाव्या चळवळीतील कार्यकर्ते व चळवळींशी संबंधित बुद्धिजीवीवर्गाशी येत असल्याने ते आपल्या लिखानात तात्त्विक व व्यावहारिक भाषा हाताळताना बाळबोध शैली हाताळत नाहीत.
त्यांच्या या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र इतिहास परिषदेचा वा. सी. बेंद्रे महान इतिहासकार पुरस्कार व रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (२०१४) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
वयाच्या ८९ व्या वर्षी धुळे येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- चव्हाण, रमेश (संपा), क्रांतिकारी सत्यशोधक कॉम्रेड शरद् पाटील, हर्मिस प्रकाशन, पुणे, २०१७.
- http://nitingdhoran-prabodhan.blogspot.com/2014/04/blog-post_21.html