सुवर्ण भस्म हे आयुर्वेदात वापरले जाणारे महत्त्वाचे औषध आहे. आयुर्वेदामध्ये विविध मौल्यवान धातू, उपधातू तसेच रत्नांचा वापर औषधी स्वरूपात केला जातो. हे धातू आहे त्या स्वरूपात औषध म्हणून ग्रहण केले तर शरीराला अपाय होऊ शकतो, म्हणून रसाशस्त्र या विषयांतर्गत धातू, उपधातू, रत्न इत्यादींचे शोधन मारण कसे करावे याचे वर्णन आले आहे. या विविध प्रक्रियांमुळे धातू इत्यादी शरीरात पचण्यासाठी सात्म्य होतात आणि शरीरावर चांगले परिणाम दाखवतात.

या रसौषधांमध्ये सोने, चांदी, लोखंड, तांबे, पितळ इत्यादी अनेक धातूंचे व त्यांच्या गुणांचे वर्णन आले आहे. धातूंचे प्रकार तसेच त्यातला कोणता प्रकार शरीरासाठी चांगला आणि कोणता त्याज्य हे सांगितले आहे. उत्तम धातूची लक्षणे सांगून त्याचा वापर औषधासाठी करावा हे सांगितले आहे.

सुवर्ण भस्म

प्रक्रिया : सर्वप्रथम उत्तम सोने ओळखून त्यावर शुद्धीप्रक्रिया तसेच भस्मिकरण केले जाते. सुवर्णाच्या पाच प्रकारांपैकी प्राकृत, सहज आणि अग्निसंभव हे प्रकार श्रेष्ठ आहेत. तरीसुद्धा व्यवहारात आता खनिज सुवर्णाचाच वापर केला जातो. जे सोने अग्नीत तापवले असता लाल होते, कापल्यावर चमकते, कसोटीच्या दगडावर घडल्यावर केशरासमान वर्णाचे होते, जे जड असते, स्निग्ध असते, मृदू असते, स्वच्छ असते तसेच उत्तम पिवळी छटा असणारे असे सोने देहासिद्धी तसेच लोह सिद्धीसाठी उपयुक्त असते. त्यात रसायन गुण असतात आणि हेच सोने श्रेष्ठ असते. याच्या विरुद्ध गुणाचे सोने हे शरीरासाठी चांगले नसते.

कृती : सुवर्ण भस्म बनवण्यासाठी आधी त्याचे शोधन म्हणजे शुद्धी करणे आवश्यक असते. काही आयुर्वेदाचार्यांच्या मतानुसार सोन्याची शुद्धी न करता ते वापरलेले चालते, परंतु व्यवहारात आपण खनिज स्वरूपातील सोने वापरत असल्याने त्याची शुद्धी करणे गरजेचे असते. प्रथम त्याचे सामान्य शोधन आणि नंतर विशेष शोधन करावे लागते. सामान्य शोधनामध्ये सोन्याचे पत्रे करून ते तापवून प्रथम तेल, ताक, गोमूत्र, कांजी तसेच कुळीथ काढ्यात क्रमश: सात-सात वेळा विझवावे. नंतर विशेष शोधन म्हणजे शुद्धी करावी. यासाठी वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळ्या प्रक्रियांचे वर्णन आले आहे. एक तोळा सोने घेऊन त्याचा पातळ पत्रा बनवावा. त्यावर सैंधव लवण आणि सुवर्ण गैरिकाचा लेप करून ते वाळवून घ्यावे. ते शरव संपुटात ठेऊन अग्निवर तापवावे. दुसऱ्या ग्रंथामध्ये वेगळ्या पद्धतीचे वर्णन आले आहे. वारुळाची माती, गहू, सुवर्ण गैरिक, विटेचे चूर्ण आणि सैंधव हे समभाग घेऊन त्यात कांजी अथवा लिंबाचा रस मिसळून त्याचा लेप सोन्यावर करावा. नंतर शरावात ठेऊन लघुपूट अग्नी द्यावा.

यानंतर मारण म्हणजे भस्मिकरण केले जाते. त्याच्या देखील विविध प्रक्रिया वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वर्णिलेल्या आहेत. शुद्ध सोन्याच्या पत्र्यावर रस सिंदुराचा लेप लावून वाळवून घ्या. त्यानंतर शराव संपुटात ठेवून कुक्कुटपूट अग्निमध्ये दहन करावे. अशी दहा पूटे द्यावीत. त्याने सोन्याचे भस्म तयार होते. दुसऱ्या पद्धतीनुसार सोने तापवून ते वितळवावे व त्यात समान मात्रेमध्ये पाऱ्याचे चूर्ण किंवा रस सिंदुर घालावे. नंतर त्यात हिंगूळ मिसळून लिंबाच्या रसामध्ये ते मिश्रण खलावे. त्याच्या चकत्या बनवून घ्याव्यात आणि शरावात घेऊन कुक्कुटपूटाचा अग्नी द्यावा. असे बारा वेळा करावे. त्यामुळे सोन्याचे केशराच्या समान रंगाचे सुंदर भस्म तयार होते.

