रस म्हणजे चव होय. आयुर्वेदानुसार रसना म्हणजे जीभ. जीभ या इंद्रियाने ज्या अर्थाचे (विषयाचे) ज्ञान होते त्याला रस म्हणतात. रस ही संकल्पना फक्त पदार्थाची चव इतकीच मर्यादित नसून शरीरातील धातुघटक, औषधिकरणामध्ये पारद इत्यादी म्हणूनही वापरली गेली आहे. परंतु, येथे षड्रस संकल्पनेमध्ये पदार्थांमध्ये असणारे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट या सहा (षड्) रसांचा म्हणजे सहा चवींचा उल्लेख अपेक्षित आहे. जीभेद्वारे या चवींचा आस्वाद घेता येतो, या समान भावामुळेच या सर्वांना रस असे म्हणतात.

आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतापैकी षड्रस सिद्धांताचे विशेष महत्त्व आहे. द्रव्य वा पदार्थ प्रधान असूनही जर त्याला चव नसेल तर त्याचे कार्य समजणे तसे कठीणच आहे. पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी व त्याच्या परीचयासाठी रसच कारणीभूत असतो. सामान्यत: पदार्थाचे गुणधर्म, परिणाम इ. अनुमान रसानेच सहज करता येतात. दैनंदिन व्यवहारात आपला आहार तसेच रोगोपचारमध्ये द्रव्य किंवा औषधे निवडताना रसांचा विचार करणे गरजेचे असते.

षड्रसांचा उल्लेख आयुर्वेदात आहारातील निवड, दिनचर्या, ऋतूचर्या, चिकित्सा इत्यादींमध्ये पदोपदी आढळतो. आयुर्वेदाचे प्रयोजन स्वास्थ्य उत्तम राखणे हे आहे व ते टिकवून ठेवण्यासाठी हितकर आहार द्रव्यांचा विस्तृत विचार आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये केला आहे. याच्या विपरीत जर चुकीच्या आहार-विहारामुळे किंवा जीवन पद्धतीमुळे रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यासंदर्भातील आवश्यक तो विचार आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये आहे. यासाठी ज्या द्रव्यांचे प्रयोजन केले जाते त्यात रस विचार प्राधान्याने केला गेला आहे.

रसाची उत्पत्ती किंवा चवीची अभिव्यक्ती होण्यासाठी पंचमहाभूतांचा विशिष्ट परमाणू संयोग अपेक्षित आहे. सृष्टीतील प्रत्येक वस्तू ही पंचमहाभूतांच्या संयोगानेच बनली आहे. त्यांच्या परमाणूच्या कमी जास्त प्रमाणाने त्या त्या वस्तूला त्याचे स्वरूप व अस्तित्व असते. आपले शरीर देखील या महाभूतांपासूनच बनले आहे, म्हणून त्याचा समतोल राखण्यासाठी घेतला जाणारा आहार व बिघडल्यास केली जाणारी चिकित्सा द्रव्ये ही महाभूतांपासूनच बनलेली आहेत. यानुसार आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये सहाही रसांची उत्पत्ती कोणत्या महाभूतांच्या संयोगाने झाली आहे व त्यांचे शरिरातील दोषांवर, धातूंवर काय परिणाम दिसतो याचे सविस्तर वर्णन आहे.

प्रत्येक रसातील महाभूत प्राधान्य व दोषांवरील त्याचे कार्य खालीलप्रमाणे आहे —

गोड चव : पृथ्वी आणि जल (पाणी), कफ दोष वाढविणारा व पित्त-वाताला शांत करणारा आहे.

आंबट चव : पृथ्वी आणि अग्नि, पित्त-कफ वाढवून वाताला शांत करणारा आहे.

खारट चव : पाणी आणि अग्नि, कफ-पित्त वाढवून वाताला शांत करणारा आहे.

तिखट चव : हवा आणि अग्नि, पित्त-वात वाढवून कफाला शांत करणारा आहे.

कडू चव : हवा आणि आकाश, वात वाढवून पित्त-कफाला शांत करणारा आहे.

तुरट चव : हवा आणि पृथ्वी, वात वाढवून पित्त-कफाला शांत करणारा आहे.

समतोल राखण्यासाठी कोणत्याही एकाच रसाचे सेवन न करता सहाही रसांनी युक्त अशा पदार्थांचा समावेश आपल्या दैनंदिन आहारामध्ये केला जाणे आवश्यक आहे. ऋतुनुसार ही भिन्न भिन्न रसांची उत्पत्ती होते. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत ह्या सहा ऋतूंत क्रमाने कडू, तुरट, तिखट, आंबट, खारट व गोड रस उत्पन्न होतात. गोड, कडू, तुरट हे सौम्य गुणधर्माचे तर तिखट, आंबट, खारट रस हे उष्ण गुणधर्माचे आहेत.

भोजनाची सुरुवात गोड रसाने करावी, तर मध्यावर आंबट, खारट व शेवट कडू, तुरट, तिखट रसांनी करावा. चिकित्सेतही दोषांनुसार रसांचा वापर केला गेला आहे. वातदोषांच्या चिकित्सेत प्रथम खारट नंतर आंबट व शेवटी गोड रसांची औषधे वापरावीत. पित्तासाठी पहिला कडू, नंतर गोड व शेवटी तुरट आणि कफ दोषाच्या चिकित्सेत तिखट, कडू व तुरट या क्रमाने औषधांचा वापर सांगितला आहे.

रसांचा योग्य वापर हा जसा उपयुक्त आहे तसाच अतिरेक विविध आजारांना आमंत्रण देणारा ठरतो. उदा., गोड चवीचा पदार्थ बल, स्निग्धता देणारा आहे. परंतु, त्याचा अतिरेक स्थूलता, खोकला, दमा इ. आजारांसाठी कारणीभूत ठरतो. आंबट पदार्थ पचन करणारे, वाताचे अनुलोमन करणारे असून त्याच्या अतिरेकाने रक्ताचे आजार, शरीरात खाज व दाह उत्पन्न करणारा ठरतो. याप्रमाणेच उर्वरीत रसांचेही सविस्तर वर्णन केले आहे. एकंदर रसाचा सर्वांगीण विचार हा व्यवहारात, दैनंदीन जीवनात तसेच चिकित्सा करताना अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या पायाभूत सिद्धांतामध्ये त्यास महत्त्वाचे स्थान आहे.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे