आगरवाला, चंद्रकुमार: (२८ नोव्हेंबर १८६७ – २ मार्च १९३८). असमिया कवी. ब्राह्मणजन गोह्पूर, आसाम येथे त्यांचा जन्म झाला. चंद्रकुमारांचे मूळ घराणे राजस्थानातील. चंद्रकुमारांना साहित्यसेवेचा वारसा त्यांचे वडील हरीबिलास यांच्याकडून मिळाला. हरीबिलास यांनी दुर्लक्षित असे कित्येक चांगले प्राचीन असमिया ग्रंथ शोधून काढले व प्रकाशित केले. वडील हरीबिलास संस्कारी आणि शिस्तीचे भोक्ते होते. कुटुंब तेझपुरला गेल्यावर तेथेच त्यांचे शिक्षण झाले. उच्च शिक्षणासाठी काही काळ ते कोलकाता येथेही वास्तव्यात होते. त्यांची उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याची तयारी होती ; मात्र वडिलांनी त्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे सर्व शिक्षण अर्धवट सोडून ते दिब्रुगड येथे चहाच्या मळ्याच्या व्यवसायात स्थायिक झाले.
१८९० ते १९०० ह्या दरम्यान असमिया साहित्यात स्वच्छंदतावादी युगाचे प्रवर्तन चंद्रकुमार आगरवाला, लक्ष्मीनाथ बेझबरुआ आणि हेमचंद्र गोस्वामी ह्या तिघांनी केले. बी. ए.ला असतानाच त्यांनी काेलकात्यात शिकणाऱ्या असमिया तरुणांच्या मदतीने ‘असमीज लँग्वेज इंप्रूव्हमेंट सोसायटी’ ह्या संस्थेची स्थापना केली. ह्या संस्थेच्या वतीने कला- साहित्यास वाहिलेले जोनाकी नावाचे मासिक काढण्यात आले. सुरुवातीस जोनाकीचे संपादन चंद्रकुमारांनी केले. असमिया साहित्यिक वर्तुळात त्यामुळे उत्साहाची लाट पसरली. राष्ट्रीय धोरण असलेले असमिया नावाचे एक अर्धसाप्ताहिकही चंद्रकुमारांनी सुरू केले.
प्रतिमा (१९१३), बीण-बरागि (१९२३) आणि चंद्र्मित हे त्यांचे महत्त्वाचे काव्यसंग्रह होत. चंद्रकुमार निकोपदृष्टीचे आशावादी कवी होते. मानवजातीचे भवितव्य उज्ज्वल आहे, असा त्यांचा विश्वास होता. इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवींचा-विशेषत: शेलीचा-आणि वेदान्तातील चराचरेश्वरवादी दृष्टिकोनाचा त्यांच्या काव्यावर गहिरा प्रभाव दिसून येतो. असमिया साहित्यात स्वच्छंदतावादी काव्य प्रवाहाची सुरुवात त्यांनी केली.
संदर्भ :
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.