गुणधर्म : सुवर्ण भस्मामध्ये कषाय, तिक्त, मधुर, कटू हे रस असतात. ते गुरू, स्निग्ध, पीच्छिल असते. त्याचे वीर्य शीत, तर विपाक मधुर असतो. सुवर्ण भस्म हे अतिशय वृष्य असते. ते रसायन गुणांनी युक्त असते. वाजिकरणार्थ त्याचा वापर होतो. ते बल वाढवणारे व शरीराची पुष्टी करणारे असते. ते बुद्धी, स्मरणशक्ती, धारणाशक्ती वाढवणारे असून डोळ्यांसाठी हितकर, शरीराला कांती देणारे व वर्ण सुधारणारे, वाचा शुद्ध करणारे, रुची वाढवणारे, ओज वाढवणारे तसेच वयस्थापन करणारे असते. विषाचा प्रभाव उतरवणारे आहे. शरीर तसेच मानसिक व्याधींमध्ये देखील सुवर्ण भस्म उपयुक्त आहे. हे हृदय म्हणजे हृदयासाठी हितकर तसेच मनाला आवडणारे देखील आहे. ते व्रण भरून काढणारे तसेच संतती देणारे आहे. राजयक्ष्मा, श्वास, कास, अरुची, अग्निमांद्य, पांडू या व्याधींमध्ये उपयुक्त असून ते पुढे उत्पन्न होणाऱ्या रोगांना थांबवते. गरविषाचा (निर्विष द्रव्यांचा संयोग होणे हे सर्वसाधारण ‘गरविष’ आणि सविष द्रव्य संयोगाला ‘कृत्रिम’ विष अशी वेगळी नावे असली, तरी दोघांनाही ‘गरविष’ हे नाव आहे) नाश करते.

अशुद्ध सुवर्ण सेवनाने मनुष्याच्या बल तसेच विर्याचा नाश होतो. अनेक रोग उत्पन्न होतात. तसेच मनुष्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

मात्रा : एक अष्टमांश (१/८) ते एक चतुर्थांश (१/४) रत्ती (वजन करण्याचे अगदी लहान प्रमाण) याप्रमाणात सुवर्ण भस्म हे रोग तसेच रोग्याचे बलाबल बघून द्यावे. रसरत्न समुच्चय या ग्रंथामध्ये सुवर्ण भस्म गुंजेच्या मात्रेत घेण्यास सांगितले आहे.

सुवर्ण भस्माचे अनुपान म्हणून मध, मीरेचूर्ण, तूप, त्रिकटूचूर्ण यांसारख्या विविध योगांबरोबर घेऊ शकतो. त्याचप्रमाणे मत्स्य पित्तासह सुवर्ण भस्म घेतल्यास तत्काळ दाह नाश होतो. सुवर्ण भस्म भृंगराज स्वरसासह घेतल्यास वृष्य गुण वाढवते, दुधासह घेतल्यास बल देणारे, पुनर्नवासह घेतल्यास डोळ्यांसाठी हितकर, तूपासह घेतल्यास रसायन कार्य करते, वेखंडासह घेतल्यास स्मृती वर्धक, केशरासह घेतल्यास त्वचेची कांती वाढवते, दुधासह घेतल्यास राजयक्ष्मा तसेच विषनाशक म्हणून कार्य करते, सुंठ-मिरे तसेच लवंगेसह घेतल्यास त्रिदोष आणि उन्मदाचा नाश करते. सुवर्ण भस्म सेवन करताना बेलफळ खाणे हे एकमेव अपथ्य आहे.

सुवर्ण भस्माचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले असता आढळले की, त्या भस्मामध्ये सोन्याचे चमकदार कण जसेच्या तसे सूक्ष्म रूपात उपस्थित आहेत. त्यांचे कोणत्याही सल्फाइड अथवा ऑक्साइड यौगिकात रूपांतरण झालेले नाही. सोन्याला इतर धातूंपेक्षा भिन्न समजले जाते (novel metal), कारण त्याचे सल्फाइड अथवा ऑक्साइड यौगिक तयार होऊ शकत नाही. सुवर्ण भस्माचे धातू परीक्षण (Metalography Analysis) केल्यावर त्यात अधिकाधिक प्रमाणात मुक्त सुवर्ण धातूंचे सूक्ष्म कण दिसले.

सुवर्ण भस्माच्या रासायनिक विश्लेषणात सुवर्ण ९६.७६०%, सिलिका १.१४०%, लोह ०.१४०%, चुना ०.५४६%, तांबे, मॅग्नेशियम, फॉस्फेट मिळून ०.७८१%, पोटॅश ०.१६१%, सोडियम क्लोराइड ०.०७८%, सल्फेट ०.१५०%, आर्द्रता ०.२४४% असे प्रमाण दिसून येते. सुवर्ण भस्मावर अनेक संशोधने झाली आहेत. त्यानुसार उंदरांवर सुवर्ण भस्माची विषाक्तता तपासून बघितली असता, त्या उंदरांमध्ये सुवर्ण भस्माची कोणतीही विषाक्तता दिसून आली नाही.

संदर्भ :

  • डॉ. चंद्रभूषण झा, आयुर्वेदिक रसशास्त्र, चौखंबा पब्लिशिंग हाऊस, २०१८.
  • https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0378874119311584

समीक्षक : कौस्तुभ चौंडे